Maldives Political Crisis : मालदीवमधील महंमद मुइज्जू यांचे सरकार भारताने वाचवले !

मालदीवच्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकार पाडण्यासाठी भारताकडे मागितले होते ६० लाख अमेरिकी डॉलर्स

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू

माले (मालदीव) – भारतविरोधी मोहीम राबवून मालदीवमध्ये सत्तेवर आलेल्या राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांच्या सरकारला भारतानेच वाचवल्याचे वृत्त अमेरिकेच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, मालदीवचे अध्यक्ष महंमद मुइज्जू यांच्यावर महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या कटाचा एक भाग म्हणून विरोधी पक्ष असणार्‍या मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्यांनी वर्ष २०२४ च्या जानेवारीमध्ये  भारताकडे ६० लाख डॉलर्सची (५१ कोटी ३६ सहस्र रुपयांची) मागणी केली होती; मात्र भारताने ही मागणी फेटाळली होती. जानेवारी २०२४ मध्येच सत्ताधारी पक्षाच्या काही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निराधार आरोप केल्याने भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणले गेले.

१.‘डेमोक्रॅटिक रिन्यूअल इनिशिएटिव्ह’ नावाच्या अंतर्गत दस्तऐवजावर आधारित ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या या वृत्तात म्हटले आहे की, मालदीवच्या संसदेच्या ४० सदस्यांना लाच देण्याची सविस्तर योजना उघड झाली. मुइज्जू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेसच्या खासदारांनी त्यांचे सरकार पाडण्याचा कट रचला होता. मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी आवश्यक मते मिळवण्यासाठी भारताकडे पैसे मागण्यात आले होते.

२. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दावा केला आहे की, त्यांना प्राप्त झालेल्या कागदपत्रांमध्ये अनेक वरिष्ठ सैनिकी आणि पोलीस अधिकारी यांना लाच देण्याची अन् देशातील ३ सर्वांत मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांचे साहाय्य घेण्याची योजना समाविष्ट आहे. हे सर्व महंमद मुइज्जू यांना सत्तेवरून हटवण्यासाठी होते. विविध पक्षांना पैसे देण्यासाठी भारताकडून ८ कोटी ७० लाख ‘रुफिया’ची (मालदीवचे चलन. ६० लाख अमेरिकी डॉलर्सची) मागणी केली जाणार होती. जानेवारी २०२४ पर्यंत भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’च्या (‘रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग’च्या) अधिकार्‍यांनी महमंद मुइज्जू यांना हटवण्याची शक्यता शोधण्यासाठी मालदीवच्या विरोधी नेत्यांशी गुप्त चर्चा चालू केली होती. तथापि, ही योजना कधीच प्रत्यक्षात आली नाही.

३. दुसरीकडे या वृत्तावर भारत समर्थक मालदीवचे माजी राष्ट्रपती महंमद नशीद यांनी टीका केली आहे. तसेच त्यांना या कटाविषयी कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले. महंमद नशीद म्हणाले की, भारत नेहमीच मालदीवच्या लोकशाहीचा समर्थक राहिला आहे.