
पुणे – प्रतिदिन मंदिर-मशीद यांचे नवीन प्रकरण (वाद) उभे केले जात आहे. याची अनुमती कशी देता येईल ? अलीकडे मंदिरे शोधण्यासाठी मशिदीचे सर्वेक्षण करण्याच्या अनेक मागण्या होत आहेत. अयोध्येत राममंदिर बांधल्यानंतर अशी सूत्रे उपस्थित करून काही लोकांना ‘आपण हिंदूंचे नेते होऊ’, असे वाटते, हे मान्य करता येणार नाही. धर्माच्या अस्मितेतून श्रीराममंदिराची निर्मिती झाली, ती योग्यच आहे; मात्र मंदिराची निर्मिती होत आहे, म्हणून कुणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडली. ते ‘सहजीवन व्याख्यानमाले’ अंतर्गत ‘विश्वगुरु भारत’ या विषयावर बोलत होते.
प.पू. सरसंघचालक भागवत पुढे म्हणाले, ‘‘आमच्या देवतांवर आक्रमण करून, अरेरावी करून कुणी मतांतर करणार असेल, तर ते चालणार नाही. भौतिक सुखातून नव्हे, तर नैतिक तत्त्वज्ञानातून भारत विश्वगुरु होईल. भौतिक प्रगतीसमवेत नैतिक प्रगती झाल्यास ‘विश्वगुरु भारत’ होण्याचे स्वप्न न रहाता, येत्या २० वर्षांमध्ये भारत विश्वगुरुपदाला जाईल. भारतीय प्राचीन, सनातन हिंदु राष्ट्राची उत्पत्ती धर्मतत्त्वांतून, सत्यातून झाली आहे. सृष्टीचे विज्ञान जाणून जगाच्या कल्याणाची इच्छा ठेऊन राष्ट्रनिर्मिती झाली आहे; परंतु हा इतिहास कुणीतरी लाभासाठी दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आजही दडवला जात आहे. बाहेरून आलेले काही लोक वर्चस्ववादासाठी आग्रही आहेत; मात्र स्वतंत्र देशात रहात असतांना वर्चस्ववादाची भाषा कशासाठी हवी.’’