K.P.Oli To Visit China First : नेपाळचे नवे पंतप्रधान भारताऐवजी प्रथम चीनच्या दौर्‍यावर जाणार !

भारताने आमंत्रण न दिल्याचा दावा !

के.पी. शर्मा ओली चीन दौर्‍यावर

काठमांडू (नेपाळ) – नेपाळचे नवे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली त्यांच्या पहिल्या अधिकृत परदेश दौर्‍यावर चीनला जात आहेत. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी ओली यांना २ ते ६ डिसेंबर या कालावधीत अधिकृत भेटीसाठी आमंत्रित केले आहे. नेपाळमध्ये अशी परंपरा आहे की, जो कुणी नवा पंतप्रधान होतो, तो प्रथम भारताला भेट देतो. ओली यांच्या जवळच्या सल्लागारांनी ‘काठमांडू पोस्ट’ला सांगितले की, त्यांना आशा होती की, भारत ही परंपरा कायम ठेवेल; परंतु पदभार स्वीकारल्यानंतर ४ महिन्यांनंतरही भारताकडून कोणतेही औपचारिक निमंत्रण मिळालेले नाही. सहसा नेपाळच्या पंतप्रधानांना पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच भारतातून निमंत्रण मिळते.

के.पी. ओली

के.पी. ओली हे ऑगस्ट २०१५ मध्ये पहिल्यांदा नेपाळचे पंतप्रधान झाले. यानंतर त्यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये भारताला भेट दिली. मार्चमध्ये ते चीनला गेले. ओली आतापर्यंत ४ वेळा नेपाळचे पंतप्रधान झाले आहेत. ओली यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात अनेक भारतविरोधी पावले उचलली होती. त्यांच्या काळातच नेपाळ सरकारने वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध केला होता.

संपादकीय भूमिका

नेपाळ चीनचा बटिक बनल्याने आणि त्याने भारताशी एकाअर्थी वैर पत्करल्याने त्याचे पंतप्रधान भारतात आले काय किंवा न आले काय ?, यात काहीच भेद नाही !