हिंदूंच्या श्रद्धेचे भंजन करणार्‍या नाटकावर कायमस्वरूपी बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

‘संगीत वस्त्रहरण’ नाटकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची पोलिसांत तक्रार !

हिंदु जनजागृती समितीची मागणी

मुंबई : आज्ञापालन, शौर्य, भक्ती, धर्माचरण, सत्यवचनीपणा आदी अनेक गुणांसाठी भारतीय समाज ज्यांना आदर्श मानतो, त्या महाभारतातील पांडवांना विकृत दाखवून ‘संगीत वस्त्रहरण’ नाटकात त्यांचा अनादर करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, तमाशा, कीर्तन, कथा आदी सर्वच क्षेत्रांत महाभारताचा संदर्भ घेतांना पांडवांचा आदर्श भारतीय समाजापुढे ठेवण्यात आला आहे. कला ही संस्कृतीला पुढे नेत असते; पण ‘संगीत वस्त्रहरण’ नाटकातून संस्कृतीचेच विकृतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे संगीत वस्त्रहरण नाटकावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने १७ ऑगस्ट या दिवशी नवी मुंबई येथील वाशी पोलीस ठाण्यात केलेल्या तकरीत केली.

‘संगीत वस्त्रहरण’ नाटकाविरोधात नवी मुंबई येथील वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून आल्यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. वसंत सणस आणि हिंदुत्वनिष्ठ

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. वसंत सणस, सनातन संस्थेचे श्री. विजय भोर यांसह अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

१५ ऑगस्ट या दिवशी मुंबईतील विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सायंकाळी ४.३० वाजता ‘संगीत वस्त्रहरण’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या व्यतिरिक्त मुंबईमध्ये विविध ठिकाणी या नाटकाचे प्रयोग सादर केले जाणार आहेत. कोकणात नमन मंडळे किंवा नाट्यमंडळे हे दशावतार सादर करतात. अशाच प्रकारे एक मंडळ ‘संगीत वस्त्रहरण’ या नाटकात पांडवांची जाणीवपूर्वक चेष्टा करण्यात आली आहे. समाजात आधीच अनैतिकता वाढत आहे, अशात आपल्या संस्कृतीत आदर्श असलेल्या व्यक्तीमत्त्वांवरही चेष्टा होऊ लागली, तर नैतिक अध:पतनाला साहाय्यभूत होईल, असे समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक – 

संगीत वस्त्रहरण नाटकातील आक्षेपार्ह भाग !

अर्जुन – अर्जुनाची भूमिका साकारणारे पात्र मद्य पिऊन तर्र झालेले दाखवण्यात आले आहे. आचकट विचकट चाळे करतांना दाखवण्यात आले आहे. अर्जुन भीमाला लाथ मारतो, रंगमंचावर ठुमके देत प्रवेश करतो, मद्य पिऊन रंगमंचावर पडतो, असे दाखवण्यात आले आहे.

विदूर – विदूर महाभारतातील ज्ञानी व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखले जाते. हस्तिनापूरचा सम्राटही आणि स्वत: पितामह भीष्मही वेळोवेळी विदूरांचा सल्ला घेत होते. विदूरांची श्रीकृष्णभक्ती उच्च पातळीची होती. असे विदूर नाटकात विडी ओढत रंगमंचावर येतांना, तसेच विदूर आणि युधिष्ठिर तमाशातील बाईसमवेत रंगमंचावर नाचतांना दाखवले आहेत.

भीष्म – भगवान श्रीकृष्णही ज्यांच्याशी आदराने वागतात, असे महाभारतातील वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध व्यक्तीमत्त्व म्हणजे पितामह भीष्म. भारतवर्षातील पराक्रमी पुरुषांत अग्र असलेले भीष्म रंगमंचावर अत्यंत अश्‍लील गाण्यावर नाचत येतांना, तसेच रंगमंचावर आचकट-विचकट चाळे करतांना दाखवण्यात आले आहेत.

युधिष्ठिर – पांडवांपैकी ज्येष्ठ आणि सत्यवचनी असे युधिष्ठिर यांना विदूर कुत्र्याला बोलावतात, त्याप्रमाणे रंगमंचावर बोलावतांना दाखवण्यात आले आहे. शकुनीमामा युधिष्ठिरला शिवी देतो.

द्रौपदी – द्रौपदी स्वत:च्या साडीचा पदर पुढे करून कौरव आणि पांडव यांना स्वत:चे वस्त्रहरण करण्यास सांगतांना दाखवण्यात आले आहे. द्रौपदी ही विदूर आणि युधिष्ठिर यांच्यापुढे अत्यंत अश्‍लील गाण्यावर नाचतांना दाखवण्यात आले आहे.


इतर आक्षेपार्ह प्रसंग !

कौरव, पांडव आणि द्रौपदी हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नाचतांना दाखवले आहेत. इंद्रदेवाला ‘कामाठापुरचा देव’ असे म्हटले आहे. पांडवांच्या तोंडी शिव्या आहेत. नाट्यप्रयोग पहाण्यासाठी गावाचे अध्यक्ष येतात. त्यांना उद्देशून ‘सार्वजनिक गणपति झोपला’, असा उल्लेख केल्याने श्रीगणेशाचा उपहास  झाला आहे.

कायद्याचा धाक नसल्याने अनेक जण असे देवतांचे विडंबन करू धजावतात. ‘संगीत वस्त्रहरण’ नाटकात पांडवांना विकृत दाखवलेले प्रसंग हिंदु धर्मप्रेमींच्या भावना दुखावणारे, तसेच संस्कृतीचे हनन करणारे आहेत. त्यामुळे सरकारने या नाटकावर त्वरित बंदी घालावी आणि हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत अन् राष्ट्रपुरुष यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.


संपादकीय भूमिका

हिंदू धर्माभिमानशून्य असल्यामुळे ऊठसूठ कुणीही अशा प्रकारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांची टिंगलटवाळी करतो. याला हिंदूंनी विरोध करण्याऐवजी उलट तेच अशी नाटके पहातात आणि त्याला हासून अन् टाळ्या वाजवून दाद देतात, हे त्यांना अत्यंत लज्जास्पद ! आपत्काळात अशांचे रक्षण देव तरी करेल का ? अशा प्रकारचे अशलाघ्य नाटक कधी इस्लाम किंवा ख्रिस्ती यांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात कुणी करू धजावत नाही. त्यामुळे जागृत हिंदूंनी अशी नाटके बंद होऊन उत्तरदायी हिंदुद्वेष्ट्यांना कारागृहात डांबले जाईपर्यंत आवाज उठवला पाहिजे !