‘पॉप’ आणि ‘रॉक’ या संगीतांच्‍या तुलनेत भारतीय शास्‍त्रीय संगीताचे श्रेष्‍ठत्‍व !

‘पूर्वी भारतात १४ विद्या आणि ६४ कला शिकवल्‍या जात. त्‍यांमध्‍ये ‘संगीत’ कलेच्‍या माध्‍यमातून अनेक जीव साधनाही करत. संगीत हे ईश्‍वराला भावपूर्वक आळवण्‍याचे माध्‍यम होते. संगीतामुळे मानवी जीवन उच्‍चभ्रू झाले होते. आज या भारतीय संगीताची जागा ‘पॉप’ आणि ‘रॉक’ या पाश्‍चात्त्य संगीतांनी घेतली आहे. त्‍यामुळे मानवी जीवन अशांत आणि दुःखाच्‍या गर्तेत जात असून तरुण पिढी भरकटली गेली आहे. याविषयी मासिक ‘ऋषिप्रसाद’ मधील लेखात दिलेले मार्मिक लेखन ‘सनातन प्रभात’च्‍या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

१. संगीत हे ‘सुख आणि शांती’ यांचे माध्‍यम बनण्‍याऐवजी ‘अशांती अन् पतन’ यांचे माध्‍यम होणे 

‘संगीत ही संपूर्ण मानवजातीला परमेश्‍वराकडून मिळालेली एक सुंदर भेट आहे. याच्‍या माध्‍यमातून मानव ईश्‍वराशी भावपूर्वक जोडला जाऊ शकतो. संत सूरदासांप्रमाणे तो त्‍या परमात्‍म्‍याचा हात पकडून साकार रूपात त्‍याला आपल्‍या जवळ आणू शकतो. संगीताच्‍या माध्‍यमातून मनुष्‍य तणावमुक्‍त होऊन त्‍याचे शरीर आणि मन यांना विश्रांती लाभू शकते; परंतु सद्य:स्‍थिती विपरीत दिसून येत आहे. संगीताला ‘सुख आणि शांती’ यांचे माध्‍यम बनवण्‍याऐवजी ‘अशांती आणि पतन’ यांचे माध्‍यम अधिक प्रमाणात बनवले जात आहे.

२. ‘पॉप’ संगीताचा विशिष्‍ट प्रतिकात्‍मक ताल मानवाच्‍या शरिरातील दोन तृतीयांंश पेशींच्‍या शक्‍तीला नष्‍ट करत असणे ! 

तरुण लोक जे बहुधा ‘डिस्‍को’ आणि ‘पॉप’ संगीतांच्‍या कार्यक्रमांना (मैफिलींना) जातात, त्‍यांची श्रवणक्षमता हळूहळू न्‍यून होऊ लागली आहे. ‘पॉप संगीतातील एका विशिष्‍ट प्रतिकात्‍मक तालाचे स्‍वर डा, डा, डा हे शरिरातील दोन तृतीयांश पेशींच्‍या शक्‍तीला नष्‍ट करतात’, असे वैज्ञानिक डॉ. डायमंड यांचे म्‍हणणे आहे. अशा प्रकारच्‍या संगीताने शरिरात तीव्र उत्तेजना निर्माण होते, जी कित्‍येकदा भीषण विकृतीचे रूप धारण करते.

२ अ. ‘पॉप’ आणि ‘रॉक’ संगीत शरिरात तीव्र उत्तेजना निर्माण करतात, हे स्‍पष्‍ट करणारे उदाहरण ! : पॅरिसचे ‘ऑलम्‍पिया संगीत (म्‍युझिक) सभागृह’ (हॉल) श्रोत्‍यांनी खच्‍चून भरले होते. संगीताच्‍या कार्यक्रमाला आरंभ झाला. मधुर स्‍वरलहरींच्‍या प्रभावाने श्रोते नाचू लागले. अकस्‍मात् एक विलक्षण घटना घडली. संगीताची धून पालटली. संगीत ऐकण्‍यात तन्‍मय शांतचित्त झालेले श्रोते पालटलेली धून ऐकून अस्‍वस्‍थता अनुभवू लागले. त्‍यांची उत्तेजना वाढत जाऊन ती नियंत्रणाबाहेर गेली. आपापली जागा सोडून श्रोते वेड्यांसारखे एकमेकांशी संघर्ष करू लागले. त्‍यांनी ‘ऑलम्‍पिया संगीत सभागृहा’मधील आसंद्या तोडल्‍या आणि खिडक्‍यांना लावलेल्‍या काचा फोडल्‍या.

संशोधनाअंती आढळून आले, ‘संपूर्ण घटनेसाठी ती उत्तेजक धूनच कारणीभूत होती, जी प्रथमच प्रयोगासाठी वाजवण्‍यात आली होती.’ त्‍यानंतर ‘रॉक’ आणि ‘पॉप’ यांची संमिश्र धून वाजवण्‍यावर शासनाद्वारे प्रतिबंध करण्‍यात आला.

२ आ. ‘पॉप’ आणि ‘रॉक’ संगीताचे चाहते स्‍वतःला अशांती आणि दुःख यांच्‍या गर्तेतच घेऊन जात असणे : ‘पॉप’ आणि ‘रॉक’ संगीताचा शरीर आणि मन यांवर कसा उत्तेजक प्रभाव पडतो !’, याचे ‘ऑलम्‍पिया संगीत सभागृहा’तील घटना हे ज्‍वलंत उदाहरण आहे. ‘पॉप’ आणि ‘रॉक’ संगीताचे चाहते स्‍वतःला अशांती अन् दुःख यांच्‍या गर्तेतच घेऊन जातात. अशा प्रकारच्‍या संगीतामुळे शरिरात उत्तेजना निर्माण होण्‍याच्‍या समवेतच जठराची कार्यप्रणालीसुद्धा उत्तेजित आणि विचलित होते. लैंगिक केंद्र उत्तेजित झाल्‍याने शरिराच्‍या मौल्‍यवान कामऊर्जेचाही क्षय होतो.

३. भारतीय संगीत चिकित्‍सेच्‍या रूपात (उपचारपद्धतीच्‍या रूपात) इतर संगीत पद्धतींपेक्षा अधिक प्रभावशाली आणि उपयोगी असणे 

विविध प्रयोगांद्वारे मिळालेल्‍या परिणामांच्‍या आधारे संशोधक अशा निष्‍कर्षावर पोचले आहेत की, ‘भारतीय संगीत चिकित्‍सेच्‍या रूपात इतर संगीत पद्धतींपेक्षा अधिक प्रभावशाली आणि उपयोगी आहे.’ प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी त्‍यांच्‍या गायनाने दीर्घकाळापासून अनिद्रेच्‍या रोगाने ग्रस्‍त असलेल्‍या मुसोलिनीला निद्राधीन केले होते. भारतीय शास्‍त्रीय संगीत पूर्णतः मनाला अनुकूल आणि वैज्ञानिक आहे. त्‍याचा आधार सप्‍त स्‍वर आहेत. ज्‍यांच्‍यामुळे विविध विकारांचे शमन होते. त्‍यातील विविध रागही वेगवेगळ्‍या व्‍याधींवर गुणकारी आहेत, उदा. राग भैरवी आणि राग सोहनी यांनी डोकेदुखी अन् मज्‍जारज्‍जूंचे विकार दूर होतात. राग मुलतानी, राग रामकली आणि राग सारंग या रागांनी क्षयरोग, राग बसंत आणि राग सौरठ या रागांनी नपुंसकता, राग भूप आणि राग मारव यांनी आतड्यांचे विकार इत्‍यादी विकारांमध्‍ये रागांचा लाभ होतो. आसावरी रागाने मेंदूचे रोग १०० टक्‍के बरे होतात.

४. तालबद्ध शास्‍त्रीय संगीत मनुष्‍याला शारीरिक आणि मानसिक रूपाने निरोगी ठेवण्‍यास सक्षम असणे 

वेगवेगळ्‍या तालांचाही विविध व्‍याधींवर सकारात्‍मक प्रभाव पडतो. तालांचा संबंध शरिराच्‍या विविध आध्‍यात्‍मिक चक्रांशी आहे, उदा. केरवा- मूलाधार, दादरा-स्‍वाधिष्‍ठान, झपताल-मणिपूर, चौताल-अनाहत, त्रिताल-विशुद्ध इत्‍यादी. अशा प्रकारे लय आणि तालबद्ध भारतीय शास्‍त्रीय संगीत मनुष्‍याला शारीरिक आणि मानसिक रूपाने निरोगी ठेवण्‍यास सक्षम आहे.’

(साभार : मासिक ‘ऋषिप्रसाद’, ऑक्‍टोबर २००६)

(संदर्भ : ‘ऋषि प्रसाद’, अक्‍टूबर २००६)

व्‍यक्‍तींमधील रज-तम गुण भारतीय संगीत ऐकल्‍याने लवकर न्‍यून होऊन सत्त्वगुण वाढण्‍यास साहाय्‍य होते !

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय विविध उपकरणांच्‍या साहाय्‍याने करत असलेल्‍या संगीत संशोधनातही भारतीय संगीतामुळे व्‍यक्‍तींमधील नकारात्‍मक ऊर्जा अल्‍प होऊन त्‍यांची सकारात्‍मक ऊर्जा वाढत असल्‍याचे लक्षात आले, म्‍हणजेच व्‍यक्‍तींमधील रज-तम गुण भारतीय संगीत ऐकल्‍याने लवकर न्‍यून होऊन सत्त्वगुण वाढण्‍यास साहाय्‍य होते. यावरून भारतीय संगीत हे अधिक सात्त्विक असल्‍याचा अभ्‍यास झाला. त्‍यामुळेच ‘भारतीय संगीताला ‘दैवी संगीत’ का म्‍हणतात ?’, हे लक्षात येते.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के, वय ४७ वर्षे), संगीत विशारद, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (१५.११.२०२४)