श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्संगाचे सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !

‘प्रत्येक वर्षाला येणारी सर्वपित्री अमावास्या सनातनच्या साधकांसाठी आनंदाची एक विशेष पर्वणी असते आणि त्या वेळी रामनाथी आश्रमात उत्सवासारखे वातावरण असते; कारण या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा तिथीनुसार वाढदिवस असतो. वर्ष २०२२ मधील हा दिवस (२५.९.२०२२) साधकांसाठी अधिक मंगलकारी ठरला; कारण या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ अशा तिन्ही गुरूंच्या उपस्थितीतील एक विशेष सत्संग अनुभवण्याची संधी साधकांना मिळाली. या संतसत्संगात श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची भेट घेऊन त्यांची अनेक आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यातील दिव्यत्वाची जाणीव समष्टीला करून दिली. देवाच्या कृपेने मी या सत्संगाचे केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.                   

(भाग १)

डावीकडे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी संवाद साधतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (वर्ष २०२२)

(‘वरील परिच्छेद लिहून पूर्ण झाल्यावर मला मोगर्‍याचा गोड सुगंध आला.’ – श्री. निषाद)

१. सत्संगाचा आरंभ होण्यापूर्वी जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये 

१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी वायूमंडलात असते, तितके चैतन्य श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणवणे : सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे मागील काही वर्षांपासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. या जन्मोत्सवांच्या दिवशी कार्यक्रम चालू होण्यापूर्वी वायूमंडलात ५० ते ६० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात चैतन्य कार्यरत असते. या चैतन्यमय वायूमंडलामुळे उत्सव साजरा होत असल्याचे जाणवते, तसेच वायूमंडल श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त निर्माण झाले होते. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ हे तिन्ही समष्टी गुरु असून त्यांच्यात अभेद आहे.’ या अनुभूतीतून मला याची प्रचीती आली.

१ आ. कार्यक्रम चालू होण्यापूर्वी वायूमंडलात ५० टक्क्यांहून अधिक आनंद कार्यरत असणे; मात्र श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या प्रत्यक्ष आगमनानंतर समष्टीचे आनंदाकडून शांतीकडे मार्गक्रमण होणे : अन्य आध्यात्मिक सोहळे शक्तीच्या स्तरापासून चालू होऊन पुढे भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांकडे जातात. याउलट श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्संग आरंभ होण्यापूर्वीच त्यात शक्ती, भाव, चैतन्य आणि शांती हे अल्प प्रमाणात असून आनंदाचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक होते, म्हणजे आनंदाच्या स्तरापासूनच कार्यक्रमाचा आरंभ होत होता. कार्यक्रमस्थळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे स्थुलातून आगमन झाल्यावर शक्ती, भाव, चैतन्य आणि आनंद यांचे प्रमाण अल्प होऊन सर्वाधिक प्रमाणात शांती जाणवू लागली. यांतून ‘समष्टीचे आनंदाकडून शांतीकडे मार्गक्रमण झाले’, असे माझ्या लक्षात आले.

२. कार्यक्रमस्थळी सत्यलोकाप्रमाणे वायूमंडल निर्माण झाले होते.

३. कार्यक्रमस्थळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आगमन झाल्यावर निर्गुण तत्त्व कार्यरत होणे आणि ‘तिन्ही गुरु निर्गुणात आहेत’, असे जाणवणे  

श्री. निषाद देशमुख

काही वेळाने शारीरिक त्रास होत असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आगमन झाल्यावर कार्यक्रमस्थळी निर्गुण तत्त्व कार्यरत झाले. तेव्हा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ हे तिन्ही समष्टी गुरु निर्गुणात असून ते त्यांच्यासह सर्व समष्टीला निर्गुणात नेत आहेत’, असे मला जाणवले. तिन्ही समष्टी गुरूंकडून प्रक्षेपित होणारे निर्गुण तत्त्व सप्तलोक आणि सप्तपाताळ यांमध्ये प्रक्षेपित होत होते. यामुळे जवळ-जवळ सर्वच साधकांची मने निर्विचार झाली आणि ‘अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले’, असे माझ्या लक्षात आले.

