सध्या बांगलादेशातील सर्व जिल्ह्यांमधील हिंदूंवर ५ ऑगस्टपासून विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली चालू झालेली आक्रमणे अद्यापही चालू आहेत. यामध्ये मंदिरातील देवतांच्या मूर्ती तोडणे आणि पुतळे पाडणे या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. सद्यःस्थितीत तेथील हिंदू भयावह स्थितीत जगत आहेत. एक प्रकारे तेथे हिंदूंचा नरसंहार चालू आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. बांगलादेशातील हिंदूंच्या सध्याच्या स्थितीचे विश्लेषण येथे देत आहोत.
(ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
१. बांगलादेशामध्ये फाळणीच्या काळातील हिंदूंच्या वंशविच्छेदाची पुनरावृत्ती
‘बांगलादेशात ५३ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. तीच किंकाळी, तेच हृदय पिळवटून टाकणारे आक्रंदन, तेच अश्रूंनी डबडबलेले डोळे, पाशवी बलात्कारानंतर फेकलेले तेच भीषण मृतदेह, तीच उद्ध्वस्त आणि जळणारी घरे, मूक प्रेक्षक बनलेले तेच स्थानिक प्रशासन अन् तेच असाहाय्य हिंदू ! फाळणीच्या काळातील दृश्ये संपूर्ण बांगलादेशात पुनरुत्पादित केली जात आहेत. बांगलादेशासाठी हे नवीन नाही.
वर्ष १९७१ मध्ये पश्चिम पाकिस्तानचा हुकूमशाह जनरल टिक्का खान याने ‘ऑपरेशन सर्चलाइट’ (शोधमोहीम) चालवून हिंदूंचा नरसंहार चालू केला. २३ मार्च १९७१ या दिवशी चालू झालेल्या या आक्रमणात तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील (आताच्या बांगलादेशातील) अवघ्या काही मासांत ३० लाख हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली. ४ लाखांहून अधिक तरुण सुना-मुलींवर पाशवी बलात्कार करण्यात आले. एवढे करूनही बांगलादेशातील शूर हिंदू त्याच्या जगण्याच्या इच्छेने ठाम राहिले. त्यांनी मातृभूमी सोडली नाही.
२. बांगलादेशातील हिंदूंवर धर्मांध मुसलमानांचे निर्घृण अत्याचार
अ. बांगलादेशातील हिंदूंच्या या अदम्य साहसाने संतप्त होऊन तेथील धर्मांध मुसलमानांनी ५ ऑगस्ट २०२४ पासून हिंदूंच्या नरसंहाराची पुनरावृत्ती चालू केली. जुलै २०२४ मध्ये चालू झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन प्रारंभी तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात होते. या चळवळीत अनेक बाह्य शक्तींचा सहभाग होता; पण शेख हसीना यांनी त्यागपत्र देऊन ५ ऑगस्ट या दिवशी त्यांनी देश सोडून पळ काढताच संपूर्ण आंदोलन हिंदु-बौद्ध नागरिकांच्या विरोधात गेले. त्यानंतर ४ मास उलटून गेल्यावरही हिंदूंवरील अत्याचार वाढतच आहेत.
आ. ५ ऑगस्टपासून आजपर्यंत बांगलादेशातील हिंदू रात्री नीट झोपलेले नाहीत. आतापर्यंत सहस्रो हिंदूंची हत्या झाली आहे. त्यात संपूर्ण बांगलादेशातील प्रसिद्ध उद्योगपती, कलाकार, गायक, खेळाडू, पोलीस अधिकारी आदींचा समावेश आहे. बांगलादेशातील खुलना, रंगपूर, राजशाही, बरिसाल, चितगाव, सिल्हेट अशा सर्व जिल्ह्यांमध्ये अजूनही हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. हिंदूंची मंदिरे आणि पुतळे पाडणे या घटना नित्याच्याच झाल्या आहेत.
इ. बांगलादेशी पोलिसांच्या म्हणण्यानुसार यावर्षी दुर्गापूजेच्या काळात धर्मांध मुसलमानांनी केवळ ३५ दुर्गापूजा मंडप पाडले; पण ही संख्या अत्यंत चुकीची आहे. बांगलादेशच्या ‘जाती हिंदू महाजोत’ (नॅशनल हिंदू अलायन्स) नुसार शेकडो दुर्गापूजा मंडप पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले.
ई. ५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात ४९ हिंदु माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये येथील शिक्षकांना त्यांच्या नोकरीचे त्यागपत्र देण्यास भाग पाडले गेले. चंदपूर जिल्ह्यातील फरीदगंज गावातील गलक आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य हरिपाद दास यांचा मुसलमान विद्यार्थ्यांनी अत्यंत घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने अपमान केला.
उ. बांगलादेश सरकारने ५ ऑगस्टनंतर एकाच मासात २५२ हिंदु पोलीस अधिकार्यांना कामावरून काढून टाकले. आता बांगलादेशात एकही हिंदु पोलीस नाही !
