सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना घडवण्यासाठी सनातन संस्थेमध्ये घालून दिलेल्या अद्वितीय कार्यपद्धती !

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]

२३ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांच्या शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी घालून दिलेल्या काही कार्यपद्धती पाहिल्या. आता या भागात अन्य काही अद्वितीय कार्यपद्धती आणि ‘प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या साधकांना घडवण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले ?’, हे दिले आहे.
(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/806789.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वैशिष्ट्य, म्हणजे साधक प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात नसूनही ते साधकांकडून साधना करून घेत असणे

‘गुरु-शिष्य परंपरेमध्ये शिष्य श्री गुरूंच्या सहवासात राहून सर्वकाही शिकत असतो. श्री गुरु शिष्याच्या मनात येणारे असंख्य विचार आणि प्रश्न यांना दिशा देऊन त्याच्याकडून साधना करून घेण्याचे कार्य करत असतात; परंतु सनातनचे साधक श्री गुरूंच्या, म्हणजे प.पू. डॉक्टरांच्या प्रत्यक्ष सहवासात नसूनही प.पू. डॉक्टरांनी साधकांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आणि त्यांना आवश्यक असलेले पुढचे मार्गदर्शन मिळण्याची उत्तम व्यवस्था केली आहे.

१४. ‘साधकांना गुरुपौर्णिमेचा लाभ होऊन त्यांची साधना व्हावी’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ठिकठिकाणी गुरुपौर्णिमेचे आयोजन करणे

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

‘साधकाच्या जीवनात श्री गुरूंचे अनन्य साधारण महत्त्व आहे. साधकांमध्ये ही जाणीव आणि तसा भाव असल्याने गुरुपौर्णिमेच्या वेळी साधक पुष्कळ झोकून देऊन सेवा करतात. गुरुपौर्णिमेच्या आधी ३ – ४ मास या सेवा उपलब्ध असतात. ‘साधकांना ते आहेत, त्या ठिकाणी राहूनही गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक स्तरावर पूर्ण लाभ व्हावा’, यासाठी १०० हून अधिक ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येतो. ही त्यांनी साधकांवर केलेली मोठी कृपा आहे. यामुळे अगदी नवीन साधकालाही जिल्ह्यात अनेक ठिकाणी होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवात सहज सहभागी होता येऊन त्याला व्यष्टी आणि समष्टी साधनेची पुष्कळ संधी उपलब्ध होते.

१४ अ. ‘गुरुपौर्णिमेच्या सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काही कार्यपद्धती घालणे

१. गुरुपौर्णिमेसाठी ‘वातावरण निर्मिती व्हावी’, यासाठी जिल्हा स्तरावर अनेक शिबिरे घेतली जातात. यात गुरुपौर्णिमेच्या सर्व सेवांचा बारकाईने अभ्यास करून ‘त्या सेवा कशा कराव्यात ?’, हे शिकवले जाते.

२. गुरुपौर्णिमेची सेवा करणार्‍या प्रत्येक साधकाकडून सेवेचे नियोजन आणि सखोल चिंतन करून घेतले जाते.

३. गुरुपौर्णिमेच्या दृष्टीने या सेवेच्या माध्यमातून साधक ‘साधनेचे काय ध्येय ठेवणार ?’,  हे निश्चित केले जाते, उदा. ‘या सेवेच्या माध्यमातून ‘स्वभावदोष किंवा अहं यांचा कुठला पैलू न्यून करण्याकडे लक्ष देणार ?’, ‘कुठले गुण वाढवणार ?’, तसेच भावजागृतीसाठी ‘सेवा करतांना भाव कसा ठेवणार ?’ इत्यादी.

४. ‘पूजेला बसणारे साधक, पौराहित्य करणारे साधक, वक्ता म्हणून बोलणारे साधक, सूत्रसंचालक साधक इत्यादी साधकांची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण व्हावी’, यासाठी त्यांच्या सेवेचा सराव करून घेतला जातो.

५. ‘प्रत्यक्ष गुरुपौर्णिमा चुकांविरहीत आणि भावपूर्ण होऊन गुरुपौर्णिमेचा साधकांना पूर्ण लाभ व्हावा’, यांसाठी गुरुपौर्णिमेच्या एक आठवडा आधी ‘प्रतिगुरुपौर्णिमे’ची रंगीत तालीम घेतली जाते. यात प्रत्यक्ष गुरुपौर्णिमेसारखी सिद्धता करून त्या दिवसाप्रमाणे सर्व कार्यक्रम केला जातो आणि ‘कुठल्या चुका होतात ?’, हे पाहून त्यात सुधारणा केल्या जातात.

यातून ‘श्री गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा कशी करावी ?’, हा संस्कार साधकांच्या मनावर बिंबवला जातो. सनातन संस्थेकडून घेण्यात येणार्‍या प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन अशाच प्रकारे करण्यात येते.

