|
पिंपरी (जिल्हा पुणे) – यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक वातावरणात पार पाडण्यासाठी शहरात प्रथमच मूर्ती विघटन केंद्रांची स्थापन करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून क्षेत्रीय कार्यालयनिहाय ४० फूट x ३० फूट आकाराची आणि ५ फूट खोल अशी एकूण १५ विघटन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या विघटन केंद्रांवर पहिल्यांदाच श्री गणेशमूर्तींचे रासायनिक प्रक्रियेद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने (?) विघटन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. नदी आणि तलाव यांचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी मूर्ती संकलन केंद्रांमध्ये श्री गणेशमूर्तींचे दान करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त सिंह यांनी केले आहे.
(म्हणे) ‘नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्तीचे विसर्जन होणार नाही, याची दक्षता घेणार !’ – शेखर सिंह, आयुक्त
सिंह पुढे म्हणाले की, संकलन केंद्रांवर प्राप्त झालेल्या मूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यासाठी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड या संस्थेच्या वतीने अमोनियम बाय कार्बोनेट हे रसायन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे रसायन योग्य प्रमाणात वापरण्याविषयी पर्यावरण विभागाच्या वतीने क्षेत्रीय अधिकार्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर संकलन केंद्रांवर प्राप्त मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विघटन करण्यात येणार आहे. पर्यावरण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालय यांच्या समन्वयाने विघटन केंद्र प्रक्रिया करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्तीचे विसर्जन होणार नाही, याची दक्षता क्षेत्रीय स्तरावर घेण्यात येणार आहेे.
पिंपरी शहरात ८५ ठिकाणी श्री गणेशमूर्ती दान केंद्रे !
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विसर्जनानंतर मूर्तीदान आणि संकलन केंद्रांची ८५ ठिकाणी निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनीही मूर्तीदान करून अथवा कृत्रिम विसर्जन घाटांवर मूर्ती विसर्जित करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. (श्री गणेशमूर्तीचे दान करू नये; कारण देवतांचे दान देण्याची अथवा घेण्याची क्षमता मानवामध्ये नाही. अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केल्यास त्याचा आध्यात्मिक लाभ सर्वांना होतो. त्यामुळे प्रशासनाने अशास्त्रीय आवाहन करण्याऐवजी धर्मशास्त्र काय सांगते ? त्यानुसार आवाहन करणे अपेक्षित आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|