ऊ. एकट्या खुलना विभागाचेच उदाहरण घेतले, तर तेथे अजूनही हिंदूंवर हिंसाचार चालू आहे. ५ ऑगस्टच्या रात्री खुलना विभागातील जशोर शहराजवळील बेजापारा गावात रहाणार्या २०० हिंदु कुटुंबांवर मोठे आक्रमण करण्यात आले. त्यांची घरे लुटली गेली, घरात माणसे असतांनाही घरे जाळली गेली आणि महिलांना पळवून नेले. त्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलिसांना संपर्क केला असता त्यांनी दूरभाष उचलला नाही. बांगलादेश पोलीस हिंदूंवरील हे भीषण आणि क्रूर आक्रमण मूक प्रेक्षक म्हणून पहात राहिले.
ए. त्यानंतर ६ ऑगस्टलाही हिंदूंवर आक्रमणे चालूच राहिली. बागेरहाट सदर उपजिल्ह्यामध्ये मृणाल कांती चॅटर्जी या तेथील लोकप्रिय सेवानिवृत्त शाळेतील शिक्षिकेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या दिवशी जेशोर शहरात ५० हिंदु घरे लुटली आणि जाळली.
३. हिंदु मंदिरे आणि देवतांच्या मूर्ती यांची तोडफोड आणि हिंदूंवर अत्याचार काय काय मोजायचे…?
अ. बागरपारा उपजिल्ह्यातील नरकेलबरिया बाजार, धलग्राम, मोनिरुपपूर उपजिल्हा, अभय नगर उपजिल्हा, केशवपूर उपजिल्हा, कोईरा उपजिल्हा अशा विविध ठिकाणी बांगलादेशात जेथे जेथे हिंदू आहेत, तेथे तेथे त्यांचा शोधून शोधून छळ करण्यात आला, त्यांच्या हत्या करण्यात आल्या, त्यांची घरे लुटण्यात आली आणि त्यांच्या तरुण सुना-मुलींना पळवून नेण्यात आले.
आ. खुलना विभागातील मेहेरपूर येथे ‘इस्कॉन’चे मोठे मंदिर होते. त्यात कालीमातेची मोठी मूर्ती होती. भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्याही मूर्ती होत्या. ते मंदिर पाडण्यात आले. मूर्तींची नासधूस केली. यावर्षी दुर्गापूजेपूर्वी बांगलादेशात सर्व दुर्गापूजा मंडळांना दुर्गापूजा न करण्याचे सांगण्यात आले होते, तरीही धाडस दाखवून हिंदूंनी जेथे जेथे दुर्गापूजा मंडप उभारले; पण ते पाडण्यात आले. अनेक ठिकाणी दुर्गादेवी आणि कालीमाता यांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. राजधानी ढाक्याच्या मध्यभागी असलेल्या ४ मंदिरांच्या दुर्गापूजा मंडपामध्ये दुर्गामातेच्या मूर्तींना दारूने अंघोळ घालण्यात आली, मूर्तींचे विघटन करण्यात आले आणि त्या तुटलेल्या मूर्तींसमोर भव्य नृत्य केले गेले.
४. अत्याचारांच्या विरोधात संघटित हिंदूंचा संघर्ष
बांगलादेशातील हिंदूंमध्ये कमालीचे धैर्य आहे. त्यांनी हुकूमशाही सरकारच्या तीव्र विरोधाला न जुमानता २६ ऑक्टोबर या दिवशी चितगावमधील ऐतिहासिक लालदिघी मैदानावर एक भव्य रॅली काढली. ‘सनातन जागरण मंच’च्या आवाहनावर काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात लक्षावधी हिंदू जमले होते. त्यांनी महंमद युनूस सरकारला ८ कलमी मागण्यांचे निवेदन दिले.
हिंदूंच्या या निषेधाने बांगलादेश सरकार चक्रावून गेले. त्यांनी ‘इस्कॉन’चे मुख्य चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. याविरोधात हिंदूंनी निदर्शने केली. त्यामुळे शुक्रवार, २९ नोव्हेंबरच्या नमाजानंतर धर्मांध मुसलमानांनी मोठ्या शहरांतील अनेक मंदिरांवर आक्रमणे करून मंदिरांमध्ये स्थापित केलेल्या देवतांच्या मूर्ती उद्ध्वस्त केल्या. बांगलादेश अस्वस्थ आहे, उकळत आहे आणि तो अराजकतेच्या कह्यात गेला आहे. तेथे हिंदू सुरक्षित नाहीत. त्यांची कुटुंबे हिसकावली गेली आहेत आणि त्यांना रात्री झोप येत नाही. ते त्यांच्या आयुष्याशी लढत आहेत; कारण त्यांना मातृभूमी सोडायची नाही !
बांगलादेशातील हिंदूंच्या पाठीशी तुम्ही-आम्ही सर्वांनी खडकासारखे उभे राहिले पाहिजे !
– श्री. प्रशांत पोळ, राष्ट्रचिंतक आणि व्याख्याते, जबलपूर, मध्यप्रदेश. (१.१२.२०२४)
संपादकीय भूमिकाबांगलादेशात हिंदूंचा नरसंहार चालू असतांना त्याविरोधात भारतातील कथित मानवाधिकारवाले, पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी गप्प का आहेत ? बांगलादेशातील हिंदूंच्या पाठीशी तुम्ही-आम्ही सर्वांनी खडकासारखे उभे राहिले पाहिजे ! |