भारताचार्य पू.प्रा. सु.ग. शेवडे यांनी सांगितलेले काही अनुभव आणि त्‍यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती !

२३ ऑगस्‍ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘लहानपणापासून कीर्तने ऐकल्‍याने मनात राष्‍ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम निर्माण होणे अन् वयाच्‍या १२ व्‍या वर्षापासून स्‍वतः कीर्तन करण्‍यास आरंभ करणे’ हा भाग वाचला. ‘श्री गजानन महाराज यांच्‍या संदर्भात आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती’ यांतील पुढचा भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/827252.html

श्री गजानन महाराज

२ अ ३. श्री गजानन महाराज यांनी स्‍वप्‍नदृष्‍टांतात सूचित केल्‍याप्रमाणे यात्रेचे नियोजन पालटल्‍याने यात्रा यशस्‍वी होणे : त्‍यानंतर मी मुंबईला जाऊन रेल्‍वे कार्यालयात याविषयी चौकशी केली. योगायोग असा की, त्‍या कार्यालयात माझी नियमित प्रवचने ऐकणारे डोंबिवलीतील श्री. कुलकर्णी नावाचे गृहस्‍थ होते. मी त्‍यांना वरील प्रसंग सांगितला. ते म्‍हणाले, ‘‘तुम्‍हाला ज्‍यांनी यात्रेचे नवीन नियोजन सुचवले, त्‍यांनी तुम्‍हाला योग्‍य तेच सांगितले आहे. काशीयात्रेला या उष्‍ण दिवसांत जात नाहीत आणि बद्रीनाथ अन् केदारनाथ येथे याच दिवसांत जातात. तुम्‍ही यात्रेसाठी आरक्षित केलेले रेल्‍वेचा डबा रहित करा आणि बद्रीनाथ अन् केदारनाथ यांसाठीचा डबा आरक्षित करा.’’

पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

२. श्री गजानन महाराज यांच्‍या संदर्भात आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती !

या यात्रेला जाण्‍यासाठी आम्‍हाला १५ यात्रेकरूंची नावे मिळाली. ही यात्रा यशस्‍वी झाली. श्री गजानन महाराज यांनी ‘अर्धे सोड’, असे सांगितले होते. ते अगदी योग्‍य निघाले. त्‍यांनी सांगितल्‍याप्रमाणे आम्‍ही यात्रेच्‍या नियोजनात पालट केल्‍याने आम्‍हाला व्‍यवसायात यश मिळाले. त्‍यानंतरच्‍या काळातही ही यात्रा यशस्‍वी झाली. आम्‍ही यात्रेच्‍या निमित्ताने ११ वेळा बद्रीनाथ आणि केदारनाथ येथे जाऊन आलो. अशा प्रकारे श्री गजानन महाराज यांनी स्‍वतःहून मला दृष्‍टांत देऊन आगामी संकटातून वाचवले, अन्‍यथा माझी आर्थिकदृष्‍ट्या किती हानी झाली असती ! अशा प्रकारे श्री गजानन महाराज माझ्‍या जीवनात आले.

२ आ. ‘गजानन बावन्‍नी’, या स्‍तोत्राची निर्मिती !

