जिज्ञासूंना संपर्क करतांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून साहाय्य होऊन ‘परिपूर्ण सेवा कशी होते’, याविषयी श्री. धनंजय हर्षे यांनी अनुभवलेले प्रसंग

माझ्याकडे ‘जिज्ञासूंना संपर्क करणे’, ही सेवा आहे. मी सेवेनिमित्त विविध क्षेत्रांतील जिज्ञासूंना भेटतो. खरे पहाता मी पुष्कळ हुशार नाही, तर माझी बुद्धी सर्वसाधारणच आहे. ‘माझ्यामध्ये पुष्कळ गुण आहेत’, असेही नाही, तरीही संपर्क सेवेत येणारे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे संपली आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी सेवेत केलेल्या साहाय्यामुळे ही प्रश्नोत्तरे संपली. देवाने कितीतरी गोष्टी शिकवल्या. ‘देवाचे शिकवणे किती विविध प्रकारचे असते, किती सर्वाेत्तम असते’, याविषयी कृतज्ञता म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी हे लिखाण अर्पण करतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सेवेला जाण्यापूर्वी देवतांना प्रार्थना करणे, तेव्हा श्री भवानीदेवीची मूर्ती सजीव वाटून तिच्या मुखावर वेगवेगळ्या रंगांच्या छटा दिसणे 

मी जिज्ञासूंना संपर्क करण्यासाठी गोव्यात ठिकठिकाणी जातो. आश्रमातून बाहेर जाण्यापूर्वी मी श्री गणेश आणि श्री भवानीदेवी यांना प्रार्थना करतो. श्री भवानीदेवीला प्रार्थना करतांना ‘ती माझा प्रत्येक शब्द ऐकत आहे’, याची मला जाणीव होते. त्या वेळी मला ती मूर्ती सजीव वाटते. आठवड्यातून १ – २ वेळा मला देवीच्या मुखावर कधी लाल, तर कधी पिवळ्या रंगाची वेगवेगळी छटा दिसते.

२. जिज्ञासूंना संपर्क करतांना बाह्य गोष्टींवर अवलंबून राहिल्याने पूर्वी अनेक समस्या येणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने व्यक्तीचा अभ्यास करण्यास शिकल्यावर समस्या दूर होणे 

एक वर्षापूर्वी मी जिज्ञासूंना संपर्क करतांना बाह्य गोष्टींवर अवलंबून असायचो, उदा. जिज्ञासूंची सूची, भेटीमध्ये त्यांच्याशी झालेले बोलणे, विज्ञापनदात्यांचा शब्दांतून मिळणारा प्रतिसाद. यामुळे मला ‘समोरच्या व्यक्तीची क्षमता ओळखता न येणे, ‘कुणाशी किती बोलायला हवे ?’, हे लक्षात न येणे, विषय नीट सांगूनही व्यक्तीचा योग्य प्रतिसाद न मिळणे’, अशा अनेक समस्या यायच्या. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या या सर्व समस्या सोडवल्या. बाह्य गोष्टींवर अवलंबून न रहाता ‘व्यक्तीचा अभ्यास कसा करायचा ?’, हे त्यांनी मला शिकवले.

३. कोरोना महामारीच्या काळात भ्रमणभाषवरून संपर्क करतांना जिज्ञासूंचा अभ्यास करता येऊ लागणे  

कोरोना महामारीच्या कालावधीत मी जिज्ञासूंना भ्रमणभाषवरून संपर्क करायचो. त्या वेळी अनेकदा जिज्ञासूंना ‘संपर्क प्रत्यक्षच चालू आहे’, अशी अनुभूती यायची. जिज्ञासूंचे बोलणे ऐकतांना माझे मन त्यांच्या आवाजावर केंद्रित व्हायचे. तेव्हा देवाने मला त्या जिज्ञासूंचा अभ्यास करायला शिकवले. ‘त्यांचे बोलणे मनापासून आणि जिज्ञासूपणाचे आहे का ? त्यांच्या बोलण्यात भाव आहे का ?’, या गोष्टींचा मला अभ्यास करता येऊ लागला. आपत्काळात देवाने संपर्कासाठी ‘भ्रमणभाष’ हे माध्यम निवडले आणि मला त्याचेच साहाय्य होऊ लागले.

४. ‘देव जिज्ञासूंची खरी ओळख करून देतो’, या संदर्भात आलेला अनुभव 

संपर्क करतांना आपण जिज्ञासूंची ओळख करून घेतो. ‘संघटना, पद, व्यवसाय, साधना आणि राष्ट्र-धर्म यांची आवड’, अशी सर्व त्यांची बाह्य ओळख असते. या सर्व माहितीपेक्षा खरी ओळख देवाकडून (सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉक्टरांकडून) करून घेतली पाहिजे; कारण तीच ओळख खरी असते. ‘ती ओळख देव कशी करून घेतो आणि त्याचे शिकवणे किती सर्वाेत्तम असते ?’, हे मला शिकायला मिळाले.

४ अ. उद्योजकांना भेटायला गेल्यावर बालसंस्कार वर्गाचा विषय सांगणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी विषय ऐकून घेऊन सनातनचे साधनाविषयक ग्रंथ घेणे : आम्ही एका उद्योजकांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो. त्या वेळी त्यांचे आई-वडील आणि त्यांची २ मुलेही घरी होती. त्या मुलांची दुसर्‍या दिवशी परीक्षा होती; म्हणून मी त्यांना ‘अभ्यासाला जा’, असे सांगितले. नंतर आम्ही उद्योजकांशी बोलू लागलो. बालसंस्कार वर्गाच्या विषयानेच बोलण्याला आरंभ झाला. खरेतर असे सहसा होत नाही. मी थोड्या वेळाने पाहिले, तर ‘उद्योजकांची दोन्ही मुले बाजूला उभी राहून शांतपणे आणि लक्षपूर्वक विषय ऐकत होती.’ त्या दोन्ही मुलांनी नामजपही लिहून घेतला. नंतर आमच्या समवेत आणलेला सनातनच्या ग्रंथांचा संच त्यांच्यासमोर ठेवल्यावर त्यांनी केवळ १० मिनिटांत ८ – १० ग्रंथ निवडले. ते सर्व ग्रंथ साधनाविषयक होते.

