‘अलीकडे समाजाला बाह्य गोष्टींचे पुष्कळ आकर्षण आहे. त्यामुळे ‘प्रत्यक्ष आहे, तसे दिसणे अन् कसे आहोत, ते दाखवणे’ यांत भेद जाणवतो. काळानुसार मानवातील सात्त्विकतेचे प्रमाण घटत गेले, तसे बाह्य गोष्टींतून सौंदर्यसाधने निर्माण केली गेली. त्याचा परिणाम म्हणजे सध्याची सौंदर्यवर्धनालये (ब्युटीपार्लर) ! आताच्या काळात स्त्रियांप्रमाणेच पुरुषांचीही सौंदर्यवर्धनालये आहेत. साधनेचे तेज असणार्यांना अशा सौंदर्यसाधनांची आवश्यकता नसते, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येईल.
१. तपस्येचे तेज, साधेपणा आणि मनाची सुयोग्य घडण, हेच स्त्रियांचे सौंदर्य असणे, तर तपश्चर्या, कर्तृत्व अन् धर्मपरायणता, हे पुरुषांचे सौंदर्य असणे
आधीच्या युगातील स्त्रिया या दैवी गुणांनी युक्त असल्याने त्यांच्यामध्ये तपस्येचे तेज आणि योगसाधनेचे दैवी सौंदर्य दिसत असे, उदा. द्रौपदीच्या शरिराला येणारा सुगंध योजनेपर्यंत (४ कोसापर्यंत, अंदाजे १२.८ कि.मी.) जाणवत असल्याने तिला ‘योजनागंधा’, असे संबोधले जायचे. ‘पूर्वी स्त्रिया सात्त्विक असल्याने त्यांचा ‘सुस्वभाव, साधेपणा आणि मनाची घडण’ हेच त्यांचे सौंदर्य आहे’, असे म्हटले जायचे. त्याचप्रमाणे कर्तृत्व, धर्मपरायणता आणि तपश्चर्या हे पुरुषांचे सौंदर्य मानले जायचे, उदा. स्वामी समर्थ यांचे अस्तित्व अष्टगंधाच्या सुगंधातून लक्षात यायचे. प्रभु श्रीराम अरण्यात राहूनही तेजस्वी दिसायचे आणि क्षत्रिय असल्याचे लक्षात यायचे.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दैवी सौंदर्य !
पूर्वी एकदा मी चित्रीकरणाशी संबंधित सेवेत असतांना तिथे परात्पर गुरु डॉक्टर आले. तेव्हा आम्हा दोघांमधे पुढील संभाषण झाले.
परात्पर गुरु डॉक्टर : पुरुषांसाठी शृंगारकक्ष (मेकअप रूम) असतो का ?
मी (सौ. साक्षी जोशी) : हो.
परात्पर गुरु डॉक्टर : मलाही सौंदर्यवर्धन (मेकअप) करावे लागणार का ?
मी : तुम्हाला सौंदर्यवर्धन करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मुळातच सुंदर आहात.
परात्पर गुरु डॉक्टर : ही बोलण्यात हुशार आहे.
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये तपाचे दैवी सौंदर्य असल्याचे साधकांनी अनुभवले असणे : तेव्हा माझ्या मनात ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे सौंदर्य हे दैवी, म्हणजे तप आणि योगसाधना यांमुळे आहे’, असा विचार होता आणि हे सत्यही आहे. यात माझी काहीच हुशारी नाही. गुरुदेव, हे जे आहे, ते सर्व तुमचेच आहे. आम्ही साधकांनी तुम्ही येण्यापूर्वी वातावरणातला गारवा अनुभवला आहे. तुम्ही येण्याआधी आम्हाला चंदनाचा सुगंध येतो. हा अनुभव अनेक वेळा मी आणि अनेक साधकांनीही घेतला आहे. हे तुमच्या योगसाधनेचे सौंदर्य आहे. तुम्ही साधकांमध्येही हा अनुभव घेण्याची पात्रता निर्माण केली आहे.
२ आ. ‘हिंदु राष्ट्रा’चे शिवधनुष्य पेलणारे आणि साधकांमध्येही ते उचलण्याचे सामर्थ्य निर्माण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कर्तृत्व असामान्य असून तेच त्यांचे दैवी सौंदर्य असणे : गुरुदेव, तुम्ही विश्वकल्याणासाठी साधक घडवणारे आणि त्यांच्याकडून साधना करवून घेऊन त्यांना मोक्षाला नेणारे ज्ञानगुरु आणि मोक्षगुरु आहात ! ‘हिंदु राष्ट्रा’चे शिवधनुष्य उचलणारे आणि साधकांमध्येही ते उचलण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याचे तुमचे धाडसी कर्तृत्व असामान्य आहे. तेच तुमचे खरे आणि दैवी सौंदर्य असून ते आता सर्व जगाच्याही लक्षात येत आहे. अशा असामान्य अवतारी दैवीरूपाला सौंदर्यवर्धनाची काय आवश्यकता आहे ?’
– सौ. साक्षी नागेश जोशी, फोंडा, गोवा.