मुंबई, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे; मात्र अद्यापही सुरक्षेच्या दृष्टीने केले जाणारे राज्य सुरक्षा नियोजन (स्टेट सिक्युरिटी प्लानिंग) सिद्ध झालेले नाही, अशी खात्रीशीर माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाद्वारे राज्य सुरक्षा नियोजन सिद्ध केले जाते. निवडणुकीच्या पूर्वी राज्य सुरक्षितता नियोजन आराखडा गृहविभागाकडून निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला जातो. यामध्ये नक्षलग्रस्त भागात मतदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेली उपाययोजना, नक्षलग्रस्त भागातील मतदारपेट्या सुरक्षितस्थळी हलवण्याचे नियोजन, राज्यातील संवेदनशील भागांतील सुरक्षाव्यवस्था आदी संवेदनशील विषय या नियोजनामध्ये असतात. हे नियोजन लवकरात लवकर प्राप्त व्हावे, यासाठी मागील ८ दिवसांपासून राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून पाठपुरावा केला जात आहे; मात्र अद्यापही सुरक्षेचे नियोजन निवडणूक आयोगाला प्राप्त झालेले नाही. राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून हे नियोजन प्राप्त झाल्यानंतर पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचे निवडणुकीच्या काळातील प्रत्यक्ष एकत्रित नियोजन केले जाते.
याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये माहिती घेतली असता ‘राज्य सुरक्षितता नियोजन पूर्ण करण्यासाठी आणखी २ दिवस लागतील’, असे सांगण्यात आले. २० नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी २८८ मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबर या दिवशी निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे.