
पणजी, २५ जानेवारी (वार्ता.) – गोवा पोलिसांनी विविध ३० प्रकरणांमध्ये कह्यात घेतलेले ४९ किलो वजनाचे २ कोटी १७ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ पोलीस महासंचालक अलोक कुमार आणि अन्य ज्येष्ठ अधिकारी यांच्या देखरेखीखाली कुंडई येथील कचरा जाळण्याच्या भट्टीमध्ये जाळून नष्ट केले. हे अमली पदार्थ कोकण रेल्वे, दोन्ही जिल्ह्यांतील पोलीस ठाणी आणि अमली पदार्थ विरोधी विभाग यांच्याकडून कह्यात घेण्यात आले होते.
पोलीस खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या अमली पदार्थांमध्ये गांजा, चरस, कोकेन, एम्.डी.एम्.ए. आणि एल्.एस.डी. या अमली पदार्थांचा समावेश होता. यापूर्वी पणजी येथील पोलिसांच्या मुख्य कार्यालयामध्ये एन्.डी.पी.एस्. (नार्काेटीक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टान्सीस) समितीने अमली पदार्थांची कसून पडताळणी करून त्यासंबधी कागदपत्रे सिद्ध केली होती. हा उपक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या देखरेखीखाली कह्यात घेतलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने आयोजित विशेष पंधरवड्याचा एक भाग होता.