ढवळी (गोवा) येथील श्रीमती गीता प्रभु (वय ६६ वर्षे) यांनी गंभीर आजारात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. मेंदूत जीभेच्या नसेमध्ये गाठ झाल्याने जीभ डावीकडे वळून बोलता  न येणे आणि आधुनिक वैद्यांनी त्यासाठी ३ लाख रुपये व्यय होणार असल्याचे सांगणे

‘वर्ष २०२१ मध्ये मी मुंबई येथे मुलाकडे होते. तेव्हा माझी जीभ डाव्या बाजूला वळत नव्हती. त्यामुळे मी बोबडे बोलत होते. त्या वेळी माझा ‘एम्.आर्.आय्.’ काढला. (‘एम्.आर्.आय्. (Magnetic Resonance Imaging) म्हणजे चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओ लहरींचा वापर करून शरिरांतर्गत भागातील कापचित्र/छेदचित्र, तसेच त्रिमितीय चित्र मिळवणे). तेव्हा माझ्या मेंदूत जीभेच्या नसेमध्ये गाठ असल्याचे निदान झाले. ‘न्युरोसर्जन’ला अहवाल दाखवल्यावर त्यांनी ‘या आजारावर एकच उपाय असून त्याचा व्यय ३ लाख रुपये येईल,’ असे सांगितले.

श्रीमती गीता प्रभु

२. मुंबईत उपचारांचा व्यय अधिक असल्याने गोव्यातील मणिपाल रुग्णालयात उपचार चालू करणे

मला मुंबई येथे ॲलोपथीचे उपचार करायचे नव्हते. त्या उपचारांनी मेंदूला इजा होण्याची शक्यता असल्याने मी मुंबईत आयुर्वेदिक उपचार चालू केले. मी रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या रामनाथी आश्रमात आल्यावर आधुनिक वैद्य उज्ज्वल कापडिया यांना अहवाल दाखवला. मी त्यांना उपचाराचा व्यय अधिक असल्याने आयुर्वेदिक उपचार घेत असल्याचे सांगितले. त्यांनी अहवालाचा अभ्यास करून मला गोव्यातील मणिपाल रुग्णालयात आधुनिक वैद्य गुंजन बैसल यांना भेटायला सांगितले.

३. मणिपाल रुग्णालयातील आधुनिक वैद्य गुंजन बैसल यांनी आर्थिक साहाय्य मिळवून देण्याविषयी आश्वस्त करणे

आधुनिक वैद्य गुंजन बैसल यांनी मला  ‘उपचारासाठी २ लाख ३० सहस्र रुपये इतका व्यय येईल’, असे सांगितले. माझ्याकडे इतके पैसे नसल्याने मी उपचार करण्यास असमर्थता दर्शवली. तेव्हा त्यांनी मला एक आवेदन पत्र (अर्ज) देण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘‘गोवा कर्करोग संघटना ‘कॅन्सर सोसायटी’ तुम्हाला जेवढे पैसे देईल, तेवढेच पैसे मणिपाल रुग्णालय देईल. अशा रुग्णांना साहाय्य करणार्‍या संस्थांकडून मी तुम्हाला साहाय्य मिळवून देईन.’’ माझ्या ६६ वर्षांच्या आयुष्यात प्रथमच मी अशा आधुनिक वैद्यांना भेटले.

४. मणिपाल रुग्णालयात मुंबईपेक्षाही प्रगत यंत्रसामग्री असून केवळ मेंदूतील गाठीवरच ‘रेडिएशन’ होणार असल्याचे समजल्यावर ‘मुंबई येथे उपचार करून न घेण्याचे ठरवले, ही परात्पर गुरु डॉक्टरांचीच अपार कृपा आहे’, असे जाणवणे

मी मणिपाल रुग्णालयातील आधुनिक वैद्य गुंजन यांना माझे अहवाल दाखवल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही मुंबई येथे उपचार केले असते, तर तुमच्या मेंदूवर ‘रेडिएशन्स’चा (किरणोपचारांचा) परिणाम झाला असता. आमच्याकडे त्यांच्यापेक्षाही प्रगत यंत्रसामग्री (मशिनरी) असल्याने केवळ तुमच्या मेंदूतील गाठीवरच ‘रेडिएशन’ होणार आहे.’’ ‘मी मुंबई येथे उपचार करून न घेण्याचे ठरवले’, हीसुद्धा परात्पर गुरु डॉक्टरांचीच अपार कृपा आहे’, याची मला जाणीव झाली.

५. आधुनिक वैद्यांनी ‘रेडिएशन’ केल्यामुळे चेहर्‍याचा डावा भाग ३ आठवडे दुखेल’, असे सांगणे; मात्र पू. भैयाजी महाराज यांच्या उपायांमुळे २ आठवड्यांतच दुखणे दूर होणे

‘२२.४.२०२२ या दिवशी पू. भैयाजी महाराज उपाय करण्यासाठी धामसे येथे आले होते. मला त्यांच्याकडे पाहून पुष्कळ आनंद वाटत होता. मला त्यांच्याभोवती पांढर्‍या रंगाची प्रभावळ दिसत होती. ‘रेडिएशन’ केल्यामुळे माझ्या चेहर्‍याचा डावा भाग दुखत होता. आधुनिक वैद्यांनी मला ‘३ आठवडे असे दुखेल’, असे सांगितले होते. पू. भैयाजी महाराज यांनी माझ्यावर केलेल्या उपायांमुळे २ आठवड्यांतच माझे दुखणे नाहीसे झाले.

मी या अनुभूतीसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. भैयाजी महाराज याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ’

– श्रीमती गीता प्रभु (वय ६६ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (२४.४.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक