नालासोपार्‍यात तिकीट तपासनीसाचा उद्दामपणा आणि अरेरावी !

  • रेल्वेत मराठीत न बोलण्याचे मराठी दांपत्याकडून लेखी आश्‍वासन घेतले !

  • निलंबनाची कारवाई !

नालासोपारा (जिल्हा ठाणे) – येथे रेल्वेतील तिकीट तपासनीसाने पाटील आडनावाच्या एका मराठी दांपत्याकडून ‘रेल्वेमध्ये मराठी बोलणार नाही’, असे लेखी आश्‍वासन घेतले. या प्रकरणी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. रितेश मौर्य असे तिकीट तपासनीसाचे नाव आहे. तपासनीसाच्या कार्यालयात या दांपत्याला डांबून ठेवण्यात आले होते. याविषयीचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला आहे. यानंतर नालासोपारा रेल्वेस्थानकात मराठी एकीकरण समितीने ठिय्या आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला खडसवले. यानंतर मौर्य यांना निलंबित करण्यात आले.
अमित पाटील सपत्नीक प्रवास करत असतांना मौर्य यांनी त्यांना तिकीट पहाण्यासाठी थांबवले. मौर्य यांची भाषा पाटील यांना समजली नाही. त्यामुळे ते मराठीत बोलू लागले. तेव्हा मौर्य यांनी अरेरावी करत सांगितले, ‘‘हम इंडियन है । हिंदी में बोलेंगे, रेल्वे में मराठी नहीं चलेगी ।’’ त्यानंतर पाटील दांपत्याला तेथील कार्यालयात बसवून ठेवण्यात आले. या प्रकरणाचा व्हिडिओ चित्रीत करतांना संबंधितांनी तो बळजोरीने भ्रमणभाषमधून काढण्यास सांगितल्याचाही आरोप आहे.

संपादकीय भूमिका

मराठीला अभिजात (उच्च) भाषेचा दर्जा मिळाल्यावरही होणारा मराठीद्वेष दुर्दैवी ! अशांना बडतर्फच करायला हवे !