भारताने स्वतःच्या पेट्रोल, डिझेल खरेदीत विविधता आणली आहे. इस्रायल-इराण यांच्यातील संघर्ष वाढण्याची चाहूल ओळखत भारताने व्हेन्झुएला या देशाकडूनही स्वस्तात कच्चे तेल घेण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच रशियाशी आणखी कच्चे तेल खरेदीसाठी बोलणी चालू केली आहे. विशेष म्हणजे इराणच्या इस्रायलवरील आक्रमणानंतर जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती ५ टक्क्यांनी वाढल्या; पण भारतावर त्याचा परिणाम झाला नाही. तेलासाठी केवळ आखातावर विसंबून रहाणे भारताने थांबवले आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा जगावर झाला, तसा भारतावर परिणाम झाला नाही; कारण भारताने रशियाकडून कच्चे तेल घेण्याचा निर्णय हुशारीने घेतला. जो रशिया भारताचा १२ व्या क्रमाकांचा तेल पुरवठादार होता, तो वर्ष २०२५ मध्ये क्रमांक एकचा पुरवठादार बनला. एवढेच नाही, तर या काळात भारत युरोपचा अव्वल क्रमाकांचा रिफाइंड तेल पुरवठादार बनला. भारताच्या याच इंधनाविषयीच्या मुत्सद्देगिरीमुळे श्रीलंका, पाकिस्तान येथे जशी भयावह परिस्थिती निर्माण झाली, तशी भारतात झाली नव्हती आणि भविष्यात होणार नाही.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे. (१२.१.२०२५)