गुरुकृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ करत असलेल्या सेवांची व्याप्ती

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘विविधांगी सेवा मिळण्याची मुख्य कारणे, आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय सांगणे, समष्टी सेवा करत असलेल्या साधकांना आध्यात्मिक त्रासामुळे आलेल्या अडचणी सोडवणे, ‘इंटरनेट’द्वारे अध्यात्मप्रसार करण्यात येणार्‍या अडचणी सोडवणे आणि आश्रमाच्या भूमीमध्ये विहीर किंवा कूपनलिका खणण्यासाठी योग्य ती जागा शोधणे’, यांविषयीचे लिखाण वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.                                    

(भाग ३)

या लेखाचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/830429.html

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

कल्पनातीत आणि अप्रतिम लेख लिहिणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा हा लेख वाचून मला थक्क व्हायला झाले ! यात दिलेले ज्ञान जगात कुणालाच नसेल ! भारतीय संगीतातील मोठमोठ्या संगीततज्ञांनाही हा लेख वाचून आश्चर्यच वाटेल ! ‘सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी हे ज्ञान जगभरातील जिज्ञासू साधकांना शिकवून त्यांच्यासारखे अनेक उपाय करणारे तयार करावेत. त्यामुळे जगभरच्या संगीताने बर्‍या होणार्‍या साधकांना उपाय उपलब्ध होतील’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले

१०. साधकांना त्यांची वास्तू किंवा भूमी विकण्यामध्ये किंवा नवीन खरेदी करण्यामध्ये आध्यात्मिक स्तरावरील उपाय देऊन साहाय्य करणे

साधकांना चांगली साधना होण्याच्या दृष्टीने ते रहात असलेली वास्तू सोडून दुसरीकडे रहायला जायचे असते. यामध्ये वाईट शक्ती अडथळे आणतात आणि ती वास्तू (किंवा भूमी) साधकांना विकू देत नाहीत. यावर उपाय म्हणून मी मुद्रा, न्यास, नामजप आणि उपायांचा कालावधी सांगतो, तसेच मंडलामध्येही याविषयी लिहायला सांगतो. साधकांना या उपायांचा लाभ झाल्याचे लक्षात येते.

प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार उपाय शोधतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

११. सूक्ष्म परीक्षण करणे

११ अ. नामजपांचे प्रयोग : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली देवतांचे नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आले आहेत. त्यांतील एखाद्या नामजपाचा प्रयोग करतांना ‘तो नामजप २० मिनिटे ऐकून काय अनुभूती येतात ?’, हे उपस्थितांना लिहून देण्यास सांगतो. या परीक्षणामध्ये मला पुढील गोष्टी लक्षात येतात.

१. चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी यांपैकी कुठली नाडी नामजपामुळे कार्यरत होते ?

२. शरिराच्या कुठल्या चक्रावर नामजपाची स्पंदने जाणवतात ?

३. तारक आणि मारक यांपैकी कुठली शक्ती जाणवते ?

४. सगुण आणि निर्गुण यांपैकी देवतेचे कुठले स्वरूप जाणवते ?

५. शरिरावर काय परिणाम जाणवतो ?

अशा प्रकारे नामजपांविषयी संशोधन करता येते.

११ आ. यज्ञाचा परिणाम जाणून घेणे : रामनाथी आश्रमात आतापर्यंत ४०० हून अधिक यज्ञ झाले आहेत. हे यज्ञ विविध फलश्रुती मिळण्यासाठी आणि त्या फलश्रुतींनुसार विविध देवतांशी संबंधित झाले. मला प्रत्येक यज्ञातून काही ना काही वेगळे शिकायला मिळाले.

१. यज्ञाच्या कालावधीत आहुतींना आरंभ झाल्यापासून ते पूर्णाहुतीपर्यंत शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांपैकी वेगवेगळी स्पंदने अनुभवायला मिळतात अन् त्यांचा कार्यकारणभावही कळतो. स्पंदनांची वाटचाल शक्ती ते शांती अशी असते.

२. यज्ञामध्ये कधी आकर्षणशक्ती जाणवते, कधी प्रक्षेपणशक्ती, तसेच कधी तारक शक्ती, तर कधी मारक शक्ती अधिक जाणवते. यज्ञाच्या उद्देशाप्रमाणे हे पालटते.

३. यज्ञामुळे कधी जिवाच्या देहाची, कधी जिवाभोवतीच्या वातावरणाची, तर कधीकधी दोन्हींची शुद्धी होते.

४. यज्ञाचे विविध परिणाम होतांना जाणवले, उदा. यज्ञ साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी पूरक असणे, कधी तो साधनेला गती देणारा असणे, कधी साधकांचे वाईट शक्तींचे त्रास दूर करणारा असणे, तर कधी वातावरणातील वाईट शक्तींचे निर्मूलन करणारा असणे इत्यादी.

५. यज्ञातील ज्वाळेचा रंग कधी पिवळसर, कधी सोनेरी, तर कधी तांबडा असतो. यज्ञाचा उद्देश आणि यज्ञातून प्रक्षेपित होणारी तारक किंवा मारक शक्ती यांवर यज्ञातील ज्वाळेचा रंग अवलंबून असतो.

६. यज्ञ होतांना काही वेळा यज्ञावर होणारे वाईट शक्तींचे आक्रमण दूर करण्यासाठी नामजपादी उपायही करावे लागतात. वाईट शक्ती कधी पाताळातून, कधी वरून, तर कधी एखाद्या दिशेकडून आक्रमण करतात.

११ इ. संगीताच्या प्रयोगांच्या वेळी सूक्ष्म परीक्षण करणे : संगीताच्या प्रयोगांमध्ये गायन, वादन आणि नृत्य यांचे प्रयोग घेतले जातात. ‘या कलांचा आध्यात्मिक स्तरावर कसा परिणाम होतो ?’, याचा अभ्यास होण्यासाठी हे प्रयोग घेतले जातात. या प्रयोगांमध्ये माझ्याकडून पुढील दृष्टीने परीक्षण झाले.

१. संगीतातील विशिष्ट रागाद्वारे विशिष्ट देवतांचे तत्त्व आपल्याला मिळते, हे लक्षात आले.

२. प्रत्येक राग हा विशिष्ट कुंडलिनीचक्रावर परिणाम करतो, हेही कळले.

३. प्रत्येक रागामध्ये तारक आणि मारक शक्ती विशिष्ट प्रमाणात असते. त्यानुसार तो राग तारकप्रधान किंवा मारकप्रधान शक्तीचा असतो.

४. प्रत्येक रागामध्ये शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती ही स्पंदने विशिष्ट प्रमाणात असतात.

५. रागातील तारक किंवा मारक शक्तीचे प्रधान प्रमाण आणि रागातून प्रक्षेपित होणारी शक्ती, भाव, चैतन्य, आनंद अन् शांती यांपैकी एखादे प्रधान स्पंदन यांनुसार तो राग दिवसाचे ४ प्रहर आणि रात्रीचे ४ प्रहर यांपैकी कोणत्या प्रहरात गाणे योग्य आहे, हे ठरलेले असते, याचा शोध लागला.

६. संगीतातील एखादा राग हा एखादा शारीरिक किंवा मानसिक विकार दूर करण्यासाठी उपयोगी असतो. त्या रागाद्वारे तो विकार दूर होतांना काय प्रक्रिया घडते, हे सूक्ष्म परीक्षणाद्वारे कळले.

७. भरतनाट्यम्चा प्रचलित पोशाख घालून केलेले भरतनाट्यम् आणि साडी नेसून केलेले भरतनाट्यम् यांचा झालेला परिणाम अभ्यासता आला.

८. सात्त्विक आणि लयबद्ध नृत्यातून प्रक्षेपित होणारी स्पंदने अभ्यासता आली.

९. नृत्याच्या विविध मुद्रांतून प्रक्षेपित झालेली स्पंदने अभ्यासता आली.

१०. ‘साधनेतील आध्यात्मिक पातळीचा संगीत, वादन आणि नृत्य यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांवर, तसेच वाईट शक्तींचा त्रास असणार्‍यांवर कसा परिणाम होतो ?’, हे अभ्यासता आले.

११ ई. सात्त्विक आणि असात्त्विक वस्तू, प्राणी अन् पक्षी यांचे प्रयोग : या प्रयोगांतून ‘सात्त्विक आणि असात्त्विक घटक कसे ओळखायचे ?’, हे शिकता आले. त्यांचा आपल्यावर कसा परिणाम होतो, कोणत्या चक्रांवर होतो, तो किती काळ टिकतो, असात्त्विक घटकांचा परिणाम आपल्यावर न होण्यासाठी कोणता नामजप, मुद्रा आणि न्यास करणे आवश्यक आहे इत्यादी गोष्टी शिकता आल्या.

११ उ. वास्तूतील त्रासदायक स्पंदने दूर होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगणे : एखाद्या वास्तूत निर्माण झालेली त्रासदायक स्पंदने कुठून येत आहेत, ती वास्तूतील असात्त्विक रचनेमुळे येत आहेत कि वाईट शक्तींच्या त्रासामुळे येत आहेत आणि ती दूर करण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे, हे ओळखायला मी शिकलो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच मी या सर्व सेवा करू शकत आहे. विचार, बुद्धी, शक्ती असे सर्वकाही तेच देतात आणि तेच या सेवा माझ्याकडून करवून घेतात. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(समाप्त)

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.४.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.