श्री. राम होनप

२ आ १. श्री गजानन महाराजांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांच्‍यावर आधारित ‘गजानन बावन्‍नी’, हे स्‍तोत्र स्‍फुरणे : वर्ष १९७६ पासून माझ्‍या मनात शेगावचे श्री गजानन महाराज यांच्‍याविषयी आत्‍मीयता निर्माण झाली होती. वर्ष १९९१ मध्‍ये एकदा मी शेगावला श्री गजानन महाराज यांच्‍या समाधीच्‍या दर्शनाला गेलो होतो. मी प्रतिदिन ‘दत्त बावन्‍नी’ हे स्‍तोत्र म्‍हणतो. महाराजांच्‍या समाधीचे दर्शन झाल्‍यावर मी तेथे हे स्‍तोत्र म्‍हणत होतो. त्‍या वेळी माझ्‍या मनात श्री गजानन महाराज यांचे स्‍मरण चालू होते. तेव्‍हा मला ‘दत्त बावन्‍नी’, या स्‍तोत्राच्‍या चालीवर श्री गजानन महाराजांवर आधारित काही श्‍लोकांचे स्‍फुरण झाले. त्‍यात मी एकरूप होऊ लागलो. मला सुचलेल्‍या आरंभीच्‍या ओळी मी माझ्‍याकडे असलेल्‍या वर्तमानपत्रावरील कोर्‍या जागेवर लिहिल्‍या. ‘माझ्‍या तोंडात या ओळी कशा येत आहेत ?’, हे मला समजत नव्‍हते. माझ्‍याकडून अशी एकूण ५२ कडवी लिहिली गेली. ही श्री गजानन महाराज यांची कृपा आहे. या स्‍तोत्रात मला श्री गजानन महाराज यांच्‍या जीवनातील अनेक प्रसंगांचा उल्लेख करता आला. मंदिरातून घरी आल्‍यावर मी ही कडवी व्‍यवस्‍थित लिहून काढली. नंतर या ओळी मी नेहमी म्‍हणू लागलो.

२ आ २. ‘गजानन बावन्‍नी’, या स्‍तोत्राच्‍या छपाईचे नियोजन काही कालावधीनंतर आपोआप होणे :  पुढे एकदा मी बार्शी (जिल्‍हा सोलापूर) येथे भगवंताच्‍या मंदिरात प्रवचन करण्‍यासाठी गेलो होतो. त्‍या मंदिराच्‍या खाली असलेल्‍या खोलीत माझा मुक्‍काम होता. एके दिवशी पहाटे मी ‘गजानन बावन्‍नी’, हे स्‍तोत्र म्‍हणत असतांना त्‍या मंदिराचे अध्‍यक्ष डॉ. कश्‍यपी यांनी ते ऐकले. त्‍यांनी मला विचारले, ‘‘हे काय आहे ?’’ मी त्‍यांना सांगितले, ‘‘हे श्री गजानन महाराज यांचे स्‍तोत्र आहे.’’ त्‍यावर डॉ. कश्‍यपी म्‍हणाले, ‘‘ते आम्‍हालाही द्या.’’ मी त्‍यांना म्‍हटले, ‘‘हे अजून छापलेले नाही.’’ तेव्‍हा डॉ. कश्‍यपी म्‍हणाले, ‘‘ते लिहून द्या. आपण छापूया !’’ नंतर मी त्‍यांना ते स्‍तोत्र लिखित स्‍वरूपात दिले. डॉ. कश्‍यपी यांनी बार्शीतील एका मुद्रणालयाचे मालक श्री. पिंपरकर यांच्‍याकडे या स्‍तोत्राच्‍या २ सहस्र प्रती छापल्‍या.

२ आ ३. असे झाले साक्षात् भगवंताच्‍या हातून स्‍तोत्राच्‍या छापील प्रतीचे प्रकाशन ! : त्‍याच्‍या दुसर्‍या दिवशी ‘माझे प्रवचन ऐकण्‍यासाठी येणार्‍या श्रोत्‍यांना हे स्‍तोत्र म्‍हणता यावे’, यासाठी या स्‍तोत्राच्‍या काही प्रती मी मंदिरात आणल्‍या होत्‍या. मी मंदिरातील गुरुजींना सांगितले, ‘‘या स्‍तोत्राच्‍या प्रती भगवंताच्‍या मूर्तीच्‍या हाताला स्‍पर्श करून आम्‍हाला परत द्या.’’ त्‍यांनी तसे केल्‍यावर ‘गजानन बावन्‍नी’, या स्‍तोत्राच्‍या छापील प्रतीचे प्रकाशन स्‍वतः भगवंताच्‍या हातून झाले’, असे मला जाणवले. त्‍यानंतर प्रवचनासाठी आलेल्‍या लोकांनी या स्‍तोत्राचे सामूहिक पठण केले.’

(क्रमशः)

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक