जया अंगी चैतन्य। तो नर भाग्यवान।।

‘जया अंगी मोठेपण। तया यातना कठीण।।’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा भावार्थ माझी स्थिती, आध्यात्मिक पातळी आणि परिस्थिती यांनुसार मी लावतो. ज्या वेळी माझ्यावर संकटे येतात, तेव्हा त्यांत स्थिर रहाण्यासाठी मी हा अभंग आठवून वेळ निभावून नेतो. ‘काही चांगले केले, तर कर्तेपणामुळे मी श्रेय लाटून स्वत:ला मोठे समजतो आणि मी किती यातना सहन करत आहे ?’, असे सांगून स्वकौतुक करत असतो. माझ्या भ्रमाचा भोपळा ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करत असल्याने फुटत आहे. श्री गुरु म्हणजे सगुणातील भगवंत सर्वांचा कर्ता-करविता असतांना मला मोठेपणा का जाणवावा ? मला यातना का व्हाव्यात ? त्यासाठी चुका स्वीकारणे, कमीपणा घेणे, शिकण्याच्या स्थितीत रहाणे, इतरांचा विचार करणे, निरपेक्ष प्रेम करणे इत्यादी गुण अंगीकारण्याचा प्रयत्न केल्यामुळे मला आनंद मिळत आहे. या विषयीचे कवितापुष्प परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञतेने अर्पण करत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जया अंगी मोठेपण।
तया यातना कठीण।। १।।

जया अंगी ‘मी’पण।
कर्तेपणाने ग्रासले जाण।। २।।

पू. शिवाजी वटकर

जया अंगी अहंपण।
पुनरपि जन्म पुनरपि मरण।। ३।।

जया अंगी ईश्वरी गुण।
तयासी लाभे अनुसंधान।। ४।।

आपत्काळी त्रासले जन।
साधनेने (टीप १) होईल रक्षण।। ५।।

जयाचे स्वभावदोष न्यून।
तयाचे होते नामस्मरण।। ६।।

जया अंगी मोठेपण।
जावे गुरूंशी शरण।। ७।।

जया यातना कठीण।
हृदयी धरावे गुरुचरण।। ८।।

जो करी आज्ञापालन (टीप २)।
गुरुकृपा होईल जाण।। ९।।

गुरुप्राप्तीने होई कल्याण।
सापडेल आनंदाची खाण।। १०।।

जया अंगी चैतन्य।
तो नर भाग्यवान।। ११।।

टीप १ – कालानुरूप ‘गुरुकृपायोगा’सारख्या विहंगम साधना मार्गानुसार साधना करणे
टीप २ – साधनेमध्ये ‘श्री गुरूंचे आज्ञापालन करणे’ हा सर्व गुणांचा राजा आहे.’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक