पुणे महापालिकेच्या आवारात शिरस्त्राणसक्ती करण्याचा आदेश !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – पुणे महापालिका भवनाच्या आवारात, तसेच महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय, अन्य कार्यालये यांच्या आवारात दुचाकी वापरणारे कर्मचारी आणि अधिकारी यांना शिरस्त्राणसक्ती करण्यात आलेली आहे. शिरस्त्राण नसेल तर आवारात प्रवेश देऊ नये आणि गाडी लावू देऊ नये, असे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी काढले आहेत. देशभरात रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यात दुचाकीच्या अपघातांची संख्या अधिक असून शिरस्त्राण न वापरल्याने प्राणांतिक अपघातांची संख्या अधिक आहे. शिरस्त्राणाचा वापर केल्यास डोक्याला मार लागण्यापासून बचाव होऊ शकतो आणि त्यातून अनेकांचे प्राण वाचू शकतात. पुणे शहरामध्ये शिरस्त्राण वापरण्याचे प्रमाण अल्प आहे. राजकीय पक्ष आणि संस्था यांकडूनही शिरस्त्राण सक्तीला विरोध केला जातो. त्यामुळे शहरात केवळ सीसीटीव्हीद्वारे शिरस्त्राण न वापरणार्‍या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाते.

अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी काढलेल्या आदेशाची कार्यवाही न झाल्यास संबंधित कर्मचारी, तसेच विभाग प्रमुख यांवर कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय कर्मचार्‍यांना शिरस्त्राण वापरणे बंधनकारक असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकारी, तसेच कर्मचार्‍यांच्या महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असून त्यानुसार दंड आकारणी, तसेच याची नोंद ‘सेवा पुस्तका’त केली जाणार आहे, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

संपादकीय भूमिका :

जनतेला शिस्त न लावल्यामुळे किमान ‘महापालिकेच्या आवारात तरी शिरस्त्राणसक्ती करा’, असा आदेश काढावा लागणे, हे दुर्दैवी !