४. साधकांना निर्विचार स्थितीत नेऊन शब्दातीत अनुभूतींद्वारे शिकवणारा तिन्ही समष्टी गुरूंचा अनमोल सत्संग !  

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आगमनापूर्वी सर्व साधकांना ‘डोळे मिटून वातावरणात काय जाणवते ?’, याची अनुभूती घेण्यास सांगण्यात आले होते. तेव्हा ‘कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या साधकांना ‘मन निर्विचार होणे’, ‘स्वतः उच्च लोकांमध्ये आहे’, असे जाणवणे, ‘देवतांचे दर्शन होणे’, अशा उच्च स्तराच्या अनुभूती आल्या. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘अध्यात्म हे अनुभूतींचे शास्त्र आहे. यात शब्दांपेक्षा अनुभूतीला अधिक महत्त्व असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या तिन्ही समष्टी गुरूंच्या निःशब्द अन् निर्विचार स्थितीमुळे साधकांच्या आध्यात्मिक पातळीत काही वेळासाठी वाढ झाल्याने त्यांना शब्दातीत म्हणजे उच्च स्तराच्या अनुभूती घेता आल्या. या ज्ञानातून ‘हा सत्संग शब्दांच्या माध्यमातून नाही, तर अनुभूतींद्वारे साधकांना शिकवणारा आहे’, असे माझ्या लक्षात आले.

५. निर्गुण स्थितीत असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सत्संगात बोलता येण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याकडे शक्ती मागणे, तेव्हा सूक्ष्मातून ‘ॐकार’ नाद ऐकू येऊन धबधब्याप्रमाणे श्वेत प्रकाश प्रक्षेपित होऊन दोघी समष्टीसाठी निर्गुण-सगुण स्थितीत येणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आगमन झाल्यावरही श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ निर्गुण स्थितीत असल्याने त्यांना ‘विचार करणे किंवा बोलणे’, अशी कोणतीही कृती करता येत नव्हती. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या दोघींनी सत्संगात बोलता येण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे शक्ती मागितली. तेव्हा मला सूक्ष्मातून प्रथम ‘ॐ’कार नाद ऐकू आला आणि त्यानंतर ‘धबधब्याप्रमाणे श्वेत प्रकाश प्रक्षेपित होऊन श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ दोघी निर्गुणातून निर्गुण-सगुण स्थितीत आल्या’, असे माझ्या लक्षात आले. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या दोघी उच्च स्थितीत होत्या; पण त्यांच्या या आध्यात्मिक स्थितीचा लाभ केवळ ७० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीच्या जिवांना झाला असता. साधना करणार्‍या सर्व साधकांना समष्टीसाठी त्या दोघी निर्गुण-सगुण स्थितीत असणे आवश्यक असल्यामुळे ईश्वराने प्रथम सूक्ष्म नाद आणि नंतर धबधब्याप्रमाणे शक्ती प्रक्षेपित करून त्यांना निर्गुणातून निर्गुण-सगुण स्थितीत आणले.

यातून ईश्वराने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दोन्ही आध्यात्मिक उत्तराधिकार्‍यांसाठी ‘व्यष्टी साधना किंवा स्वानंद’ यांच्या तुलनेत ‘समष्टी साधना आणि समष्टीचा विचार’ अधिक महत्त्वाचा आहे’, याची प्रायोगिक शिकवण दिली.

(‘वरील परिच्छेद लिहितांना मला माझ्या सहस्रारचक्रावर श्वेत प्रकाश जाणवून मनाला आनंद होत होता.’ – श्री. निषाद)

(‘या लिखाणातून मला स्वामी विवेकानंद यांची आठवण झाली. ध्यानावस्थेतील उत्तुंग आनंद घेणार्‍या स्वामी विवेकानंद यांना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी समष्टी कार्य करण्यासाठी ध्यानावस्थेतून बाहेर काढले होते.’ – संकलक) (क्रमशः)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), ढवळी, फोंडा, गोवा. (२६.९.२०२२, संध्याकाळी ५.४०)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/878043.html

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जेजाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक