Biren Singh Apologised : मणीपूर हिंसाचारावर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मागितली क्षमा !

गेल्या २ वर्षांत २०० हून अधिक जणांचा मृत्यू

इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये संपूर्ण वर्ष अत्यंत दुर्दैवी गेले. अनेकांनी त्यांच्या प्रियजनांना गमावले. अनेकांनी घरे सोडली. याबद्दल मला खूप दुःख झाले आहे. मला क्षमा मागायची आहे. ३ मे २०२३ पासून आजपर्यंत जे काही घडत आहे, त्याबद्दल मी राज्यातील जनतेची क्षमा मागतो. मला खरोखर क्षमा करा, अशा शब्दांत मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी जनतेची क्षमा मागितली.

ते येथील सचिवालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ३ मे २०२३ पासून मणीपूरमधील ख्रिस्ती कुकी आतंकवादी आणि हिंदु मैतेयी यांच्यामध्ये हिंसाचार चालू आहे.

मुख्यमंत्री सिंह म्हणाले की, गेल्या २ वर्षांत सुमारे २०० लोक मारले गेले आहेत. ६२५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्फोटकांसह सुमारे ५ सहस्र ६०० शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. प्रश्‍न हाताळण्यातही यश मिळाले आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यात शांतता आहे. हिंसाचाराची कोणतीही घटना घडली नाही. तुरळक निदर्शने वगळता लोक रस्त्यावर उतरले नाहीत. सरकारी कार्यालये प्रतिदिन चालू होत आहेत आणि शाळांमध्ये मुलांची संख्या वाढत आहे.