हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेच्‍या पहिल्‍या अध्‍यायातील पहिल्‍या श्‍लोकातून शिकायला मिळालेली सूत्रे !

१. श्‍लोक

‘श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेतील पहिल्‍या अध्‍यायातील पहिला श्‍लोक पुढे दिला आहे.

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्‍सवः ।
मामकाः पाण्‍डवाश्‍चैवः किमकुर्वत सञ्‍जय ॥

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय १, श्‍लोक १

अर्थ : धृतराष्‍ट्र म्‍हणाला, ‘‘हे संजया, धर्मक्षेत्र (धर्मभूमी) असलेल्‍या कुरुक्षेत्रात (कुरु वंशाच्‍या भूमीत) युद्धाच्‍या इच्‍छेने एकत्र जमलेल्‍या माझ्‍या आणि पांडूच्‍या मुलांनी काय केले ?’’

२. श्‍लोकातून शिकायला मिळालेली सूत्रे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

२ अ. महाभारतीय युद्ध हे धर्म-अधर्मातील युद्ध असणे : ‘महाभारतीय युद्ध हे जात, पात, भाषा, प्रांत किंवा उपासनापद्धत (संप्रदाय किंवा पंथ) इत्‍यादींतील नसून ते धर्म-अधर्म यांतील युद्ध होते.

२ आ. धृतराष्‍ट्राने युद्धभूमीला धर्मभूमी, म्‍हणजे धर्मक्षेत्र संबोधणे : धृतराष्‍ट्राने कौरव-पांडव यांच्‍यातील युद्धभूमीला ‘धर्मक्षेत्र’ संबोधून धर्माप्रती निष्‍ठा व्‍यक्‍त केली आहे. ‘युद्धभूमी असली, तरीही ती धर्मभूमीच आहे’, हे यांतून ध्‍वनित होते. ही संकल्‍पना राजधर्माधारित, म्‍हणजे आधि-आध्यात्मिक किंवा आधिदैविक (टीप १) श्रेणीत मोडते.

टीप १ – स्‍थुलातून दिसणारे युद्ध हा युद्धाचा दृश्‍य किंवा भौतिक स्‍तर होय. ते केवळ सीमा वाढवण्‍यासाठी किंवा धन किंवा संपत्ती लुटण्‍यासाठी, म्‍हणजे भौतिक कारणांसाठी लढले जाते. त्‍या युद्धाला ‘आधिभौतिक अभिव्‍यक्‍ती’ म्‍हणू शकतो. हे मनुष्‍यातील आसुरी संपदांच्‍या, म्‍हणजेच दोषांच्‍या प्रभावाने होत असते आणि त्‍यामागे ‘स्‍वार्थपूर्ती’ हा उद्देश असतो. सत्त्वगुणी दैवी व्‍यवस्‍थेला ते आव्‍हान नसते; परंतु जेव्‍हा भौतिक अभिव्‍यक्‍तीसह सत्त्वगुणी दैवी व्‍यवस्‍थेला आव्‍हान देणारे युद्ध होतेे, तेव्‍हा ते धर्मरक्षण किंवा अधर्मनाश, अशा दिव्‍य कारणासाठी लढले जाते, म्‍हणजे ‘स्‍वधर्मपालन’, म्‍हणजे कर्तव्‍यकर्म करत धर्मरक्षणासाठी होणारे युद्ध हे आधिदैविक, आधि-आध्यात्मिक स्‍तरावर अभिव्‍यक्‍त होते. हे मनुष्‍यातील आसुरी संपदांच्‍या प्रभावाने, म्‍हणजेच स्‍वभावदोषासह व्‍यक्‍तीच्‍या अहंकाराच्‍या प्रभावाने लढले जाते. स्‍वार्थपूर्तीसह शत्रूविषयीच्‍या सूडबुद्धीने लढले जाणारे हे युद्ध सत्त्वगुणी अथवा दैवी व्‍यवस्‍थेला एक आव्‍हान ठरते.धर्मरक्षणार्थ येथे समष्‍टीच्‍या पापांचा नाश आणि समष्‍टीच्‍या कर्मफलाचा हिशोब पूर्ण करत धर्मसंस्‍थापना केली जाते. ‘धर्मानुसार काय योग्‍य आणि काय अयोग्‍य ?’, याची प्रत्‍यक्ष शिकवण समाजापुढे ठेवली जाते.

२ इ. धृतराष्‍ट्राने ‘कुरुक्षेत्र’ हा शब्‍द राष्‍ट्रासाठी संबोधला असला, तरी त्‍यामागे राज्‍यसत्ताप्राप्‍तीची आसक्‍ती असणे : कुरुवंशाच्‍या राज्‍याचा वारस, म्‍हणजेच उत्तराधिकारी निश्‍चित करण्‍यासाठी होऊ घातलेल्‍या युद्धभूमीला धृतराष्‍ट्राने ‘धर्मक्षेत्र’ आणि ‘कुरुक्षेत्र’ही संबोधले. येथे ‘धृतराष्‍ट्राचा राज्‍याचा विचार राष्‍ट्रासंबंधी (समष्‍टीसंबंधी) आहे’, असे दर्शवत असला, तरीही तोे विचार आसक्‍ती, मोह, राज्‍यसत्ताप्राप्‍ती, अशा आधिभौतिक (टीप २) विचारांचे प्रतिनिधित्‍व करतो.

टीप २ – धृतराष्‍ट्राचा उद्देश स्‍वार्थी, तर दुर्योधनाचा उद्देश आसुरी आहे; म्‍हणून येथे ‘आधिभौतिक’ हा शब्‍द वापरला आहेे.

२ ई. पांडव धर्माच्‍या बाजूने असल्‍याने धर्मक्षेत्रावर त्‍यांचा विजय निश्‍चित असणे : धृतराष्‍ट्रानेे जेव्‍हा युद्धभूमीचा उल्लेख ‘धर्मक्षेत्र’, असा केला, त्‍याच वेळी त्‍याने पांडवाचा विजय निश्‍चित केला; कारण या धर्म-अधर्मातील युद्धामध्‍ये पांडव धर्माच्‍या बाजूने होते. भगवान श्रीकृष्‍ण पांडवांच्‍या बाजूने होता. ‘यतो धर्मस्‍ततो जयः ।’ (महाभारत, पर्व ५, अध्‍याय ३९, श्‍लोक ७), म्‍हणजे ‘जेथे धर्म (भगवान श्रीकृष्‍ण) आहे, तेथे विजय निश्‍चित आहे’, या धर्मन्‍यायानुसार पांडवांचा विजय निश्‍चित झाला होता.

३. धृतराष्‍ट्र अधर्माचा समर्थक आणि धर्मविरोधक असणे

अ. धृतराष्‍ट्राने संजयाला विचारले, ‘‘युद्धाच्‍या इच्‍छेने जमलेल्‍या माझ्‍या आणि पांडूच्‍या मुलांनी काय केले ?’’ तेव्‍हा धृतराष्‍ट्रातील ‘मी’, ‘माझ्‍या (ममत्‍व)’, या अहंभावामुळे त्‍याने कौरवांची बाजू घेतली. त्‍यामुळे तो अधर्माचा समर्थक ठरला.

आ. धृतराष्‍ट्राने वडील नसलेल्‍या पांडवांना ‘पांडूपुत्र’ संबोधल्‍याने त्‍याच्‍यातील आपपर भाव (भेदभाव) व्‍यक्‍त झाला. वडीलधार्‍या आणि पालक असलेल्‍या धृतराष्‍ट्राने पांडवांनाही स्‍वपुत्रवत् पहाणे अपेक्षित होते; पण तसे न केल्‍यामुळे तो एकप्रकारे धर्मविरोधकही ठरला.

४. धर्म-अधर्म यांच्‍या या लढ्यात पांडव पंचमहाभूतात्‍मक ईश्‍वरी शक्‍तीचे प्रतीक झाले, तर कौरव हे धृतराष्‍ट्राच्‍या ममत्‍व, अहंकारी, अशुद्ध आणि आसुरी या बुद्धींचे प्रतीक ठरले.

वरील विवेचनावरून ‘एखाद्याने व्‍यक्‍त केलेले शब्‍द, विचारलेले प्रश्‍न किंवा विचार हे त्‍याच्‍या अंतर्मनाचे प्रतिबिंब असते’, असे लक्षात येते. मनुष्‍याने धर्ममार्गावर चालतांना, विचार व्‍यक्‍त करतांना, प्रश्‍न विचारतांना किंवा बोलतांना स्‍वतःमध्‍ये योग्‍य पालट केल्‍यास चित्तातील संस्‍कारांत पालट होऊन त्‍याची चित्तशुद्धी होऊ शकते.

५. श्‍लोकाचा जाणवलेला आध्‍यात्मिक अर्थ

५ अ. मनुष्‍याचा देह धर्मक्षेत्र असणे; परंतु साधना आणि धर्माचरण यांच्‍या अभावाने तो कुरुक्षेत्र ठरणे : मनुष्‍याचा देह हा मुळात धर्मक्षेत्र आहे. ईश्‍वराने हा देह धर्ममार्गाने आचरण करून ईश्‍वरप्राप्‍ती करण्‍यासाठी दिलेला असून साधना आणि धर्माचरण यांच्‍या अभावाने हा देह मायेतील भौतिक विचार अन् संस्‍कार यांत लिप्‍त होतो. त्‍यामुळे तो केवळ कुरुक्षेत्रच ठरतो.

