‘प.पू. डॉक्टरांनी ‘साधकांची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती’, हा व्यष्टी उद्देश आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हा समष्टी उद्देश ठेवून सनातन संस्थेची स्थापना केली आहे. त्यासाठी प.पू. डॉक्टरांनी सनातन संस्थेमध्ये ‘साधकांच्या साधनेला पोषक ठरतील’, अशा कार्यपद्धती घालून दिल्या आहेत. या कार्यपद्धतींचे वैशिष्ट्य, म्हणजे त्या कार्यपद्धतीचे पालन करणार्या साधकांची सहजतेने आध्यात्मिक उन्नती होत आहे. या कार्यपद्धतींचा मला आणि सनातनच्या सर्वच साधकांना आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी पुष्कळ लाभ झाला आहे आणि होतही आहे. या उत्कृष्ट कार्यपद्धतींमुळे केवळ १२ वर्षात (वर्ष १९९८ ते वर्ष २०१०) माझा संतपदापर्यंतचा प्रवास वेगाने होऊ शकला. यातून ‘त्या कार्यपद्धती किती योग्य आणि उपयुक्त आहेत ?’, हे सिद्ध झाले आहे.
१. सत्संगातील जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करणे
जिज्ञासू व्यक्ती पहिल्यांदा सत्संगात येते, तेव्हा तिच्या मनात साधनेविषयी अनेक प्रश्न असतात. सत्संगात त्या शंकांचे पूर्ण समाधान होईपर्यंत तिच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाते. ‘साधना का आणि कशी करावी ?’, हिंदु धर्मात अनेक देवता आहेत, तर ‘कुठल्या देवतेची आराधना करावी ?’, ‘आतापर्यंत व्यक्ती करत असलेली साधना आणि सनातन संस्था सांगत असलेली साधना’, यांतील भेद’, इत्यादी शंकांचे निरसन केले गेल्यामुळे जिज्ञासूंची साधना विनाविकल्प चालू होते. जिज्ञासूच्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर सत्संगसेवकाला देता आले नाही, तर तो उत्तरदायी साधकांना विचारून पुढील सत्संगात जिज्ञासूच्या शंकेचे निरसन करतो.
२. सत्संगातील साधकांना वैयक्तिक संपर्क करणे
सत्संगात नव्याने आलेल्या जिज्ञासूला काही दिवसांनी सत्संगसेवक किंवा अन्य उत्तरदायी साधक वैयक्तिक संपर्क करतात. ‘त्याच्याशी जवळीक करणे’, हा त्यामागचा उद्देश असतो. या भेटीत जिज्ञासूला साधना आणि सनातन संस्था यांविषयी थोडी अधिक माहिती सांगितली जाते. एकंदरीत तो एक चांगला सत्संगच होतो.
३. सत्संग सोहळ्यांचे आयोजन
३ अ. साधनेमुळे झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती ऐकून साधनेसाठी प्रोत्साहन मिळणे : प्रत्येक ३ – ४ मासांनी नवीन आणि जुन्या साधकांचे एकत्रित सत्संग सोहळे आयोजित केले जात असत. त्यात ‘साधकांना साधना करतांना आलेल्या अनुभूती आणि त्यांचे विश्लेषण, साधनेमुळे साधकांमध्ये होत असलेले पालट’, इत्यादी गोष्टी सर्वांसमोर सांगितल्या जात असत.
३ आ. सेवेचे प्रात्यक्षिक करून दाखवत असल्यामुळे ‘सेवा कशी करावी ?’, ते समजणे : ‘सेवा कशी करावी ?’, याचे प्रात्यक्षिक घेतले जायचे, उदा. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची किंवा ‘सनातन-निर्मित ग्रंथांची माहिती कशी सांगावी ?’, ‘साधनेचे महत्त्व कसे सांगावे ?’, ‘समाजातून विचारलेल्या प्रश्नांची योग्य आणि समर्पक उत्तरे कशी द्यावी ?’, याविषयी प्रत्यक्ष कृती करून दाखवले जात असे.
३ इ. सोहळ्यात शेवटी उत्तरदायी साधकांचे ‘साधना’ या विषयावर मार्गदर्शन होणे
त्यामुळे अशा सत्संग सोहळ्यातून पुष्कळ शिकायला मिळून साधकांची कृतीशीलता वाढण्यास साहाय्य होत असे.
