नरकचतुर्दशीला श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित करण्यास प्रारंभ !

(काकडा ही पूर्वी वापरली जाणारी मशालीसारखी वस्तू आहे. काठीला फडके गुंडाळून ते तेल, रॉकेल किंवा इतर ज्वलनशील पदार्थात बुडवून आग लावण्यात येते.)

श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या शिखरावर लावण्यात येणारा काकडा प्रज्वलित करतांना भाविक, श्रीपूजक

कोल्हापूर, १ नोव्हेंबर (वार्ता.) – श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात नरकचतुर्दशीला मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित करण्यात आला. गेल्या २५० वर्षांपेक्षा अधिक काळ ही परंपरा चालू असून हा काकडा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत (१५ नोव्हेंबरपर्यंत) प्रज्वलित केला जाणार आहे. मशालीच्या मंद उजेडात पहाटे २.३० वाजता मंदिराच्या शिखराच्या टोकावर काकडा प्रज्वलित केला जातो. राज्यात केवळ कोल्हापूर येथेच अशा प्रकारचा सोहळा होतो.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित करण्यासाठी जातांना भाविक

श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे शिखर ४० फूट उंच असून एवढ्या उंच शिखरावर केवळ दगडी टप्प्यांचा आधार घेत मुख्य शिखराकडे पाठ करून चढावे लागते. मुख्य शिखरावर पश्चिमेकडील बाजूला सर्वांत उंचावर कापूर प्रज्वलित केला जातो. त्यासाठी एका हातात पेटता काकडा आणि दुसर्‍या हाताने दगडी टप्प्याला धरत शिखरावर एका दमात पोचावे लागते. हातात काकडा घेऊन मुख्य शिखराकडे पाठ करून वर चढणे आणि तो प्रज्वलित करून पुन्हा खाली उतरणे ही सेवा श्री महालक्ष्मीदेवीवर श्रद्धा असलेल्या निस्सीम भक्तीमुळेच भाविक करू शकतात.

मुख्य शिखरानंतर परिसरातील इतर देवतांपुढे काकडा फिरवून पितळी उंबर्‍यावर कापूर लावून देवीचा मुख्य गाभारा उघडला जातो. सनईचा मंद सूर आणि गायन सेवा अशा वातावरणात हा सोहळा होतो. त्यानंतर देवीची पहाटे काकड आरती होते.