Afghanistan Taliban Orders : राष्ट्रीय आणि विदेशी अशासकीय संस्थांनी महिलांना रोजगार देऊ नये !

अफगाणिस्तानच्या तालिबानचा आदेश

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारने अशासकीय संस्थांसाठी आदेश जारी केला आहे. राष्ट्रीय आणि विदेेशी अशासकीय संस्थांनी महिलांना रोजगार देऊ नये, अन्यथा संस्थांची मान्यता रहित करण्यात येईल, अशी चेतावणी त्यांना देण्यात आली आहे. तालिबानच्या अर्थमंत्रालयाने हा आदेश काढला आहे. या आदेशात म्हटले आहे की, महिला इस्लामी हिजाबचे योग्य पद्धतीने पालन करत नव्हत्या. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी तालिबानने असाच एक आदेश दिला होता. त्यानुसार महिला दिसू शकतात, अशा ठिकाणी घरात खिडक्या बनवण्यास बंदी घालण्यात आली. महिलांद्वारे वापरल्या जाणार्‍या शेजार्‍यांकडील विहीर, अंगण, स्वयंपाकघर आदी जागा दिसतील, अशा ठिकाणी खिडक्या नको. अशा ठिकाणी आधीपासून जिथे खिडक्या आहेत, तिथे खिडक्यांसमोर भिंत उभारण्याचे आदेश घरमालकांना दिले आहेत, असे तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याने स्पष्ट केले आहे. अशा खिडक्यांमुळे अश्‍लीलता पसरते, असा तर्क त्याने दिला आहे.

तालिबानने आतापर्यंत महिलांना दिलेले आदेश

अ. इयत्ता सहावीपेक्षा अधिक शिकू शकणार नाहीत.

आ. बाहेर निघतांना हिजाबची सक्ती.

इ. एकटीने प्रवास करू नये.

ई. वाहनचालक परवान्यावर बंदी.

उ. उद्यान, व्यायामशाळा, पोहण्यासाठीचे तलाव येथे महिलांच्या जाण्यावर बंदी.

ऊ. नोकरी करू नये.

ए. परिचारिकेच्या प्रशिक्षणावरही बंदी.

ऐ. खेळण्यावर बंदी.