Bangladesh Interim Govt Threatens India : (म्हणे) ‘जर भारताने शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला, तर कडाडून विरोध करू !’

बांगलादेशातील अंतरिम सरकारची भारताला पुन्हा एकदा धमकी

बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारतातील आश्रयावरून बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे कायदेशीर सल्लागार आसिफ नजरुल यांनी म्हटले आहे, ‘जर भारताने शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला, तर त्यांचा देश त्याला कडाडून विरोध करेल.’ बांगलादेशाच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने हसीना यांच्याविरोधात अटक वॉरंट काढल्यानंतर नजरुल यांनी हे वक्तव्य केले आहे. न्यायाधिकारणाने अधिकार्‍यांना शेख हसीना आणि ४५ सहआरोपी यांना १८ नोव्हेंबरपर्यंत उपस्थित करण्याचा आदेश दिला आहे. बांगलादेशात शेख हसीना यांच्याविरुद्ध अनुमाने २०० खटले प्रलंबित आहेत, त्यांपैकी बहुतांश विद्यार्थी आंदोलनाच्या काळात झालेल्या हत्यांशी संबंधित आहेत.

१. एका बांगलादेशी वृत्तवाहिनीशी बोलतांना आसिफ म्हणाले की, भारतात कायदेशीर व्यवस्था आहे; परंतु हसीना यांनी प्रामाणिक स्वीकृती दिल्यास त्यांना परत (बांगलादेशात) पाठवण्यास भारत निश्‍चितच बांधील राहील.

२. बांगलादेश आणि भारत यांच्यात आधीच प्रत्यार्पण करार आहे. हसीना यांच्या सद्यःस्थितीविषयी माहिती देतांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, शेख हसीना सुरक्षेच्या कारणास्तव अतिशय अल्प वेळेत येथे आल्या आणि अजूनही त्या येथे आहेत.

संपादकीय भूमिका

जर बांगलादेशात हिंदूंवर एकही आक्रमण झाले, तर भारताचे सैन्य बांगलादेशात घुसवू, अशी चेतावणी भारत कधी देणार ?