Pakistan Polymer Plastic Currency Notes : बनावट नोटा रोखण्यासाठी पाक आणणार पॉलिमर प्लास्टिकच्या नोटा !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जिहादचा पुरस्कर्ता पाकचे आर्थिक कंबरडे पार मोडले असतांना आता तेथील केंद्रीय बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. तेथे आता पॉलिमर प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याची घोषणा ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’चे गव्हर्नर जमील अहमद यांनी केली आहे. देशात बनावट नोटांच्या सुळसुळाटावर उपाययोजना काढण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून चर्चा चालू होती. बनावट नोटांमुळे अर्थव्यवस्थेची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याची टीकाही केली जात होती. यानंतर पॉलिमर प्लास्टिकपासून बनवलेल्या नोटा चलनासाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला. या प्रकारच्या नोटांच्या नकली नोटा बनवणे तुलनात्मकदृष्ट्या कठीण असते, तसेच त्यात ‘होलोग्राम’ आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजना अधिक सक्षम असल्याचे मानले जाते.

सध्या अर्थव्यवस्थेत कागदाच्या नोटा वापरल्या जातात. या वर्षी डिसेंबर महिन्याच्या आत पॉलिमर प्लास्टिकच्या नोटा बाजारात येतील, असे जमील यांनी सांगितले. नव्या नोटांमध्ये ५ सहस्र रुपयांच्या नोटेचाही समावेश असेल. या नोटा प्रामुख्याने रुपये १०, ५०, १००, ५००, १००० आणि ५००० अशा मूल्यांच्या असतील. सध्याच्या कागदी नोटा पुढील ५ वर्षे चलनात रहातील. त्यांना टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्थेतून त्या बाद करण्यात येतील.

पॉलिमर नोटा वापरणार्‍या देशांची ही आहे सूची !

सध्या जगभरातले जवळपास ४० देशांत राष्ट्रीय चलन म्हणून ‘पॉलिमर प्लास्टिक’च्या नोटांचा वापर केला जातो. न्यूझीलँड, रोमेनिया आणि व्हिएतनाम या देशांमध्ये पॉलिमर प्लास्टिकपासून बनवलेल्याच नोटा वापरल्या जातात. अन्य अनेक देशांत काही प्रमाणात काही रकमेच्या नोटा या पॉलिमर प्लास्टिकपासून बनवल्या जातात.