४. नवीन साधकाला साधनेतील सेवेचे महत्त्व सांगून कृतीशील करणे
साधक काही दिवस सत्संगाला आल्यानंतर त्याला सेवेचे महत्त्व सांगून त्याला ‘आवडेल आणि जमेल’, अशी सेवा सांगितली जाते. त्यामुळे नामजप, सत्संग यांसह समष्टी सेवेचा टप्पा चालू होऊन शीघ्र आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग सुलभ होतो. मी सत्संगात येऊ लागल्यानंतर केवळ एकच मासानंतर सेवा करू लागलो होतो. आरंभी एखाद्या अनुभवी साधकाच्या समवेत सेवेला गेल्यामुळे ‘अध्यात्माचा प्रसार कसा करायचा ?’, हे मला प्रत्यक्षात शिकता आले. हळूहळू सेवेतील बारकावे लक्षात येऊ लागून सेवा करण्याचा माझा आत्मविश्वास वाढला.
४ अ. समष्टी सेवेत गुरुकृपेमुळे अनुभूती अधिक येत असल्यामुळे श्रद्धा वाढून सेवा करायला प्रोत्साहन मिळणे : पुष्कळ वेळ बसून नामस्मरण करतांना मन तितका वेळ एकाग्र रहात नाही. त्यापेक्षा सेवेत मन लवकर एकाग्र होऊन ईश्वरी अनुसंधान रहाते. त्यामुळे समष्टी सेवेत गुरुकृपाही अधिक प्रमाणात होऊन अनुभूतीही अधिक येतात. अनुभूतींमुळे श्री गुरूंवरील श्रद्धा वाढायला साहाय्य होते. परिणामस्वरूप समष्टी सेवा करायला प्रोत्साहन मिळते.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक सेवांची निर्मिती करणे
५ अ. ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक प्रकारच्या सेवांची निर्मिती करणे : प.पू. डॉक्टरांनी ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी ‘धर्मप्रसारांतर्गत प्रवचन आणि सत्संग घेणे, वैयक्तिक संपर्क अन् सनातन-निर्मित ग्रंथांचे वितरण करणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांसाठी विज्ञापने आणणे, वार्ता बनवणे, नियतकालिकांचे वितरण करणे, तसेच आश्रमातील सेवांचे नियोजन करणे, त्या सेवांचा समन्वय करणे, उदा. स्वयंपाक करणे, धान्य निवडणे, आश्रमाची स्वच्छता करणे, रुग्ण आणि वयस्कर साधकांची काळजी घेणे, वाहन चालवणे, वाहन दुरुस्ती करणे इत्यादी अनेक सेवा उपलब्ध केल्या आहेत. आश्रमातील या सर्व सेवाही साधकांकडून साधना म्हणून करून घेतल्या जातात. या व्यतिरिक्त ‘संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, चित्रीकरण, बांधकाम, विद्युत्सेवा, लागवड, संशोधन, टंकलेखन, भाषांतर आणि ग्रंथसंकलन करणे, विविध संकेतस्थळांसाठी लेख लिहिणे, संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रसार करणे’ इत्यादी अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
५ आ. साधनेसाठी विविध प्रकारच्या विपुल सेवा उपलब्ध करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांवर कृपाच केली असणे : ‘मला करण्यासाठी सेवा नाही किंवा माझ्या सेवा पूर्ण झाल्या’, असे सनातनमध्ये कुठलाही साधक कधीच म्हणू शकत नाही; कारण प.पू. डॉक्टरांनी ‘प्रकृती, वयोमान, साधकांची क्षमता, कौशल्य, आध्यात्मिक पातळी, उपलब्ध वेळ यांनुसार अगदी घरी राहूनही करता येतील’, अशा विविध प्रकारच्या सेवा विपुल प्रमाणात उपलब्ध करून देऊन साधकांवर अनंत कोटी कृपा केली आहे.
समाजामध्ये अनेक संप्रदाय आहेत; परंतु त्यांच्याकडे मासातून काही दिवस किंवा काही ठिकाणी वर्षातून काही वेळाच सेवा उपलब्ध असतात.
