हद्दपारीचे साधारणत : ५० हून अधिक प्रस्तावही मान्य !

सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज !

प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीचे साधारणत: ५० हून अधिक प्रस्तावही मान्य करण्यात आले आहेत. आतापर्यंत २ कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये साधारणत: ९२ लाख रुपये रोख रक्कम, ६५ लाख रुपयांहून अधिक किमतीचे अवैध मद्य, ५३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा, ७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा गांजा, त्याचसमवेत ३ लाख रुपये किमतीचे मौल्यवान धातू असा माल जप्त करण्यात आलेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात निवडणुकीशी संबंधित एकूण ५ गुन्हे नोंद आहेत. त्यांचे अन्वेषण चालू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

संदीप घुगे पुढे म्हणाले की,

१. जिल्ह्यात २० नोव्हेंबर या दिवशी मतदान होत आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील ८ मतदारसंघांत मुक्त, निर्भय, नि:पक्ष वातावरणात आणि शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.

२. ८ विधानसभा मतदारसंघांसाठी ८ ‘स्ट्राँग रूम’ सिद्ध करण्यात आल्या असून त्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक शांततेत, मुक्त आणि नि:पक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस विभाग प्रयत्न करत आहे.

३. पोलीस विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये ९ अग्नीशस्त्रे जप्त केली आहेत. इतर २७ प्रकारची विविध तीक्ष्ण हत्यारे जप्त केली आहेत. जिल्ह्यात साधारणत: २ सहस्र ४०० परवानाधारक शस्त्रे असून सर्व शस्त्रे जमा करण्याची कार्यवाही पोलीस विभागाकडून पार पाडण्यात आली आहे.

४. यापूर्वी गुन्हे नोंद असलेल्या जिल्ह्यातील सर्व आरोपी व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. विशेष करून एम्.पी.डी.ए. आणि मकोका या कायद्यांतर्गतही कारवाया करण्यात आल्या आहेत.

५. जिल्ह्याला कर्नाटक राज्याची आंतरराज्य सीमा आहे. ज्यावर ९ आंतरराज्य ‘चेक पोस्ट’ (पडताळणी नाके) आचारसंहिता लागलेल्या दिनांकापासून कार्यान्वित करण्यात आले आहेत.