विषय आणि वासना यांपासून दूर नेण्याविषयी श्रीकृष्ण अन् संत ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे मार्गदर्शन करून साधकांमध्ये वैराग्य निर्माण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्याविषयी भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे, 

इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च ।
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १३, श्लोक ८
अर्थ : इह आणि पर लोकांतील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती अन् अहंकारही नसणे, तसेच जन्म, मृत्यू, वृद्धत्व अन् रोग इत्यादींमध्ये दुःख आणि दोष यांचा वारंवार विचार करणे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. गीतेतील वरील श्लोकाचे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत केलेले विवेचन !

आणि विषयांविखीं । वैराग्याची निकी । 
पुरवणी मानसीं कीं । जिती आथी ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ५१३
अर्थ : विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो.

वमिलिया अन्ना । लाळ न घोंटी जेवीं रसना । 
कां आंग न सूये आलिंगना । प्रेताचिया ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ५१४
अर्थ : ओकलेल्या अन्नाला पाहून ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटत नाही अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरता कुणीही आपले अंग पुढे करत नाही.

विष खाणें नागवे । जळत घरीं न रिगवे । 
व्याघ्रविवरां न वचवे । वस्ती जेवीं ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ५१५
अर्थ : जसे (कोणालाही) विष खाववत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही आणि वाघाच्या दरीमधे वस्ती करण्यास जाववत नाही.

धडाडीत लोहरसीं ।
उडी न घालवे जैसी । 
न करवे उशी । अजगराची ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ५१६
अर्थ : रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसात जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही.

अर्जुना तेणें पाडें । जयासी विषयवार्ता नावडे । 
नेदी इंद्रियांचेनि तोंडें । कांहींच जावों ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ५१७
अर्थ : अर्जुना, तितक्या मानाने ज्याला विषयांची गोष्ट आवडत नाही आणि जो इंद्रियांच्या द्वाराने (मनाकडे) कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही.

(पू.) शिवाजी वटकर

१ अ. साधनेच्या दृष्टीने वरील ओव्यांचा भावार्थ 

१ अ १. ‘विषय सोडणे आणि वैराग्य अंगी बाणवणे’, हे अतिशय कठीण असणे : आपल्याला जे आवडते, ललचावते आणि जे भोगल्यावर थोडेफार अन् अल्प कालावधीसाठी सुख मिळते, त्यास ‘विषय’ म्हणतात. ‘विषय’प्राप्ती झाली नाही की, अपेक्षाभंगामुळे आपल्या वाट्याला दुःख येते. यातून बाहेर पडण्यासाठी ‘वैराग्य’ हा सद्गुण अंगी बाणवला पाहिजे. विषय हे शरीर आणि मन यांच्याशी संबंधित आहेत. तेथे सुख-दुःख आहे. जोपर्यंत आपले अस्तित्व आहे, तोपर्यंत आपल्याला ‘विषय सोडणे आणि वैराग्य अंगी बाणवणे’, हे अतिशय कठीण जाते.

१ अ २. विषय आणि प्रलोभने यांपासून दूर जाण्यासाठी वरील ओव्यांमधून संत ज्ञानेश्वरांनी दिलेले दृष्टीकोन ! : विषयांपासून दूर जाण्यासाठी वरील ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर जहाल शब्दांत सांगतात, ‘वांतीकडे बघून जशी जिभेला लाळ सुटत नाही, प्रेताला आलिंगन देण्यास जसे आपण धजत नाही, आपल्याला विष खाववत नाही, आग लागलेल्या घरात आपण िशरत नाही, वाघांची वस्ती असलेल्या दरीत आपण जात नाही, तापलेल्या लोखंडाच्या रसात आपण उडी घेऊ शकत नाही किंवा अजगराच्या वेटोळ्याची आपण उशी करत नाही, त्याप्रमाणे माणसाने विषयांपासून, म्हणजे प्रलोभनांपासून दूर रहावे.’ यावरून ‘विषय आणि वासना जाऊन सद्गुण अंगी बाणवणे किती अशक्यप्राय आहे !’, हे लक्षात येते, तसेच ‘त्यावर उपाय काढणेही अत्यावश्यक आहे’, याची जाणीव होते.

