वाल्मिक कराडला ७ दिवसांची विशेष पोलीस पथकाची कोठडी !

वाल्मिक कराड

बीड – वाल्मिक कराड याला १४ जानेवारीला मकोका लावण्यात आल्यानंतर त्याला १५ जानेवारीला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ९ डिसेंबरला दुपारी ३.२० ते ३.३० या कालावधीत सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे दूरभाषद्वारे संभाषण झाले. या कालावधीत त्या तिघांमध्ये काय संभाषण झाले ? याचे अन्वेषण विशेष पोलीस पथकाला करायचे आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी विशेष पथकाने केली. यावर बीड येथील न्यायालयाने वाल्मिकला ७ दिवसांची विशेष पोलीस पथकाची कोठडी संमत केली. त्याला मद्याचे दुकान चालू करण्यासाठी दिलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ केज नगरपंचायतीने रहित केले आहे. या मद्यालयास अवैधरित्या प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होता.