अमेरिकेकडून पाकिस्तानला चपराक !
वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिका सरकारने पाकिस्तानसाठी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे निर्माण करणार्या ‘नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स’ (एन्.डी.सी.) या आस्थापनासह ४ आस्थापनांवर बंदी घातली आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, ‘एन्.डी.सी. व्यतिरिक्त कराचीस्थित ‘अख्तर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘एफिलिएट्स इंटरनॅशनल’ आणि ‘रॉकसाइड एंटरप्राइझ’ ही आस्थापने क्षेपणास्त्र कार्यक्रमात पाकिस्तानला सहकार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे ही शक्तीशाली क्षेपणास्त्रे मानली जातात. ते प्रतिघंटा ५ सहस्र ते १० सहस्र वेगाने प्रवास करून लक्ष्य भेदू शकतात.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, या आस्थापनांचा मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रांच्या प्रसारात सहभाग असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी एन्.डी.सी. उत्तरदायी आहे, तर इतर ३ आस्थापने क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी उपकरणे पुरवत आहेत. यापूर्वी याच प्रकरणात अमेरिकेने चीन आणि बेलारूस यांच्या आस्थापनांवर पाकिस्तानच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात सहभाग असल्याबद्दल बंदी घातली आहे.