१५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक चालू करून त्या माध्यमातून मार्गदर्शन करणे

प.पू. डॉक्टरांनी अत्यंत दूरदर्शीपणाने मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांत ‘सनातन प्रभात’ नियतकालिके चालू केली आहेत. यातून हिंदुत्वनिष्ठांना ‘हिंदु राष्ट्रा’विषयी आणि साधकांना साधनेविषयी अमूल्य मार्गदर्शन केले जाते. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. त्यामुळे साधना करतांना साधकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होत असतात. प्रत्येक वेळी कुणाला तरी ते प्रश्न विचारून उत्तरे मिळवणे जमतेच, असे नाही; परंतु ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून साधकांच्या अशा शंकांचे निरसन होते, तसेच त्यांना दैनंदिन साधनेविषयी सतत मार्गदर्शनही मिळते. ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन, म्हणजे प्रतिदिनचा अनमोल सत्संगच आहे. साधनेत सातत्य रहाण्यासाठी त्याचा होणारा लाभ येथे दिला आहे.

अ. संत आणि साधक यांच्या साधनाप्रवासाचे लेख वाचून साधकांना साधनेसाठी पुष्कळ प्रेरणा मिळते. ‘कितीतरी साधक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीने आणि तळमळीने साधना करतात’, हे वाचून साधकांना ‘आपणही अशा प्रसंगाला कसे सामोरे जाऊ शकतो ?’, हे लक्षात येते. त्यामुळे साधकांची साधनेची तळमळ वाढते.

आ. प.पू. गुरुदेवांच्या नियमित साधनेविषयी येणार्‍या चौकटींमधून साधनेविषयी नवीन सूत्रे शिकता येतात. या चौकटींमधून प्रत्यक्ष प.पू. गुरुदेवांचे मार्गदर्शन मिळत असल्यामुळे ती सूत्रे साधकांच्या अंतर्मनापर्यंत जातात.

इ. साधकांना येणार्‍या अनुभूतीतून इतर साधकांनाही बर्‍याच गोष्टी शिकता येतात. त्यामुळे त्यांची गुरु आणि देव यांच्यावरील श्रद्धा वाढते.

ई. साधक करत असलेले विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण भावजागृतीचे अन् ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न वाचून ‘आपणही तसे प्रयत्न करायला पाहिजेत’, ही तीव्र भावना साधकांच्या मनामध्ये निर्माण होते अन् त्यांच्याकडून तसे आचरण होते.

उ. काही साधकांच्या लेखातून त्यांना ‘अन्य साधक, प्रसंग, प्राणी, पक्षी, फुले इत्यादी सजीव किंवा पंखा, पर्वत, अवजारे इत्यादी निर्जीव वस्तूंकडून काय शिकायला मिळाले ?’, यांविषयी वाचायला मिळते. यातून ‘आपणही सजीव-निर्जीव अशा सर्वांकडून शिकायला हवे’, अशी स्फूर्ती साधकांमध्ये जागृत होते.

ऊ. ‘सनातन प्रभात’मधून नियमितपणे अनेक संतांचे चैतन्यदायी मार्गदर्शन मिळते. त्यातूनही साधक आणि वाचक यांच्या मनातील अनेक शंकांचे निरसन होते.

ए. ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून ‘दैनंदिन जीवनात धर्माचरण कसे करावे ?’, ‘वर्षभरातील सण, उत्सव आणि व्रते कशी साजरी करावीत ?’, यांविषयी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन मिळत असल्यामुळे धर्माचरणाच्या माध्यमातूनही साधक अन् वाचक यांची साधना चालू रहाते. ‘धर्माचरण न केल्यामुळे साधनेची हानी कशी होते ?’, हे कळल्यामुळे धर्माचरण करून साधकांना साधनेतील हानी टाळता आली.

१६. साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणे

प.पू. डॉक्टरांनी सनातन संस्थेमध्ये साधकांच्या साधनेचा नियमित आढावा (टीप १) घेण्याची कार्यपद्धत चालू केली आहे. या अंतर्गत ४ ते ८ साधकांचे गट सिद्ध करून त्या गटाचा आढावा एक साधक नियमित घेतो. या आढाव्यात ‘साधक साधनेचे कसे प्रयत्न करत आहेत ?’, याचा आढावा घेण्यासह ‘साधकांकडून दिवसभरात होणार्‍या चुका, त्यावर साधक घेत असलेले दृष्टीकोन किंवा सूचना योग्य आहेत का ?’, हेही पाहिले जाते. घरी, कार्यालयात, नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्याशी वागतांना-बोलतांना घडणार्‍या प्रसंगात कुठले स्वभावदोष प्रकट होतात ?, त्यावर कशी मात करावी ?, योग्य कृती किंवा योग्य विचार कसे असायला हवेत ?, दैनंदिन जीवनात करत असलेल्या असंख्य कृती साधना म्हणून कशा कराव्यात ?’, यांविषयी मार्गदर्शन केले जाते. साधकाला आढावासेवक आणि आढाव्यातील अन्य साधक यांच्याकडून ‘एखादी कृती करतांना भाव कसा ठेवावा ?, ईश्वराशी सातत्याने अनुसंधानात कसे रहावे ?’, यांसारख्या अनेक गोष्टी शिकता येतात. या आढाव्याच्या माध्यमातून साधकाला आपली साधना योग्य प्रकारे चालू आहे का ?, पुढचे प्रयत्न कसे करायला हवेत ?, हेही कळण्यास साहाय्य होते.

