३ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हालवले
लॉस एंजेलिस (अमेरिका) – अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेली आग शहरापर्यंत पोचली आहे. आतापर्यंत ४ सहस्र ८५६ हेक्टर क्षेत्राला या आगीचा फटका बसला आहे. या आगीत सुमारे १ सहस्र १०० इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत, तर २८ सहस्र घरांची हानी झाली आहे. या आगीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अनुमाने ५० लोकांना तत्काळ घरे सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सुमारे ३ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. प्रशासनाने शहरात आणीबाणी घोषित केली आहे.
अनेक हॉलिवूड कलाकारांचे लॉस एंजेलिस शहरातील बंगले या आगीत जळून खाक झाले आहेत. आगीमुळे लॉस एंजेलिसमधील ब्रेटनवूड भागातील अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांचे घर रिकामे करण्याची सूचना देण्यात आली आहे.
कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस हे शहर पर्वतांमध्ये वसलेले आहे. जंगलात मोठ्या प्रमाणात पाईनची झाडे आहेत. सुकलेली झाडे जळाल्याने ही आग लागली. पुढच्या काही घंट्यांत या आगीने लॉस एंजेलिसच्या मोठ्या भागाला वेढले.