६. ‘साधक कुठली सेवा करतो ?’, यापेक्षा ‘तो सेवा कशी करतो ?’, याला अधिक महत्त्व असणे
‘सेवा साधना म्हणून कशी करायची ?’, हे गुरुदेवांनी साधकांना शिकवले आहे. गुरुदेवांनी ‘कुठलीही सेवा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही’, हे साधकांच्या मनावर बिंबवले आहे. ते म्हणतात, ‘‘तुम्ही सेवा कुठली करता ?’, हे महत्त्वाचे नसून ‘तुम्ही ती कशी करता ?’, हे महत्त्वाचे आहे. सहस्रो लोकांसमोर प्रवचन देणारा आणि आश्रमात स्वच्छतेची सेवा करणारा या दोघांनीही भावपूर्ण सेवा केल्यास दोघांचीही सारखीच प्रगती होते.’’ त्यामुळे स्वयंपाकघरात सेवा करणारा किंवा मोठ्या प्रमाणात समष्टीत सेवा करणारा साधक असो, सर्वांचीच प्रगती होत आहे. त्यामुळे साधक कुठलीही सेवा करण्यास सिद्ध होतो.
७. साधकांना साधनेतील पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी मार्गदर्शन मिळण्याची सोय करणे
गुरुदेवांनी साधकाची साधना एका ठराविक टप्प्याला आल्यावर त्याला साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी मार्गदर्शन मिळण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. साधक समष्टी सेवा करण्यासाठी कृतीशील झाल्यावर त्याला पुढच्या टप्प्यातील सत्संग मिळतो. यात ‘प्रसार कुठे आणि कसा करावा ?’, याविषयी चिंतन अन् नियोजन केले जाते. यातून परिपूर्ण सेवा करण्याच्या प्रयत्नांतून साधकांची सेवेच्या माध्यमातून साधना होते.
८. एखाद्या सेवेचे दायित्व घेऊन सेवा करतांना साधकाला सर्व प्रकारचे साहाय्य दिले जात असल्यामुळे साधक उत्साहाने सेवा करू शकणे
साधक हळूहळू दायित्व घेऊन सेवा करायला आरंभ करतो. त्याला एखाद्या सेवेचे दायित्व देतांना सेवेची व्याप्ती समजावून सांगितली जाते. सेवा करतांना अडचणी आल्यास ‘त्याविषयी कुणाचे मार्गदर्शन घ्यावे ?’, ‘सेवा समयमर्यादेत कशा पूर्ण कराव्या ?’, इत्यादी सर्व शिकवले जाते. उत्तरदायी साधक ‘प्रती सप्ताह किंवा ठराविक कालावधीनंतर दायित्व घेऊन सेवा करणार्या साधकांचे सत्संग घेऊन त्यांच्या अडचणी सोडवतात, ‘त्यांची सेवा आणि साधना योग्य प्रकारे होत आहे ना ?’, हे पहातात अन् आवश्यकतेनुसार त्यांना साहाय्य देतात. त्यामुळे त्यांना आधार वाटून सेवा करायला उत्साह येतो. त्यामुळे दायित्व घेण्याविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन होते आणि ते अधिक आत्मविश्वासाने दायित्व घेऊन सेवा करायला लागतात. एखादा साधक दायित्व घेऊन सेवा करतो, तेव्हा त्याच्यावर गुरुकृपा अधिक प्रमाणात होते. त्यामुळे त्याची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होते.
९. उत्तरदायी साधकांनी सहसाधकांना शिकवणे
मी नव्याने सेवा करू लागलो, तेव्हा आमचे उत्तरदायी साधक अधूनमधून संपर्कसेवेसाठी जातांना काही साधकांना त्यांच्या समवेत शिकण्यासाठी घेऊन जायचे. त्यांच्याकडून मला साधनेतील महत्त्वाचे गुण म्हणजे प्रेमभाव, इतरांना समजून घेणे, प्रत्येकाला त्याच्या स्थितीनुसार मार्गदर्शन करणे इत्यादी गोष्टी शिकता आल्या’.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
इदं न मम । (हे लिखाण माझे नाही !)
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.४ २०२४)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/821101.html