१. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवतांना प.पू. डॉक्टरांची लक्षात आलेली दूरदृष्टी !
उत्सवांमधील विडंबन, जत्रांमधील जुगार, देवतांचे विडंबन या विरोधात दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रकाशन आरंभ होताच काही अल्पावधीतच त्या संबंधाने जागृती होण्यास आरंभ झाला. प्रसारामध्ये साधक अन्य संप्रदायांच्या संघटनांना भेटून त्यांना एकत्र करून काही गोष्टींना कसा पायबंद घालता येईल, यासाठी प्रयत्न करू लागले; पण या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणे यश येत नव्हते. या पार्श्वभूमीवर सप्टेंबर २००२ मध्ये चिपळूण येथे एका संघटनेच्या नियतकालिकाने श्रीराम, सीता आणि हनुमान यांवर अश्लाघ्य टीका करून विडंबन केले होते. याविषयी एक संत म्हणाले, ‘‘असे आक्षेपार्ह लिखाण छापले आहे आणि आपण काय करत आहात ? नुसते तुमच्या दैनिकात निषेध काय छापता ?’’ तेव्हा मी मुंबईत होतो. प.पू. डॉक्टरांनी मला दूरभाष करून सांगितले, ‘‘एक संत असे म्हणत आहेत, तर काय करायचे, ते पहा.’’ प.पू. डॉक्टरांच्या असे सांगण्यातच पुढचा संकल्प दडलेला होता, असे मला जाणवले. ते पुढे जे सहजतेने घडत गेले, त्यावरून स्पष्ट होईल.
दुसर्या दिवशी सकाळी मी चिपळूणला (जिल्हा रत्नागिरी) गेलो. तेथे असलेल्या काही साधकांकडून माहिती घेतली आणि वारकरी संप्रदायाच्या तिथल्या २ ह.भ.प.ना भेटलो. त्यांना परिस्थिती समजावून सांगितली आणि ‘याविषयी आपण एखादा मोर्चा काढू शकतो का ?’, असे विचारले. ‘त्यांची अनुकूलता आहे’, असे दिसल्यावर दुसर्या दिवशी सायंकाळी तेथील विरेश्वर मंदिरामध्ये एक प्राथमिक बैठक घेतली. जिल्ह्यात या विचारांना अनुकूल असणार्या अन्य संप्रदायातील व्यक्ती आणि समाजातील अन्य व्यक्ती उपस्थित होत्या. त्या सर्वांना ‘आपल्याकडून देवतांवर झालेल्या टीकेचा विरोध व्हावा’, असे वाटत होते. त्याच वेळी एकूण परिस्थितीचा रोख पहाता विशिष्ट एकाच संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व हिंदू एकत्र येणे कठीण आहे आणि आले, तरी तसा प्रभाव ते पाडू शकणार नाही, हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे मग त्या सर्व मंडळींसमोर नावात ‘हिंदु’ शब्द असलेली एक समिती आपण स्थापन करूया आणि त्या समितीच्या नावाने आपण अशा गोष्टींना विरोध करण्यापूर्वी एकत्र येऊ असा प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव सगळ्यांनी स्वीकारला. ‘हिंदु जनजागृती समिती’ची ती पहिली बैठक होती. मोर्चा काढायचे ठरले. पोलिसांनी ‘मोर्चात घोषणा इत्यादी काही होणार नाही आणि वातावरण तणावाचे बनणार नाही, हे पहा’ इत्यादी सूचना दिल्या. आमच्यावर एक प्रकारे तो दबावच होता; कारण अशा गोष्टींची सवय कुणालाच नव्हती. त्याचप्रमाणे सर्व मंडळी नवीन होती. कुणी काही चुकीचे वागले, तर ‘पोलीस त्रास देतील’, हा ताणही होताच. त्यामुळे एका बाजूला आपल्या मनात असलेला रोष प्रगट व्हायला