मिरज (जिल्हा सांगली), १७ नोव्हेंबर (वार्ता.) – या देशात पैशांची न्यूनता नाही; परंतु प्रामाणिकपणे काम करणार्या नेत्यांची कमतरता आहे. योग्य विचार आणि पक्ष यांची देशाला आवश्यकता आहे. घटनेची मूलभूत तत्त्वे कुणीही पालटू शकत नाही. काँग्रेसने देशाच्या आर्थिक धोरणाला धक्का दिल्यामुळे देशाची हानी झाली आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केला. येथील भाजपचे उमेदवार आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ येथील किसान चौक येथे १६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर भाजपचे आमदार सुरेश खाडे यांसह विकास सूर्यवंशी, नीताताई केळकर, जनसुराज्य युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम, राजाराम गरूड यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले की, सुरेश खाडे यांनी सांगली जिल्हा आणि मिरज भाग यांचा पूर्ण विकास करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांसह इतर नेत्यांनी सांगली जिल्ह्यातील विकासकामांसाठी माझ्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळे गेल्या १० वर्षांत १८ विकासकामे मान्य करून त्यासाठी १२ सहस्र कोटी रुपये दिले आहेत. सांगली जिल्ह्यातील अनेक लोकांच्या मागणीवरून सांगली ते पेठनाका पर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेतले. त्याचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. काँग्रेसने जातीयवादाचे विष पसरवून लोकांना तोडण्याचा प्रयत्न केले आहे.