Prayagraj Mahakumbh 2025 : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाकुंभपर्वाची सिद्धता पूर्ण होणार ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

७ सहस्र संस्थांचे कुंभक्षेत्री आगमन

गंगापूजन करतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाकुंभपर्वाची सर्व सिद्धता पूर्ण होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. ते येथे महाकुंभपर्वाच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी ३१ डिसेंबरला प्रयागराज येथे संगमक्षेत्री आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाकुंभपर्वाच्या पार्श्‍वभूमीवर प्रयागराजमधील २०० हून अधिक छोट्या-मोठ्या रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात आले आहे. १४ उड्डाणपुलांपैकी १३ पूल बांधून सिद्ध आहेत. ५ सहस्र एकर जागेत वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीवरून ये-जा करण्यासाठी यंदा ३० ‘पंटून पूल’ बांधण्यात येणार असून त्यांपैकी २८ पूल बांधून सिद्ध झाले आहेत. उर्वरित २ पूल येत्या ३-४ दिवसांत बांधून सिद्ध होतील. स्नानासाठी १२ कि.मी. परिसरत तात्पुरते घाट बनवण्यात आले आहेत. अरैल येथे पक्क्या घाटाचे काम येत्या २-३ दिवसांत पूर्ण होईल. ‘चकर्ड प्लेट’ (वाळूवरून वाहने  घसरू नयेत किंवा पादचार्‍यांना वाळूतून चालता यावे, यासाठी बसवण्यात येणार्‍या मोठ्या लोखंडी पट्ट्या) बसवण्यात आल्या आहेत. यासह ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कुंभक्षेत्री आतापर्यंत ७ सहस्र संस्था आल्या आहेत. साधारण दीड लाख तंबू (टेंट) उभारण्यात आले आहेत.

बडे हनुमान (लेटे हुए हनुमान) यांचे पूजन करतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

संत आणि भाविक यांच्यावर सरकार पुष्पवृष्टी करणार !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, महाकुंभपर्वाविषयी लोकांमध्ये उत्साह आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्व सिद्धता पूर्ण होईल. पौष पौर्णिमा, म्हणजे १३ जानेवारी २०२५ या दिवशी पहिले प्रमुख स्नान संपन्न होईल. दुसरे स्नान १४ जानेवारी, तर तिसरे स्नान मौनी अमावस्येला, म्हणजेच २९ जानेवारीला होईल. त्यानंतर ३, १२ आणि २६ फेबु्रवारी या दिवशीही प्रमुख स्नान असणार आहे. २९ जानेवारीच्या स्नानाच्या दिवशी ६ ते ८ कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. प्रमुख स्नानांच्या दिवशी सरकारकडून संत आणि भाविक यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.