Anura Kumara Dissanayake : कुणीही आमच्या देशाचा वापर करू शकणार नाही ! – दिसानायके यांच्या पक्षाने केले स्पष्ट !

चीनसमर्थक मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती !

अनुरा कुमारा दिसानायके

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके यांनी २३ सप्टेंबरला सकाळी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अनुरा दिसानायके म्हणाले की, श्रीलंकेत नवजागरणाच्या नव्या युगाचा प्रारंभ करण्याचे दायित्व पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू.

श्रीलंकेत २१ सप्टेंबरला राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाले. २२ सप्टेंबरला याचा निकाल घोषित करण्यात आला. यात जनता विमुक्ती पेरामुना (जे.व्ही.पी.) पक्षाचे नेते आणि नॅशनल पीपल्स पॉवर (एन्.पी.पी.) आघाडीचे उमेदवार अनुरा दिसानायके (वय ५५ वर्षे) यांना विजयी घोषित करण्यात आले. दिसानायके आणि त्यांचा पक्ष चीनकडे झुकलेला असल्याचे मानले जाते.

श्रीलंकेचा भूभाग कुणाच्याही विरोधात वापरला जाणार नाही !

राष्ट्रपती दिसानायके यांच्या पक्षाचे प्रवक्ते बिमल रत्नायके यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, श्रीलंकेचा भूभाग इतर कोणत्याही देशाविरुद्ध वापरला जाणार नाही. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रा. अनिल जयंती म्हणाले की, भारत निश्‍चितच आमचा महत्त्वाचा शेजारी असलेला एक महासत्ता आहे. त्याचे स्वतःचे महत्त्व आहे. हिंद महासागरातील श्रीलंकेच्या सामरिक स्थानामुळे त्याची भौगोलिक राजकीय प्रासंगिकता वाढली आहे. आमचा देश भू-राजकीय शत्रुत्वात अडकणार नाही आणि कुणीही आमच्या देशाचा वापर करू शकणार नाही.

तमिळ लोकांना विरोध ?

दिसनायके यांच्या जेव्हीपी पक्षाने अनेकदा भारतातून श्रीलंकेत गेलेल्या तमिळ वंशाच्या लोकांना विरोध केला आहे. त्यास जेव्हीपीने ‘भारताचे विस्तारवादी साधन’ म्हटले आहे, तसेच जेव्हीपीने भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापारावरील सर्वसमावेश आर्थिक भागीदारी कराराला (सीईपीए) विरोध केला आहे. या करारामुळे उभय देशांमधील व्यापार वाढणार असून गुंतवणुकीला चालना मिळणार आहे.

भारताविषयी नकारात्मक भूमिका !

राष्ट्रपती दिसानायके यांनी यापूर्वीच ‘कोणत्याही परिस्थितीत कच्चातिवू बेट भारताला देऊ देणार नाही’, असे स्पष्ट केले आहे. भारत सरकारने या वर्षाच्या प्रारंभी दिसनायके आणि जेव्हीपीच्या शिष्टमंडळाला अधिकृत भेटीसाठी भारतात निमंत्रित करण्यासाठी संपर्क केला होता; मात्र त्यांची भारताविषयीची भूमिका नकारात्मक होती.

अनुरा दिसानायके यांनी वर्ष १९८७मध्ये ‘एन्पीपी’चा मातृपक्ष असलेल्या ‘जेव्हीपी’मध्ये प्रवेश केला. त्या वेळी जेव्हीपी भारतविरोधी बंडामध्ये सहभागी होता. त्या पक्षाने १९८७ च्या भारत-श्रीलंका कराराला पाठिंबा देणार्‍या सर्व लोकशाही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हटवले होते. ‘हा करार म्हणजे श्रीलंकेच्या सार्वभौमत्वावर घाला आहे’, असा आरोप जेव्हीपीने तेव्हा केला होता. दिसानायके यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये भारताचा दौरा करून त्यांची भारताविषयीची भूमिका पालटल्याचे संकेत दिले होते.

संपादकीय भूमिका

दिसायनायके यांच्या कारभारावरूनच श्रीलंका कोणते धोरण राबवते ?, हे लक्षात येणार आहे. त्यामुळे आता या बोलण्यावर विश्‍वास ठेवता येणार नाही !