कारवाईअभावी गुन्हेगारांना भीती नाही ! – डॉली शर्मा, प्रवक्त्या, काँग्रेस

डॉली शर्मा, प्रवक्त्या, काँग्रेस

छत्रपती संभाजीनगर – राज्यात मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गुन्हेगारांवर कारवाई होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही. सरकार आणि पोलीस यांची दहशत संपल्याने बदलापूरसारख्या घटना घडत आहेत. प्रतिदिन राज्यात ४८ गुन्हे मुलींच्या विरोधात नोंद होत आहेत. महायुतीच्या निकृष्ट प्रशासनामुळे महिलांवरील गुन्ह्यांमध्ये देहलीनंतर दुसर्‍या क्रमांकावर दुर्दैवाने मुंबई आहे, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या डॉली शर्मा यांनी येथील सुभेदारी विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

डॉली शर्मा म्हणाल्या की, आरोपींनी गुन्हा मान्य केला की, त्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. न्यायालयात मोठा वेळ निघून जातो. त्यामुळे तात्काळ आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ‘एन्.डी.ए’च्या काळात भारतात प्रत्येक १६ मिनिटांनी एका महिलेवर बलात्कार होत आहे. भाजप हा सर्व प्रकार दुर्लक्ष करत थंडपणे पहात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था यांचे हे अपयश आहे. त्यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांच्या कार्यकाळात ७ मासांत गुन्ह्यांमध्ये ५७ टक्के वाढ झाली आहे. या प्रकरणात शाळेतील पदाधिकारी हे भाजपचे असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. महाराष्ट्रात बहीण सुरक्षित पाहिजे. मग ‘लाडकी बहीण’वर चर्चा करावी.