‘मे २०२२ मध्ये आम्ही घरातील सर्व जण अक्कलकोट आणि गाणगापूर येथे गेलो होतो. अक्कलकोट आणि गाणगापूर ही दत्तक्षेत्रे आहेत. महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र आहे. दत्तात्रेयांचा चौथा अवतार, म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट येथे स्थान आहे. तेथे त्यांची समाधी आहे.
कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात गाणगापूर हे तीर्थक्षेत्र आहे. दत्तात्रेयांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती यांनी २३ वर्षे गाणगापूर येथे वास्तव्य करून सर्व कार्य केले. तेथे त्यांच्या निर्गुण पादुका आहेत.
१. अखंड भावजागृतीची अनुभूती देणारे अक्कलकोट !
अक्कलकोट येथे समाधी मंदिराच्या आवारात प्रवेश करतांनाच माझा भाव जागृत होऊ लागला. त्या वेळी मला ‘कंठ अवरुद्ध होणे (दाटून येणे), तोंडवळा पांढरट पडणे, अंगावर रोमांच येणे, डोळ्यांतून अश्रू येणे’, अशा भावजागृतीच्या बर्याच अनुभूती आल्या. स्वामी समर्थांच्या समाधीचे दर्शन घेत असतांना मला त्यांच्या जागी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले आणि माझा भाव आणखीनच जागृत झाला. दर्शनानंतर समाधी मंदिरात बसल्यानंतर माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांना अनेक प्रार्थना अगदी सहजपणे होऊ लागल्या. माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या. आम्ही रात्रीच्या वेळी दर्शनाला गेल्याने आम्हाला शांतपणे आणि डोळे भरून दर्शन घेता आले. रात्री निवासाच्या ठिकाणी गेल्यावरही माझा भाव अखंड जागृत होता. दुसर्या दिवशी पहाटे काकड आरती आणि नंतर अभिषेक यांसाठी मंदिरात जाण्यासाठी जाग आली. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून अश्रू वहात होते, म्हणजे रात्रभर माझा भाव जागृत होता. अक्कलकोटमधून बाहेर पडेपर्यंत माझी ही भावावस्था होती. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांना अनुभवता येते. ते सगुण स्थान आहे.
२. शांतीची अनुभूती देणारे गाणगापूर !
अक्कलकोट येथील समाधी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गाणगापूर येथे गेलो. गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती यांच्या निर्गुण पादुका आहेत. त्या पादुका मंदिरातील अगदी आतल्या भागात आहेत. एका लांब झरोक्यासारख्या भागातून आत पाहिल्यावर पादुकांचे दर्शन होते. बाकी मंदिर साधेच आहे. गाणगापूर या गावात प्रवेश केल्यानंतर माझ्या मनाला शांत वाटू लागले. आम्ही जसजसे मंदिराच्या दिशेने जात होतो, तसतसे माझे मन अधिकच शांत होत गेले. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आम्ही दर्शन घेतले आणि मंदिरात काही वेळ थांबून मंदिरातून बाहेर पडलो. या कालावधीत आणि त्यानंतर काही अंतर जाईपर्यंत माझ्या मनात एकही विचार आला नाही. मंदिरात जातांना आम्ही नारळ, उदबत्ती, कापूर, साखर इत्यादी साहित्य अर्पण करण्यासाठी नेले होते. त्या साहित्याची पिशवी माझ्या हातात होती; पण पादुकांचे दर्शन घेतांना ‘ते साहित्य अर्पण करायचे आहे’, हेही मला आठवले नाही आणि मी तशीच बाहेर आले. मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर साहित्य अर्पण करायचे विसरल्याचे माझ्या लक्षात आले. नंतर पुन्हा आम्ही मंदिरात जाऊन ते साहित्य अर्पण केले. मंदिरात अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या काही व्यक्ती निपचित पडून होत्या. मंदिरातील वर्दळीचा त्यांच्यावर काही एक परिणाम होत नव्हता. मंदिरात समोरच एक खांब आहे. ‘आरतीच्या वेळी त्रास असलेल्या व्यक्ती त्या खांबावरही चढण्याचा प्रयत्न करतात’, असे कळले.
गाणगापूर येथे दत्तात्रेयांच्या पादुका आहेत, म्हणजेच ते निर्गुण स्थान आहे. त्यामुळे एकूणच गाणगापूर येथे शांतीची अनुभूती आली.
३. हिंदु धर्माची महानता
वरील अनुभूतींवरून ‘आपली मंदिरे किती जागृत आहेत आणि भक्तांना आध्यात्मिक स्तरावर किती लाभ करून देणारी आहेत !’, हे लक्षात येते. ‘हिंदु धर्मातील विविध देवता, त्यांची विविध कार्ये आणि ती कार्ये लक्षात आणून देणार्या अनुभूती’, हीच हिंदु धर्माची महानता आहे.
४. कृतज्ञता
प्रत्येक ठिकाणी गेल्यावर ‘मनाला काय वाटते ? तेथे कोणती स्पंदने जाणवतात ? त्यांचा आपल्यावर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना करायला शिकवला. अनेक प्रसंगांतून त्यांनी साधकांकडून तो करूनही घेतला. त्यामुळेच सनातनचे साधक बाहेर गेल्यानंतर ‘त्या ठिकाणी काय जाणवते ?’, याचा अभ्यास करून त्याचा लाभ करून घेऊ शकत आहेत. ‘मंदिरांचा खरा लाभ कसा करून घ्यायचा ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवले. साधकांना घडवणार्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सुश्री राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१९.२.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |