गंभीर रुग्णाईत असतांनाही स्थिर आणि ईश्वराच्या अनुसंधानात असणारे संभाजीनगर येथील कै. बाळकृष्ण राजेश्वर चौधरी (वय ७७ वर्षे) !

१०.१.२०२५ या दिवशी बाळकृष्ण राजेश्वर चौधरी यांचे निधन झाले. २२.१.२०२५ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी श्रीमती शैलजा चौधरी (वय ७३ वर्षे) यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या रुग्णाईत स्थितीत आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. बाळकृष्ण राजेश्वर चौधरी

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. पत्नीला साधनेत साहाय्य करणे : ‘मी  १ – २ दिवस सेवेसाठी बाहेर गेले नाही, तर माझे यजमान स्वतःहून मला विचारत, ‘‘तू सेवेसाठी का गेली नाहीस ? तू तुझी सेवा कर.’’ त्यांचे काही दुखत असल्यासही ते मला सेवेला जायला सांगत. ते सेवेला जातांना स्वतःहून मला पैसे देत. त्यांनी साधनेत केलेल्या साहाय्यासाठी मी त्यांची सदैव ऋणी राहीन.

१ आ. आसक्ती नसणे : त्यांना घर, कपडे आणि पैसा यांच्या संदर्भात आसक्ती नव्हती.

१ इ. अल्प अहं : ते उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होते; मात्र त्यांना त्यांच्या पदाचा अहं नव्हता. आमचे दहा जणांचे कुटुंब होते. घरातील लहान-मोठे कुणीही माझ्या यजमानांना बोलल्यास ते शांतपणे ऐकून घेत आणि नंतर त्या व्यक्तीशी स्वतःहून बोलत.

१ ई. त्यांच्यामध्ये ‘स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकपणा आणि मोकळेपणाने बोलणे’, हे गुण होते.

रुग्णालयात असताना संतांची अनुभवलेली कृपा !

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

‘कठीण काळात संत आणि देव आपल्यासाठी किती करतात !’, हे माझ्या लक्षात आले. यजमान रुग्णालयात असतांना त्यांना कधीही त्रास होत असे. त्यांना रात्री कधीही त्रास होऊ लागल्यास मी पू. डगवारकाकूंना नामजपादी उपाय विचारण्यासाठी भ्रमणभाष करत असे. तेव्हा त्या मला त्वरित नामजपादी उपाय सांगत असत. त्यांचा आवाज ऐकून मला धीर येत असे आणि शक्ती मिळत असे.

– श्रीमती शैलजा चौधरी

२. यजमान रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे

२ अ. यजमानांना ‘ते घरात नसून दुसरीकडे आहेत’, असे वाटणे : २६.१२.२०२४ या दिवशी यजमान सकाळी उठल्यानंतर मला म्हणाले, ‘‘मी घरात नाही. मला सगळे वेगळेच दिसत आहे. ‘मी दुसरीकडेच आहे’, असे मला वाटत आहे.’’ त्या वेळी ‘ते असे का बोलत आहेत ?’, असे मला वाटले.

श्रीमती शैलजा चौधरी

२ आ. स्वतःच्या गंभीर स्थितीविषयी समजूनही स्थिर असणे : २६.१२.२०२४ या दिवशी माझ्या यजमानांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तेव्हा तेथील आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या यजमानांची स्थिती गंभीर आहे. त्यांच्या रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे त्यांच्या संपूर्ण शरिरात संसर्ग झाला आहे.’’ त्या वेळी मला यजमानांच्या चेहर्‍यावर कसलीही चिंता किंवा भीती दिसली नाही. ते शेवटपर्यंत सकारात्मकच होते. ‘ते आता सुख-दुःखाच्या पलीकडे गेले आहेत. देव त्यांना प्रारब्ध भोगण्यासाठी सहनशक्ती देत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

२ इ. सतत ईश्वरी अनुसंधानात रहाणे : ते १५ दिवस रुग्णालयात असतांना सतत दोन्ही हात जोडून नमस्काराची मुद्रा करत असत. त्यांना ‘सलाईन’ लावल्यामुळे त्यांचा उजवा हात सुजला होता. तेव्हा ते डावा हात कपाळाला लावून नमस्कार करत असत.

पू. डगवारकाकूंनी (पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार, सनातनच्या ११९ व्या संत, वय ६१ वर्षे) यांनी नामजप सांगितल्यावर यजमान लगेच तो नामजप करत असत. यजमानांच्या डोळ्यांत शेवटपर्यंत कधी पाणी आले नाही.

२ ई. साधकांनी केलेले साहाय्य : कु. चैताली दुबे आणि सौ. ऋचा वर्मा यांचे आमच्याकडे सतत लक्ष होते. त्या नामजप आणि प्रार्थना करायला सांगून मला धीर देत असत. यजमानांचे निधन झाल्याच्या आदल्या दिवशी गुरुवार होता. चैतालीताईने आठवणीने मला भ्रमणभाष करून ‘काकांजवळ भ्रमणभाषवर भक्तीसत्संग लावून ठेवा आणि त्यांना ऐकवा’, असे सांगितले. मी यजमानांना भक्तीसत्संग ऐकवला. त्यांना गुरुवाणी ऐकायला मिळाली. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात सांगितलेल्या प्रार्थना आम्ही केल्या. मी मानसरित्या कुंभातील पाणी गंगाजल म्हणून यजमानांना दिले. गुरुकृपेने यजमानांना भक्तीसत्संगाचा लाभ मिळाला. केवढी ईश्वराची कृपा !

३. यजमानांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

अ. यजमानांचा चेहरा हसरा आणि तेजस्वी दिसत होता.

आ. मी त्यांच्या चेहर्‍याकडे पाहिले असता ‘त्यांच्या ओठांची हालचाल चालू आहे. ते नामजप करत आहेत’, असे मला जाणवले.

इ. मला सूक्ष्मातून दिसले, ‘त्यांच्या देहाभोवती सतत सुदर्शनचक्र फिरत आहे.’ मला तेथे देवतांचे अस्तित्व जाणवत होते.

– श्रीमती शैलजा चौधरी (पत्नी, वय ७३ वर्षे), संभाजीनगर (१७.१.२०२५)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक