कॅनडा येथील हिंदु सभा मंदिरावर ‘कॅनडाचे शासन आणि प्रशासन प्रणीत’ आक्रमणाचा आता भारताकडून निषेध होऊ लागला आहे. होय, हे आक्रमण ‘कॅनडा शासन आणि प्रशासन प्रणीत’ अशासाठी की, कॅनडा सरकारने पोसलेल्या खलिस्तानी आतंकवाद्यांनी हे आक्रमण केले आहे आणि कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी केवळ तोंडदेखला निषेध केला आहे. ‘तू मार मग मी निषेध करतो’, असे ठरवल्याप्रमाणे ते आहे. ज्या खलिस्तानी आतंकवाद्यांनी मंदिरावर आक्रमण करून हिंदूंवर लाठीमार केला, त्यात कॅनडाच्या पोलीस अधिकार्यांचाही समावेश आहे, त्यामुळे ते ‘प्रशासनप्रणीतही’ आहे. ही गोष्ट प्रसारित झाल्यावर कॅनडा सरकारने त्या पोलीस अधिकार्याला निलंबित केले आहे. खलिस्तानी आतंकवादी झेंड्यांच्या जाड काठ्यांनी हिंदूंना मारत असतांना तेथील पोलिसांनी खलिस्तान्यांना थांबवणे तर दूरच, उलट खलिस्तान्यांना उघडपणे साहाय्य केले; त्यामुळे आक्रमण झेलणार्या हिंदु भाविकांचेही खच्चीकरण झाले. त्यांनाही काय करावे ते सुचेना; परंतु त्यांनी त्याचे व्हिडिओ काढून प्रसारित केल्यामुळे ‘तेथील पोलीस खलिस्तान्यांना कसे मिळाले
आहेत ?’, ते जगासमोर आले आहे. मंदिरात जमलेल्या हिंदूंना झेंड्याच्या काठ्यांनी जोरजोरात मारहाण करत असल्याचे व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. याचा तीव्र निषेध देश-विदेशांतील सर्व हिंदूंकडून व्हायला हवा. येथील व्हिक्टोरिया भागातील मंदिरावर पोलीस अधिकार्यांनीच हिंदु भाविकांवर आक्रमण करण्याची दुसरी घटनाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडली. जगभर हिंदूंचा सर्वांत मोठा सण साजरा होत असतांना त्याच दिवसांत त्यांच्या मंदिरांवर कॅनडाचे सरकार थेट पोलिसांच्या माध्यमातूनच आक्रमण करत आहे. खलिस्तान्यांच्या ‘भारतविरोधी’ मोहिमेला ट्रुडो सरकारने एक प्रकारे उघड अनुमतीच दिली आहे. त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्यासह खलिस्तानसमर्थक उघडपणे वावरत आहेत.
यापूर्वी अमेरिका आणि ब्रिटन येथे मंदिरांवर आक्रमणे झाली आहेत. ब्रिटनमध्ये वर्ष २०२२ मध्ये एकाच दिवशी २ हिंदु मंदिरांवर तेथील मुसलमानांनी आक्रमण केले. विदेशातील इस्कॉन मंदिरांवरही आक्रमणे झाली आहेत. २४ सप्टेंबरला कॅलिफोर्नियामध्ये सॅक्रोमेंटो येथील आणि त्याच्याच १० दिवस आधी न्यूयॉर्कमधील स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तानी आतंकवाद्यांनीच आक्रमण केले. त्यांनी तेथे ‘हिंदूंनो परत जा’, अशा घोषणाही लिहिल्या. २३ जुलैला कॅनडातील ओटावा येथील स्वामीनारायण मंदिरावरील आक्रमणांत ख्रिस्त्यांनी ‘आर्य हिंदु आतंकवादी हे कॅनडाविरोधी आहेत’, असे वाक्य लिहिले होते. त्या वेळी मंदिरांच्या अध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले.
हिंदूंची एकजूट
अमेरिका आणि ब्रिटन या दोन्ही ठिकाणी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होत असतांनाच त्यात आता कॅनडाची भर पडली आहे. कॅनडाने भारताशी आता उघड उघड पूर्ण शत्रुत्व घेतले आहे. हिंदू सहिष्णु असल्याने ते जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी आतापर्यंत अशा घटनांवर प्रत्युत्तर देत नव्हते; मात्र आता दोन्ही देशांत हिंदू घराबाहेर पडून, एकत्र येऊन याविरोधात आंदोलने करू लागले आहेत. कॅनडातही हिंदूंनी या आक्रमणाचा शांततापूर्ण; परंतु जगाला ऐकू जाईल एवढा जोरदार निषेध केला. ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्या काही हिंदूंना तेथील पोलिसांनी कह्यात घेतले. या घटनेनंतर मंदिराच्या पुजार्यांनी हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘‘बटोगे तो कटोगे (विभक्त व्हाल, तर मारले जाल). हे आक्रमण केवळ या मंदिरावरील नाही, हे आक्रमण विश्वभरातील हिंदूंवरील आहे. आपल्याला पुढच्या पिढीचा विचार करावा लागेल. आपल्याला एक व्हावेच लागेल.’’
कॅनडाची आर्थिक कंबर मोडा !
कॅनडात ८ लाख हिंदू आहेत. अमेरिकेप्रमाणेच कॅनडातील विविध उद्योग, वैद्यकीय क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रांत कार्यरत राहून हिंदू कॅनडातील समाज आणि आर्थिक व्यवस्था यांचा मोठा आधार बनले आहेत. कॅनडा प्रगत देशांच्या सूचीमध्ये असण्यात त्यांचाही वाटा आहे; परंतु ट्रुडो सरकारला त्यांच्या मतांची किंमत नाही. हिंदूंपेक्षा संख्येने न्यून असणार्या शिखांची मते त्यांना महत्त्वाची वाटतात. तेथील संसदेत हिंदूंचे खासदारही निवडून आले आहेत. अमेरिकेप्रमाणेच हिंदूंच्या २-३ पिढ्या तिथे आहेत. असे असतांना हिंदूंनी एक तर कॅनडा सरकारवर प्रचंड दबाव आणून खलिस्तान्यांवर बंधने घालणे भाग पाडले पाहिजे किंवा सरकारची आर्थिक कोंडी करण्याचे भय दाखवून सरकारला त्यांच्या संरक्षणाचे दायित्व घेणे भाग पाडले पाहिजे. ‘आज प्रगत कॅनडाच्या जडणघडणीत भारतियांचा मोठा सहभाग आहे’, याची जाणीव हिंदूंनी त्याला करून दिली पाहिजे. तेथील विरोधी पक्ष नेते हिंदूंच्या बाजूने बोलत आहेत. त्याचा लाभ हिंदूंनी उठवला पाहिजे. थोड्याच दिवसांत कॅनडामध्येही निवडणुका होणार आहेत. ट्रुडो त्या अनुषंगाने तेथील शिखांच्या मतांसाठी खलिस्तानी आतंकवाद्यांचे लांगूलचालन आणि संरक्षण करत आहेत अन् हिंदूंचा द्वेष करत आहेत. भारताच्या विरोधात पुराव्याविना आरोप करत आहेत. ‘हिंदू शिखांपेक्षा अधिक असल्याने हिंदूंच्या मतांचाही प्रभाव पडू शकतो’, हे तेथील हिंदूंनी लक्षात घेऊन ट्रुडो सरकारला त्यांच्या अस्तित्वाची आणि संरक्षणाची नोंद घेणे भाग पाडले पाहिजे. तसे झाले, तर आता हिंदूंनी मंदिरात केलेल्या आंदोलनाची ती फलनिष्पत्ती असेल. कॅनडातील ओटावा येथील मंदिरात विश्वस्तांनी खलिस्तानी राजकीय नेत्यांना मंदिराच्या व्यासपिठाचा वापर राजकीय हेतूने करण्यास बंदी घातली आहे.
भारतातील हिंदूंचे दायित्व
केवळ आशिया खंडातील भारताच्या शत्रूदेशांतीलच नव्हे, तर कॅनडा आणि अमेरिका येथील हिंदूंचे अस्तित्वही आता धोक्यात आहे. भारतातील हिंदूंनी त्यांना आश्वासक पाठिंबा दिला, तर त्यांना तिथे लढण्यास बळ मिळेल. भारतातील हिंदूंची एकजूट किती महत्त्वाची आहे ? हे यातून लक्षात येईल. सध्या भारतातील हिंदूच असुरक्षितता अनुभवत आहेत. त्यांनी येथेही त्यांची एकजूट दाखवून त्यांचे अस्तित्व सुरक्षित केले पाहिजे आणि विदेशातील हिंदूंनाही साहाय्य केले पाहिजे. सामाजिक माध्यमातून त्यांच्या बाजूने विधाने प्रसारित करून त्यांना पाठिंबा दिला, तर ‘भारतातील हिंदूंचे तेथील हिंदूंना समर्थन आहे’, हे लक्षात येईल. त्याखेरीज ‘भारत तेथील हिंदूंच्या पाठीमागे आहे’, ‘जगभरातील हिंदू एक आहेत’, हे संदेश त्यातून जातील. मुसलमानांच्या विरोधात काही झाले, तरी जगभर त्याचे पडसाद उमटतात, तसेच हिंदूंच्या संदर्भात आता झाले पाहिजे !
भारतातील हिंदूंनी कॅनडातील हिंदूंना पाठिंबा दिला, तर ‘हिंदु सारा एक’ हा संदेश जगभरात जाईल ! |