हवा आणि दुसर्या बाजूला देवतांचे अधिष्ठान आणि थोड्या फार सात्त्विक पद्धतीने सर्व व्हायला हवे होते. हे घडण्यासाठी ‘हातात देवतांवर टीका करणार्यांचा निषेध करणारे कापडी फलक आणि मुखाने देवतेचा नामजप म्हणायचा’, असे करण्याचे सुचवले. यातून अन्य काही घोषणा होऊन गडबड होण्याचे टळले. असे मोर्चे केवळ एकाच ठिकाणी न करता रत्नागिरी जिल्ह्यात दोन ठिकाणी आणि त्याच्या पाठोपाठ मुंबई, पुणे आदी ठिकाणी करायचे ठरले. परम पूज्य डॉक्टरांना हे सर्व कळवले. त्यांनी प्रत्यक्ष मोर्चाच्या आदल्या दिवशी आणि मोर्चाच्या दिवशी गोवा अन् मुंबई येथील साधकांनाही मोर्चा पहाण्यासाठी आणि शिकण्यासाठी पाठवले. या मोर्चामध्ये कुणालाच काय आणि किती यश मिळेल ? याचा अंदाज नव्हता. ‘हे सर्व आम्हाला झेपेल का ? आमच्याकडून सर्व व्यवस्थित सांभाळले जाईल का ?’, असाही अंदाज नव्हता, तरीही प.पू. डॉक्टरांनी आम्हाला आशीर्वाद दिला. त्यांनी सर्वांवर मोठा विश्वास टाकला. यातून केवळ काही कार्य होण्यासाठी सूक्ष्मातून कृपा केलीच; परंतु सोबत अन्य साधकांना पाठवून प्रत्यक्ष इतरांनाही साहाय्याला आणि शिकायला पाठवले. त्यांनी हे सर्व होण्यासाठी साधकांना आशीर्वाद दिले. स्थानिक मंडळी ज्यामध्ये साधक आणि समाजातील नवीन धर्मप्रेमी होते, त्या सर्वांनी कापड मिळवणे, कापडी फलक रंगवणे, असे जे जे करावे लागत होते, ते ते सर्व उत्साहाने केले. मोर्चा सहजतेने पार पडला. असे होणे, हे केवळ दैवी होते. श्री गुरूंच्या कृपेवाचून इतक्या सहजतेने होणे अशक्य होते. २ – ३ मोर्चे यशस्वी झाल्यावर पुढे त्याला नामदिंडीचे स्वरूप आले.
२. पुढे होऊ घातलेल्या कार्याच्या सापेक्ष साधकांना आधीच सिद्ध करणे
महाराष्ट्रातील अन्य भागांतील साधकांना करत असलेले कार्य थांबवून लगेच समितीच्या उरलेल्या नामदिंडींना उपस्थित रहाण्यासाठी आणि त्या कशा आयोजित केल्या जात आहेत?, हे बघण्यासाठी समितीच्या वतीने पहिली नामदिंडी चिपळूणला काढली गेली. नंतरच्या नामदिंड्या ठाणे आणि पनवेल येथे निघाल्या. दोन नामदिंड्यांमध्ये जेमतेम एक आठवड्याचे अंतर असूनही विदर्भ, मराठवाडा आदी दूरदूरच्या ठिकाणांहूनही साधक पनवेल येथील नामदिंडी बघायला आणि त्यातील टप्पे समजून घ्यायला आले होते. अशा प्रकारे इतक्या शीघ्र गतीने निर्णय होणे, हे केवळ तेवढ्या दूरदृष्टीमुळेच शक्य होऊ शकते, हे आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. मागे वळून पाहिले, तर त्या काळातील साधकांना लक्षात येईल की, प्रभात फेरी काढायला शिकवणे, नामदिंडी काढणे, समाजाला एकत्र करायला शिकवणे, जाहीर सभा घेणे, प्रवचनांतून समाजात जाऊन भूमिका मांडायला शिकवणे, हे सर्व प.पू. डॉक्टरांनी समाजात जाऊन प्रवचने घ्यायला सांगून बोलायला शिकवणे, दैनिक, तसेच साप्ताहिकाच्या माध्यमातून विचार मांडून काही प्रशिक्षण यांद्वारे करून घेतले.’
– श्री. दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०२४)