२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता. त्यानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये सोलापूर येथील साधकांनी अनुभवलेला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद येथे दिला आहे.
१. ‘रामराज्य स्थापनेची प्रतिज्ञा’ घेतांना समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद
१ अ. ‘सनातनच्या साधकांना कधीही लागले, तर साहाय्य करा’, असे इस्कॉनच्या साधकाने भजनाला आलेल्या लोकांना सांगणे : ‘एका ठिकाणी इस्कॉनचे साधक भजन करत होते. तिथे जाऊन त्यांच्या अनुमतीने आम्ही ‘रामराज्य स्थापनेची प्रतिज्ञा’ घेतली. त्यानंतर तिथे असलेल्या इस्कॉनच्या एका साधकाने ध्वनीक्षेपकावरून सर्वांना सांगितले, ‘‘हे (सनातनचे साधक करत आहेत, ते) खरे धर्माचे कार्य आहे. यांना धर्म कळला; म्हणून ते पूर्णवेळ साधना (धर्मकार्य) करत आहेत. आता तुम्ही जी प्रतिज्ञा घेतली, ती तुमच्या अंतर्मनामध्ये पोचली, तर तुम्ही धर्मासाठी असेच कार्य करू शकाल. त्यांचे (सनातनच्या साधकांचे) जीवन धन्य आहे. त्यांना कधीही काही साहाय्य लागले, तर तुम्ही त्यांना साहाय्य करा.’’
१ आ. प्रतिज्ञा घेण्यासाठी समाजातील एका व्यक्तीने पुढाकार घेणे
१. आम्ही आणखी एका ठिकाणी प्रतिज्ञा घेतली. तेव्हा समाजातील एका व्यक्तीने सांगितले, ‘‘येथे जवळपास २ – ३ कार्यक्रम आहेत. तेथेही जाऊन प्रतिज्ञा घेऊ.’’ आम्ही तेथे जाऊन प्रतिज्ञा घेतली.
२. त्या व्यक्तीने ‘महिलांसाठी एक व्याख्यान ठेवू’, असे सुचवले, तसेच त्यांनी ‘यापुढे येथे होणार्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला बोलाविन. तुम्ही येऊन तुमचे कार्यक्रम घेऊ शकता’, असे सांगितले.
३. सर्व ठिकाणी प्रतिज्ञा घेऊन झाल्यावर त्या व्यक्तीने सांगितले, ‘‘एक एक पुष्प एकत्र येऊन ते श्रीरामाच्या चरणी अर्पण होत आहे’, असे मला वाटले. आजचा शेवट या प्रतिज्ञांनी झाला. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला.’’
– कु. रश्मी महेंद्र चाळके, सोलापूर (२३.१.२०२४)
२. सनातननिर्मित श्रीरामाच्या सात्त्विक चित्राचे महत्त्व लक्षात येणे
अ. ‘श्रीराममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी सनातननिर्मित श्रीरामाच्या सात्त्विक चित्राचे वितरण करण्यात आले. त्या वेळी एका व्यक्तीने आम्हाला सांगितले, ‘‘मला सहस्रो रुपये व्यय करून बाहेर श्रीरामाचे सुंदर चित्र मिळेल; परंतु ‘सनातननिर्मित श्रीरामाच्या सात्त्विक चित्रामध्ये जी शक्ती आहे, ती मला मिळणार नाही’; म्हणून मी सनातननिर्मित श्रीरामाचे चित्र घेत आहे.’’
आ. अनेक ठिकाणी रस्त्यांवर व्यासपिठे उभारली होती. त्या व्यासपिठांवर श्रीरामाच्या चित्रांचे पूजन करण्यात येत होते. ती चित्रे पाहिली, तेव्हा ‘समाजातील लोक सनातननिर्मित श्रीरामाच्या सात्त्विक चित्राचेच पूजन करत आहेत’, असे आमच्या लक्षात आले.’
– श्री. संकेत पिसाळ आणि श्री. तरुण आवार, सोलापूर (२३.१.२०२४)