४ अ १. ‘देवाला प्रार्थना केल्यावर अकस्मात् बालसंस्कार वर्गाचाच विषय चालू होणे’, याचे आश्चर्य वाटणे : ‘या प्रसंगातून देव जिज्ञासूंची ओळख कशी करून देतो’, हे मला शिकायला मिळाले. देवाला प्रार्थना केल्यावर ‘अकस्मात् बालसंस्कार वर्गाचा विषय चालू झाला’, याचे मला आश्चर्य वाटले. ‘ती दोन्ही मुले आई-वडिलांपेक्षा साधनेत पुढे आहेत’, हे देवाला मला शिकवायचे होते. ‘कुणाकडे लक्ष द्यायला पाहिजे, कधी आणि काय बोलायला पाहिजे’, हे सर्व देवच दाखवून देतो. त्यामुळे देवाचे साहाय्य घेऊन जिज्ञासूंची ओळख करून घ्यायला हवी; कारण तीच ओळख खरी असते.

४ आ. संपर्क करतांना जिज्ञासूमध्ये भाव असल्याचे लक्षात येणे, एका प्रसंगात त्यांचा भाव जागृत झाल्याने नेमकेपणाने विषय सांगता येणे : मी एका जिज्ञासूंना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांना पाहिल्यावर ‘त्यांच्यात भाव आहे’, असे माझ्या लक्षात आले. एका प्रसंगात त्यांचा भाव जागृत झाला; पण त्यांना ठाऊक नव्हते की, यालाच ‘भाव’ म्हणतात. त्या वेळी मी त्यांना नामजपाविषयी सांगून ‘भाव’ या विषयावरही माहिती सांगितली. या प्रसंगातून ‘जिज्ञासूमधील आध्यात्मिक गुणाविषयी जे आपल्याला जाणवते, त्याचे प्रमाण किंवा साक्ष ‘देव लगेच देतोच’, हे शिकायला मिळाले. येथे देवाने ‘त्यांच्यात भाव आहे’, हे आधी माझ्या लक्षात आणून दिले आणि नंतर ‘त्यांची भावजागृती झाली’, हेही पहायला मिळाले. त्यामुळे विषय नेमकेपणाने सांगण्यास मला साहाय्य झाले.

५. संपर्क झाल्यावर त्याचा ‘आढावा घेणे’, हे देवाला केलेले आत्मनिवेदन असून आढावा घेणे आवश्यक ! 

जिज्ञासूंचा संपर्क झाल्यानंतर त्या संपर्काचा आढावा घ्यायला हवा. या आढाव्यात कार्याचा भाग न घेता केवळ साधनाविषयक सूत्रे घ्यावीत. संपर्काचा आढावा म्हणजे संपर्कानंतर देवाला कृतज्ञता व्यक्त करणे. आढावा घेतल्याविना संपर्क पूर्ण होत नाही. त्यामुळे या आढाव्याला ‘संपर्काचा प्राण’ असेच म्हणायला पाहिजे. हा आढावा, म्हणजे देवाला केलेले आत्मनिवेदन आहे.

५ अ. संपर्काचा आढावा कसा घ्यावा ?

१. सेवेत आनंद मिळाला का ? सेवा करतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवले का ?

२. सेवा देवाला अपेक्षित अशी पूर्ण करता आली का ?

३. सेवेतून काय शिकायला मिळाले ?

४. सेवेत झालेल्या चुकांचे निरीक्षण करून त्याविषयी आत्मनिवेदन केले का ?

५ आ. आढावा घेण्याचे महत्त्व 

१. आढावा घेण्यामुळे साधकांमध्ये अंतर्मुखता निर्माण होते. शिकायला मिळालेली सूत्रे अंतर्मनापर्यंत पोचतात. संपर्क करतांना आपले मन देवाला शोधते.

२. ‘जिज्ञासूंना संपर्क करणे’, या सेवेचा खरा अर्थ कळायला लागतो. ‘स्वतः नेमके कोणते प्रयत्न करायला हवेत’, हे लक्षात येते.

३. संपर्क झाल्यानंतर त्याच सेवेत किंवा संभाषणात मन अडकून रहात नाही. ‘मी जिज्ञासूंना संपर्क करतो’, असा सेवेतील कर्तेपणा न्यून होतो. ‘मी सेवक आहे’, ही जाणीव सतत जागृत रहाते.

६. सेवेची फलनिष्पत्ती वाढल्याची लक्षणे 

अ. सेवेतील चुकांचे प्रमाण अत्यल्प असते.

आ. मनात कोणतेही प्रश्न शिल्लक रहात नाहीत. आपले मन देवाच्या चरणांवर समर्पित झालेले असते. ‘काही वेळा काही न बोलता केवळ देवाच्या अनुसंधानात रहावे’, असे वाटून शांत रहावेसे वाटते.

इ. संपर्कानंतर जिज्ञासूंमध्ये झालेला पालट त्यांच्या चेहर्‍यावरून लक्षात येतो. जिज्ञासूंचा सहभाग वाढल्याचे लक्षात येते.

अशा प्रकारे आपल्या अपेक्षेपेक्षा संपर्काची फलनिष्पत्ती वाढलेली असते.

– श्री. धनंजय हर्षे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक