पुणे – शहरात प्रतिदिन सहस्रो टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे; मात्र या टँकरचे पाणी पिण्यास योग्य आहे का ? ते पाणी कुठून भरले जाते ? पाण्याचा स्रोत काय ? शहरात खासगी टँकर भरणा केंद्रे किती आहेत ? ती केंद्रे कोणत्या भागात आहेत ? त्यात बोअर किती ? विहिरी किती ? याची कोणतीही माहिती महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून महापालिकेच्या ‘व्हॉल्व्ह मॅन’ला (व्हॉल्व्ह फिरवून पाणी चालू बंद करणारे) हाताशी धरून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून टँकरने पाणीपुरवठा केला आहे.
१. शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांच्या हद्दीत पाणीपुरवठ्याची यंत्रणा नसल्याने त्यांना टँकरवरच अवलंबून रहावे लागत आहे.
२. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पी.एम्.आर्.डी.ए.) वतीने बांधकामांना अनुमती दिली जाते. पाणीपुरवठा संदर्भात महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र आणल्याविना अनुमती दिली जाणार नाही, असा निर्णय घेतला होता; मात्र समाविष्ट गावात पाणी देण्याचे दायित्व महापालिकेचे आहे, असे सांगून पी.एम्.आर्.डी.ए.ने आदेश मागे घेतला आहे.
३. बांधकाम व्यावसायिक नागरिकांना टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन देऊन सदनिका विकतात. त्यामुळे गावांमध्ये सोसायट्यांचा पाण्याच्या टँकरवर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च होतो.
४. पुणे महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेतून ८२ पैकी ५१ टाक्यांचे बांधकाम पूर्ण करून त्यांचे रंगकामही केले आहे. आणखी १९ टाक्यांची कामे चालू आहेत; मात्र टाक्या बांधलेल्या असल्या, तरी त्यांना जलवाहिनी जोडण्याचे काम अपूर्ण असल्याने त्यातून पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांचे टँकरवर लाखो रुपये व्यय होत आहेत.
संपादकीय भूमिकाटँकर लॉबीला कुणाचे पाठबळ आहे ? याचा पाठपुरावा करून दोषींवर कारवाई केल्यास पाणीटंचाईचा प्रश्न सुटेल ! प्रशासन याच्या मुळाशी जाऊन कधी उपाययोजना काढणार ? |