उद्या कार्तिक शुक्ल नवमी (१०.११.२०२४) या दिवशी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला उडुपी, कर्नाटक येथील कु. सात्त्विक सुधींद्र राव याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आत्या, आई आणि वडील यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. सात्त्विक सुधींद्र राव याला ७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. वय जन्म ते १ वर्ष
अ. ‘बाळाचा जन्म होत असतांना मला पुष्कळ आनंद होत होता.
आ. बाळाला रुग्णालयातून घरी आणतांना प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावली होती. आमची गाडी घराजवळ थांबली. तेव्हा घरात प.पू. भक्तराज महाराज यांची आरती चालू होती. दोन्ही वेळी मला गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अस्तित्व जाणवले आणि माझा भाव जागृत झाला.
इ. नामकरणाच्या दिवशी ‘बाळ भगवंताच्या अनुसंधानात आहे’, असे मला वाटत होते.’
– सौ. सुधा गुरुप्रसाद (चि. सात्त्विकची आत्या), भद्रावती, शिवमोग्गा.
ई. संतांचा सत्संग लाभणे : ‘चि. सात्त्विक अनुमाने २ मासांचा असतांना त्याला पू. (श्रीमती) राधा प्रभु (सनातनच्या ४४ व्या [समष्टी] संत), पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे [समष्टी] संत) आणि पू. भार्गवराम प्रभु (सनातनचे पहिले बालसंत, वय ७ वर्षे) यांचा सत्संग लाभला.
२. वय १ ते २ वर्षे
२ अ. देवता आणि संत यांची आवड असणे
१. सात्त्विकला सनातन संस्थेच्या उत्पादनांवर असलेले मानचिन्ह (लोगो) पाहून आनंद होत असे. त्याला सनातन पंचांग पुष्कळ आवडते. तो त्यातील देवता, राष्ट्रपुरुष आणि संत हे सर्व बोटाने दाखवत असे.
२. एकदा आम्ही त्याला ‘तू परात्पर गुरु डॉक्टरांना पहायला जाणार का ?’, असे विचारले. तेव्हा तो लगेच घरातून बाहेर गेला आणि गुरुदेवांचे छायाचित्र हातात घेऊन स्वतःच्या भाषेत काहीतरी बोलू लागला.
३. वय २ ते ३ वर्षे
३ अ. प्रेमभाव : त्याच्या आजीला खोकला आला किंवा तिला काहीतरी त्रास झाला, तर तो लगेच तिच्या पाठीवर हात फिरवत असे.
३ आ. गुरूंप्रति भाव : एकदा त्याने घरातील ५ आसंद्या व्यवस्थित लावल्या. आम्ही विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘आजोबा (प.पू. भक्तराज महाराज) आणि स्वामी आजोबा (परात्पर गुरु डॉक्टर) येणार आहेत.’’
४. वय ४ ते ६ वर्षे
४ अ. तो भगवद्गीतेतील श्लोक लिहितो आणि काही श्लोक म्हणतो.’
– सौ. प्रज्ञा राव (चि. सात्त्विकची आई), उडुपी, कर्नाटक.
४ इ. झाडांविषयी प्रेम असणे : ‘एकदा आमच्या शेजारची एक व्यक्ती नारळाचे झाड कापून टाकत होती. तेव्हा त्याला पुष्कळ वाईट वाटले. तो ‘झाड कापू नका’, असे त्यांना हाताने खुणावत होता.
– श्री. सुधींद्र राव (चि. सात्त्विकचे वडील)
(सर्व सूत्रांचा दिनांक ३०.६.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |