आदर्श राजकारणी हवेत !

नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे (डावीकडे)

नेदरलँडच्या सर्वोच्च पदावर असणारे, म्हणजे पंतप्रधान मार्क रुटे यांनी नुकताच कार्यकाळ संपल्यानंतर त्यागपत्र दिले. घरी जातांना त्यांनी स्वत:च्या सायकलचा वापर केला. त्यांनी कोणत्याही शासकीय वाहनाची मागणी केली नाही. जगातील अनेक देशांतील पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष हे त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अत्यंत साधेपणाने जीवन जगतात. कुणी शेती करतो, कुणी नोकरी किंवा कुणी प्राध्यापक म्हणून त्यांच्या उत्पन्नाचे साधन शोधतो. त्यांचा हा आदर्श भारतीय राजकारण्यांनी घ्यावयास हवा. अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्यांपासून राष्ट्रपती, पंतप्रधान पदापर्यंत कार्यरत असणार्‍या व्यक्तींनी हा साधेपणाचा आदर्श घेतला, तर भारतीय राजकारणाचे वेगळेच चित्र पहावयास मिळेल !

भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा काळ हा अगदी प्रामाणिकपणे, तत्त्वाने आणि लोकहिताची पर्वा करणार्‍यांचा होता. जनतेशी अत्यंत प्रामाणिकपणे वागणारे, आदर्श घालून देणारे राजकारणी आपल्याही देशांमध्ये झालेले आहेत. यामध्ये सर्वांत पहिल्यांदा नाव येते ते लालबहादूर शास्त्री यांचे ! राजकारण न करता ‘देशसेवा करत आहे, जनतेची सेवा करणारा मी एक नम्र सेवक आहे’, ही भावना त्यांच्या मनात होती. त्याचे उत्तम उदाहरण, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा ते पंतप्रधानपदावर कार्यरत होते, तेव्हा त्यांचे साडेपाच सहस्र रुपयांचे कर्ज त्यांच्या पत्नीने त्यांच्या निधनानंतर फेडले, तसेच माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा, अटलबिहारी वाजपेयी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असे अनेक आदर्श राजकारणी होते की, ज्यांनी त्यांच्या वागण्यातून, कृतीतून आणि विचारांतून आदर्श घालून दिलेला आहे. त्यांचे राजकारण हे आदर्श विचारांचे, सामाजिक जाणिवांचे आणि तत्त्वनिष्ठतेचे होते !

सध्या भारतातील राजकारणाची स्थिती नेमकी याविरुद्ध आहे. आज राजकारण, पद, सत्तेत असणे हा एक व्यवसाय झालेला आहे. अगदी एकवेळ जरी निवडणूक जिंकली, तरी त्याच्याजवळ एवढी माया (पैसा) जमते की, त्याच्या आताच्या अन् त्याच्या पुढच्या पिढ्यांना आरामात जीवन जगता येईल. मग कुणाच्या शेतातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते, तर कुणाचा व्यवसाय जोमाने चालतो, उद्योगधंदे चालतात. राजकारण हा व्यवसाय म्हणून पाहिला की, त्यात स्पर्धा, हेवेदावे, चढाओढ आणि ती जिंकण्यासाठी काहीही करण्याची सिद्धताही होते. आजच्या राजकारण्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, गुंड प्रवृत्तीचे आणि भ्रष्टाचारी यांची संख्या अधिक दिसून येते. अगदी कारागृहामध्ये असतांनाही निवडणूक लढवून ते विजयी होतात. यात स्वार्थ, अहंकार, लौकिक, मानपमान, वैरभाव हे सारे येते. राजकारण ही खरी समाजसेवा, देशसेवेचे ऋण फेडण्याचे मोठे माध्यम होणे आवश्यक आहे. असे आदर्श राजकारणी मिळण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

– श्री. अमोल चोथे, पुणे