Pew Research Report : जगातील एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे २८ कोटी लोक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित !

नवी देहली – ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालानुसार जगातील एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे २८ कोटी लोक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित आहेत. हे प्रमाण जागतिक लोकसंख्येच्या एकूण ३.६ टक्के आहे. या स्थलांतराची ३ सर्वांत मोठी कारणे म्हणजे ‘युद्ध, आर्थिक संकट आणि नैसर्गिक आपत्ती’, ही आहेत.


१. धार्मिक आधारावर पाहिल्यास, स्वतःचा देश सोडून गेलेल्या या २८ कोटी लोकांपैकी सर्वाधिक ४७ टक्के ख्रिस्ती आहेत. २९ टक्के मुसलमान आणि ५ टक्के हिंदु स्थलांतरित आहेत.

२. ख्रिस्त्यांची सर्वांत मोठी लोकसंख्या रोजगारासाठी मेक्सिकोतून अमेरिकेत जाते आणि तेथे स्थायिक होते. गृहयुद्धाच्या भीषणतेचा सामना करणार्‍या सीरियातून मुसलमानांचे सर्वांत मोठे स्थलांतर झाले आहे. स्थलांतरित जीवनाच्या संकटातून वाचण्यासाठी मुसलमान सौदी अरेबियात रहायला जातात.

३. बहुतेक हिंदू रोजगाराच्या शोधात भारताच्या एका भागातून दुसर्‍या भागात स्थलांतरित होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहाता सर्वाधिक हिंदू हे अमेरिका आणि संयुक्त अरब अमिराती येथे जातात.

४. या २८ कोटी आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांपैकी स्थलांतरित हिंदूंची लोकसंख्या १ कोटी ३५ लाख आहे. यांपैकी ३० लाख (२२ टक्के) भारतात, २६ लाख (१९ टक्के) अमेरिकेत आणि ८ टक्के संयुक्त अरब अमिरातमध्ये स्थायिक झाले आहेत.

५. हिंदु स्थलांतरितांच्या मूळ जन्मस्थानाची आकडेवारी पाहिली असता, ७६ लाख (५७ टक्के) भारतात, १६ लाख (१२ टक्के) बांगलादेशात आणि १५ लाख (११ टक्के) नेपाळमध्ये जन्मलेले असल्याचे दिसून आले.

६. ‘प्यू रिसर्च’च्या अहवालानुसार, स्थलांतरासाठी हिंदू सर्वाधिक अंतर कापतात; कारण भारतातील अंतर्गत पालटाखेरीज ते आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थायिक होण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन यांसारख्या देशांकडे वळतात. दुसर्‍या देशात स्थायिक होण्यासाठी ते सरासरी ४ सहस्र ९८९ कि.मी. प्रवास करतात.

७. बहुतेक, म्हणजे ४४ टक्के हिंदू स्थलांतरित आशिया-प्रशांत प्रदेशात रहातात. त्यानंतर या श्रेणीतील स्थान अनुक्रमे मध्य पूर्व-उत्तर आफ्रिका क्षेत्र (२४ टक्के) आणि उत्तर अमेरिका (२२ टक्के) येते. अनुमाने ८ टक्के हिंदु स्थलांतरित युरोपमध्ये रहातात आणि दक्षिण अमेरिका आणि उप-सहारा आफ्रिकेत रहाणार्‍या हिंदूंची संख्या फारच अल्प आहे.

८.  जगातील ३० टक्के लोकसंख्या ख्रिस्ती आहे. २५ टक्के मुसलमान आणि १५ टक्के हिंदु आहे. २३ टक्के लोक कोणत्याही धर्माला मानत नाहीत. स्थलांतरितांच्या दृष्टीकोनातून कोणत्याही धर्माला न मानणार्‍यांकडे पाहिले, तर ही लोकसंख्या १३ टक्के आहे. यांतील बहुतांश लोक चीनमधील असून ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.