(टीप १ – साधक करत असलेला नामजप, प्रार्थना, भावजागृतीचे प्रयत्न, कृतज्ञता, ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनासाठी करत असलेले प्रयत्न यांविषयी जाणून घेऊन योग्य तिथे साधकांना दिशा देणे)

१७. एकमेवाद्वितीय असलेली ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवल्यामुळे साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊ शकणे

वरील सर्व कार्यपद्धतींसह प.पू. डॉक्टरांनी साधकांना शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वतःमधील ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया (टीप २) करायला शिकवली; कारण अन्य युगांच्या तुलनेत कलियुगामध्ये मानवामध्ये पुष्कळ प्रमाणात ‘स्वभावदोष आणि अहं’ आहेत. जोपर्यंत साधकांकडून ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे साधना होऊ शकत नाही. बहुतांश वेळा ‘स्वभावदोष आणि अहं’ यांमुळे साधकांकडून चुका होऊन त्या चुकांचे परिमार्जन करण्यात त्यांची साधना व्यय होते. साधकांनी स्वतःमधील ‘स्वभावदोष आणि अहं’ दूर केल्यावर त्यांच्या साधनेची हानी थांबून आध्यात्मिक प्रगती सहजतेने होऊ लागते. हे लक्षात घेऊन प.पू. डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोगा’नुसार करायच्या साधनेत ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाला ६० टक्के महत्त्व दिले आहे; म्हणून असे म्हणावेसे वाटते, ‘शीघ्र आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलन प्रक्रियेतून जातो.’

(टीप २ – दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुका वहीत लिहून त्यापुढे त्या कुठल्या ‘स्वभावदोष किंवा अहं’ यांमुळे झाल्या, ते लिहिणे. त्यापुढे योग्य दृष्टीकोनाच्या सूचना लिहून ‘तशा चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी त्या स्वयंसूचना दिवसातून १० – १२ वेळा मनाला देणे )

१७ अ. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ शिकवणारी लेखमाला अन् ग्रंथ प्रकाशित करणे : ‘दैनंदिन जीवनात प्रत्येकाकडून ‘स्वभावदोष आणि अहं’ यांमुळे कशा प्रकारच्या चुका होतात आणि त्यावर कशी मात करावी ?, याचे साधकांना चांगल्या प्रकारे आकलन व्हावे, यासाठी प.पू. डॉक्टरांनी ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवणारी लेखमाला ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमधून चालू केली आणि याविषयीची सखोल माहिती देणारे ग्रंथही प्रकाशित केले.

१७ आ. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनासाठी सत्संग चालू करणे : ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलन सत्संगांत चुकांच्या मुळाशी असलेले ‘स्वभावदोष आणि अहं’ यांचे पैलू कसे ओळखावे ? आणि ते कसे न्यून करावेत ?, हे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने शिकवले जाते.

१७  इ. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांमुळे साधनेत येणारे अडथळे आणि ते दूर केल्यावर होणारा लाभ !

१. नामजप करतांना मनात पुष्कळ विचार येतात आणि नामजप एकाग्रतेने होत नाही.

२. भावजागृती होण्यात अडथळे येतात. मनात येणार्‍या विचारांमुळे भाव अधिक काळ टिकून राहू शकत नाही.

३. सेवा परिपूर्ण न होता सेवेत असंख्य चुका होतात.

हे लक्षात घेऊन सनातनमध्ये साधकांना साधनेत साहाय्य होण्यासाठी त्यांच्या चुका सांगितल्या जातात. आरंभी जन्मोजन्मी झालेल्या संस्कारांमुळे मन सहज चूक स्वीकारण्यास सिद्ध होत नाही; कारण ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे, हे स्वतःच्या मनाविरुद्ध पुकारलेले एक युद्ध आहे. हळूहळू या प्रक्रियेचे महत्त्व लक्षात आल्यावर साधक सहजपणे चुका सांगायला आणि स्वीकारायला शिकतात. या युद्धात जसा त्याला विजय प्राप्त होऊ लागतो, म्हणजेच त्याचे ‘स्वभावदोष आणि अहं’ अल्प होऊ लागतात, तसा त्याला अधिकाधिक आनंद मिळायला लागतो.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !’

इदं न मम । (हे लिखाण माझे नाही !)

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, देवद आश्रम, पनवेल. (१७.४ २०२४ )

या लेखाचा भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/823338.html

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS][RELATED_ARTICLES]