सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्य ब्रह्मोत्सवात साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘खरेतर माझे अस्तित्व धुळीच्या एका कणाप्रमाणेच आहे; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी, फोंडा, गोवा येथे झालेला त्यांचा ‘ब्रह्मोत्सव’ पहाण्याची अन् त्यात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. ‘संपूर्ण वास्तू ‘नारायण.. नारायण..’ या गीतावर नृत्य करत आहे’, असे जाणवणे

ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळी मी आध्यात्मिक संशोधन केंद्र असलेल्या वास्तूत असतांना ‘संपूर्ण वास्तूच ‘नारायण.. नारायण..’ या गीतावर नृत्य करत आहे’, असे मला जाणवले.

२. ब्रह्मोत्सवस्थळी जात असतांना मार्गावर आनंददायी वातावरण असणे

ब्रह्मोत्सवस्थळी जात असतांना ‘सगळा निसर्गच जणू नृत्य करत आहे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पहाण्यासाठी संपूर्ण वातावरण आतुर झाले आहे’, असे मला जाणवत होते.

सौ. वैशाली धवस

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या रथाच्या मागील गटात साधिकेला टाळवादनाची सेवा मिळणे आणि सेवा करतांना तिला स्वतःचे अस्तित्व न जाणवणे

कार्यक्रमाच्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’ हे तिघेही रथावर आरूढ झाले होते. त्या रथाच्या मागे टाळ वाजवणार्‍या साधिकांचा एक गट होता. त्या गटात मीही होते. टाळ वाजवण्याची सेवा करतांना ३ – ४ वेळा माझी भावजागृती होऊन मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते. टाळ वाजवणार्‍या गटाशी मी एकरूप झाले होते.

४. ‘कार्यक्रमस्थळी तिन्ही गुरूंच्या दर्शनासाठी देवता आल्या आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे

संपूर्ण कार्यक्रमात मला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि देवीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे दर्शन घेण्यासाठी सर्व देवता आल्या आहेत’, असे सूक्ष्मातून दिसत होते.

५. मैदानाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या रथासमोर काही साधिकांनी नृत्य सादर केले. त्या वेळी मला जाणवले, ‘श्रीकृष्णाच्या गोपी भूतलावर अवतरून नृत्य करत आहेत.’

६. ‘कार्यक्रम पृथ्वीवर नसून उच्च लोकात चालू आहे’, असे जाणवणे

नंतर गायन, तसेच तबला आणि सतार वादन हे कार्यक्रम चालू असतांना ‘ते पृथ्वीवर चालू नसून उच्च लोकात चालू आहेत. तो सोहळा देवताही पहात आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे श्री. विनायक शानभाग उच्च लोकातून बोलत आहेत’, असे मला जाणवत होते.

७. ‘सोहळा चालू असलेले मैदान पृथ्वीपासून वर उचलले गेले असून सोहळा प्रत्यक्ष विष्णुलोकात होत आहे’, असे मला जाणवले.

८.साधिकेच्या पायात काटा रुतणे आणि प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर काट्यामुळे वेदना न होता तिला मैदानावर फेरी मारता येणे

रथोत्सवाला आरंभ झाला. तेव्हा माझ्या पायात एक काटा रुतला होता. त्या वेळी मी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘टाळवादनाच्या या पथकाबरोबर मला मैदानावतील फेरी पूर्ण करायची आहे. मला क्षणभरही थांबायचे नाही. त्यामुळे हा अडथळा तुम्हीच दूर करा.’ त्यानंतर काटा रुतलेल्या ठिकाणी मला होणार्‍या वेदना पूर्णपणे थांबल्या. सोहळा संपून मी घरी आले. तेव्हा माझ्या पायात काटा रुतल्याची केवळ खूण होती; पण जखम नव्हती.

‘या सर्व अनुभूतींबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. वैशाली धवस, फोंडा, गोवा. (१२.५.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक