‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा गोवा येथे साजरा झाला. त्या वेळी सांगली जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. शशिकला पाटील, जयसिंगपूर, जिल्हा सांगली.
१ अ. ‘ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी गोवा येथे जायचे आहे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होणार आहे’, असे समजताच मला पुष्कळ आनंद झाला. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझ्या अंतर्मनातील सुप्त इच्छा पूर्ण केली’, असे मला वाटले.
१ आ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी साधिकेला शाळेत पूर्वनियोजित काम असूनही ब्रह्मोत्सवासाठी जाता येणे
१ आ १. ब्रह्मोत्सवाच्या आधीचा दिवस उजाडला, तरीही साधिकेचे काम करायला कुणी सिद्ध नसणे; मात्र साधिका स्थिर असणे : ११.५.२०२३ या दिवशी मला शाळेत पूर्वनियोजित काम होते. त्या दिवशीचे काम पालटून घेण्यासाठी मी पुष्कळ प्रयत्न केले; पण अडचण सुटत नव्हती. ब्रह्मोत्सवाच्या आधीचा दिवस उजाडला, तरीही माझे काम करायला कुणीही सिद्ध नव्हते; मात्र ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला या सोहळ्याला घेऊन जाणार आहेत’, ही खूणगाठ माझ्या अंतर्मनात पक्की होती. मी स्थिर होते. मी प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयोग करत होते.
१ आ २. साधिकेला गोवा येथे जाण्याची अनुमती मिळणे: १०.५.२०२३ या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शेवटच्या क्षणी मला गोवा येथे जाण्याची अनुमती दिली. ‘ही गुरुदेवांचीच कृपा आहे’, हे माझ्या लक्षात आले. माझे मन आनंदाने उड्या मारू लागले. मला परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. माझ्या संपूर्ण देहामध्ये चैतन्य पसरले होते.
१ इ. ब्रह्मोत्सवाच्या वेळी रथारूढ गुरुदेवांचे आरंभी श्रीकृष्णाच्या रूपात दर्शन होणे : ब्रह्मोत्सवाच्या वेळी रथारूढ परात्पर गुरुदेवांचे आरंभी मला श्रीकृष्णाच्या रूपात दर्शन झाले. माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘मी पृथ्वीवर नसून वैकुंठ लोकात हा सोहळा पहात आहे’, असे मला जाणवत होते. परात्पर गुरुदेव हात उंचावून साधकांना नमस्कार करत असतांना माझा कंठ कृतज्ञतेने दाटून येत होता. ‘न भूतो न भविष्यति ।’, म्हणजे ‘पूर्वी कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही ’, असा हा सोहळा माझ्या हृदयमंदिरात कायमचा कोरला गेला आहे.
गुरुदेवांचा चरणी, कोटीशः कृतज्ञता !’
२. सौ. सुप्रिया शिंदे, सांगली
२ अ. रथाचे दर्शन घेतांना रथ पुष्कळ तेजस्वी दिसणे : ‘ब्रह्मोत्सवाची सांगता झाल्यानंतर मी रथाचे दर्शन घेण्यासाठी गेल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य रथात प्रक्षेपित झाले आहे’, असे मला जाणवत होते. रथामधील परात्पर गुरु डॉक्टरांचे आसन, त्याचा रंग आणि रथावरील नक्षीकाम पुष्कळ तेजस्वी दिसत होते. रथ पाहून माझे मन शांत झाले.’
३. सौ. ज्योती मुळे, सांगली
३ अ. १० वर्षांपासून होत असलेला मानदुखीचा त्रास परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनामुळे दूर होणे : ‘मला ब्रह्मोत्सवाच्या वेळी पुष्कळ चैतन्य अनुभवता आले. गुरुमाऊलींच्या दर्शनामुळे मला आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ झाले. माझी मान १० वर्षांपासून पुष्कळ दुखत होती. मी अनेक औषधोपचार केले. तेव्हा काही वेळ माझे मानेचे दुखणे थांबत असे आणि नंतर काही वेळाने पुन्हा मान दुखायला लागत असे. मला १० वर्षांपासून होणारा मानदुखीचा त्रास केवळ गुरुमाऊलींच्या अपार कृपेमुळे दूर झाला. त्याबद्दल मी गुरुमाऊलींच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण होऊन त्यांना अनुभवता येणे : ब्रह्मोत्सव झाल्यापासून मी पुष्कळ शांत आणि स्थिर झाले आहे. मी प्रथमच अशी स्थिती अनुभवत आहे. माझ्या मनातील नकारात्मक विचार नष्ट झाले आहेत. माझ्याकडून सातत्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण होऊन मला त्यांना अनुभवता येत आहे. माझा उत्साह वाढला आहे आणि मला आनंद अनुभवता येत आहे.’
(लेखातील सूत्रांचा मास : जून २०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |