पेण (जिल्हा रायगड), १० डिसेंबर (वार्ता.) – पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या प्रेरणेने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पेण विभागाच्या वतीने शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने ‘मातृ-पितृ इच्छापूर्ती’ दिवस साजरा करण्यात आला. या वेळी पदयात्राही काढण्यात आली. भगव्या ध्वजाचे पूजन करून श्री तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये गोंधळ, शौर्यगीते, तसेच देवीची आरती म्हणण्यात आली. या वेळी अफझलखानवधाचे प्रतीक म्हणून अफझलखानाचे मातीचे मुंडके आई तुळजाभवानीच्या चरणी वहाण्यात आले. सर्व धारकर्यांनी पदयात्रेत उत्साहपूर्ण वातावरणात घोषणा दिल्या, तसेच शौर्यगीतांसह पदयात्राही पार पडली. फेरीच्या शेवटी ‘बांगलादेशातील हिंदूंची सद्य:स्थिती’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनीष माळी यांनी माहिती दिली, तसेच पेण येथील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
पदयात्रेतील अफझलखानवधाचे चित्र पोलिसांनी झाकायला लावले !
पदयात्रेत पुढे धरण्यात आलेल्या फलकावर अफझलखानवधाचे चित्र असल्याने पोलिसांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यांनी ते झाकण्यास धारकर्यांना भाग पाडले. त्यामुळे त्या चित्रावर वाघनखांचे चित्र लावून पदयात्रा काढण्यात आली. (हिंदूबहुल महाराष्ट्रात प्रत्येक वेळी हिंदूंचाच आवाज दाबला जातो, हे लक्षात घ्या ! अन्य धर्मियांवर असा दबाव आणण्याचे धाडस पोलीस कधीच दाखवत नाहीत ! – संपादक)