२. गीता आणि ज्ञानेश्वरी आचरणात आणण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडून करून घेत असलेली साधना !

२ अ. वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्मशास्त्र शिकवणे आणि त्यानुसार साधकांकडून कृती करून घेणे : सध्याच्या कलियुगातील आपत्काळात जनता सुख-दुःखाच्या दुष्ट चक्रात अडकली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले वैज्ञानिक परिभाषेत ‘का आणि कसे ?’, अशा स्वरूपात अध्यात्मशास्त्र शिकवत आहेत. ते सुख आणि आनंद यांतील भेद सांगून ‘आनंद कसा मिळवायचा ?’, याची प्रत्यक्ष कृती साधकांकडून करून घेत आहेत.

२ आ. साधकांकडून स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवून घेऊन त्यांना आनंदाचा मार्ग दाखवणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना सांगितली आणि ते ती सहस्रो साधकांकडून करून घेत आहेत. या साधनामार्गात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला ६० टक्के महत्त्व दिले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण साधकाकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून घेतली. ‘स्वभावदोष घालवणे आणि गुण वाढवणे’, यांसाठी प्रयत्न केल्याने मला जीवनात आनंद मिळत आहे. ‘ही प्रक्रिया सातत्याने, चिकाटीने आणि तळमळीने केल्यास गुरुकृपेने आनंद मिळणे सहज शक्य होते’, हे मी मागील ३१ वर्षे अनुभवले आहे.

२ इ. परात्पर गुरु डॉक्टर साधकांकडून सेवा आणि साधना करून घेऊन त्यांना मोक्षाकडे नेत असणे : परात्पर गुरु डॉक्टर म्हणतात, ‘‘साधना म्हणजे तन, मन, धन आणि सर्वस्व यांचा त्याग. त्यागातच आनंद आहे.’’ विषय आणि वासना यांचा त्याग म्हणजेच वैराग्य होय !  त्यामुळे साधकाला सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन आनंद मिळतो. हे साध्य करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातन संस्थेची स्थापना केली. ते साधकांकडून सेवा आणि साधना करून घेत आहेत आणि त्यांतून आनंद देऊन त्यांना मोक्षाकडे घेऊन जात आहेत.

२ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना सहजतेने विषयांपासून दूर नेऊन त्यांच्यात नकळत वैराग्य आणणे : भगवद्गीतेतील वरील श्लोकातून उमजले की, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठी ‘विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकार नसणे’, हे आवश्यक आहे. ज्ञानेश्वरीतील वरील ओव्यांमध्ये ‘विषय आणि वासना यांपासून दूर जाण्यासाठी किती कठोर दृष्टीकोन घेतले पाहिजेत !’, हे कळले. ते वाचल्यावर मला ‘विषय आणि वासना यांपासून माझी या जन्मात सुटका होईल’, याची सुतराम शक्यता वाटली नाही; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्यासारख्या साधकांना विषयापासून दूर नेण्यासाठी आणि आनंद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून घेत आहेत. ते साधकांना सहजतेने विषय आणि वासना यांपासून दूर नेऊन त्यांच्यात नकळत वैराग्य निर्माण करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला कलियुगात अनन्यसाधारण महत्त्व आहे’, याची मला जाणीव झाली आणि माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

मागील अनेक जन्मांत आम्हा साधकांना विषय आणि वासना यांपासून दूर जाता आले नाही अन् आम्हाला वैराग्य आलेले नाही. ‘ते साध्य होण्यासाठी आम्हा साधकांकडून आपल्याला अपेक्षित असे प्रयत्न करून घ्यावेत’, अशी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.