५ आ. आधिभौतिक स्‍तरावर असणार्‍या मनुष्‍याच्‍या देहाला ‘धर्मक्षेत्र’ संबोधता न येणे : मनुष्‍य जेव्‍हा ईश्‍वर, धर्म, साधना इत्‍यादींपासून दूर असतो (विमुख असतो) आणि भोगवाद अन् मायेचे विचार यांमध्‍ये गुरफटलेला असतो, तेव्‍हा तो आधिभौतिक स्‍तरावर असतो. जेव्‍हा मनुष्‍याचे विचार ‘हा देह माझा आहे. मी मला हवे तसे वागीन, माझ्‍या देहावर माझी सत्ता आहे’, असे असतात, तेव्‍हा त्‍याचा देह कुरुक्षेत्र असतो. पूर्णतः आधिभौतिक अवस्‍थेत संघर्ष नसल्‍याने देह युद्धभूमी (धर्मक्षेत्र) न ठरता ते कुरुक्षेत्र ठरते; म्‍हणून या देहाला (या युद्धभूमीला) ‘धर्मक्षेत्र’ संबोधता येत नाही.

५ इ. मनुष्‍याने आधिदैविक आणि आधि-आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश केल्‍यावर त्‍याचा देह ‘धर्मक्षेत्र’ होणे : जेव्‍हा मनुष्‍य धर्म, साधना, ईश्‍वर आणि आनंदप्राप्‍ती या मार्गाने मार्गक्रमण करतो, तेव्‍हा तो आधिदैविक आणि आधि-आध्यात्मिक (मन, बुद्धी आणि चित्त शुद्ध होऊन होणारे धर्माचरण, धर्मरक्षण) क्षेत्रात प्रवेश करतो. या मार्गावर चालायला लागल्‍यावर मनुष्‍यातील स्‍वभावदोष, अहंकार (ज्‍याला ‘आंतरिक आसुरी संपदा’, असे संबोधले आहे) इत्‍यादी दोष आणि त्‍याच्‍यातील भाव, ईश्‍वरप्राप्‍तीची तळमळ (ज्‍याला ‘आंतरिक दैवी संपदा’, असे म्‍हटले आहे) इत्‍यादी गुण यांमध्‍ये संघर्ष चालू होतो. या संघर्षामुळे एका आंतरिक युद्धाला आरंभ होतो. येथे मनुष्‍याचा देह धर्मक्षेत्र ठरते; कारण येथे देह धर्म-अधर्म (दैवी-आसुरी) यांच्‍यातील संघर्षाची भूमी असते.

५ ई. श्री गुरूंचे मार्गदर्शनच साधकाला धर्माच्‍या बाजूने रहाण्‍यास साहाय्‍यभूत होणे : वरील विवेचनावरून लक्षात येते, ‘साधक, शिष्‍य आणि धर्मपरायण व्‍यक्‍ती यांचा देह साधनेच्‍या प्रारंभी कुरुक्षेत्र आणि धर्मक्षेत्र या दोन्‍ही प्रकारची युद्धभूमी असतो, तर साधनेच्‍या पुढील टप्‍प्‍यात तो पूर्णतः धर्मक्षेत्र असतो. या स्‍थितीत श्री गुरूंचे मार्गदर्शनच त्‍याला धर्माच्‍या बाजूने रहाण्‍यास आणि त्‍याच्‍या देहाला कुरुक्षेत्रातून धर्मक्षेत्रात परिवर्तित करण्‍यास साहाय्‍यभूत होते.’ (असे आहे, तर पांडवांचे क्षेत्रही धर्मक्षेत्रच होते.)

५ उ. ‘अवतार, संत, भक्‍त किंवा योगी’, अशा आध्‍यात्मिक अधिकारी व्‍यक्‍तींचा देह ‘धर्मक्षेत्र’ असणे : ‘अवतार, संत, भक्‍त किंवा योगी’, अशा आध्‍यात्मिक अधिकारी व्‍यक्‍तींचा देह धर्मक्षेत्रच असतो. त्‍यांचा समाजाच्‍या रक्षणार्थ, अशुद्धी आणि अधर्म निर्दालनार्थ सूक्ष्मातील लढा सतत चालू असतो. त्‍यायोगे त्‍यांचा देह ही युद्धभूमी असते, तरीही चित्तशुद्धी, दिव्‍यता, अवतारत्‍व किंवा आनंदप्राप्‍ती यांमुळे अशा विभूतींचे देह हे धर्मक्षेत्रही असतात. ते इतरांच्‍या भल्‍यासाठी झिजत असतात. समाजाला कळो किंवा न कळो, त्‍यांचे अदृश्‍य स्‍वरूपात समाजोद्धाराचे कार्य चालू असते. त्‍यामुळे अशांचा देह कुरुक्षेत्र होऊ शकत नाही.’

– सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२७.१०.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.