Shri Ram Temple : श्रीराममंदिराच्या उभारणीला १ वर्ष पूर्ण होणार : अयोध्येत भाविकांची गर्दी !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील भव्य श्रीराममंदिराच्या प्रतिष्ठापनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने अयोध्येत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. त्यातच ख्रिस्ताब्द नववर्ष पहाता अनेक लोक दर्शनासाठी येणार आहेत. अयोध्या आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये रहाण्यासाठी हॉटेल आधीच भरले आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानेही दर्शनासाठी मुदतवाढ दिली आहे. गर्दी हाताळण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. आता सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत मंदिरात दर्शन घेता येणार आहे.

१. अयोध्येतील एका हॉटेल मालकाने सांगितले की, १५ जानेवारीपर्यंत भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.

२. एका स्थानिक पुजार्‍याने सांगितले की, हिंदु नववर्षाप्रमाणेच ख्रिस्ताब्द नववर्षाच्या निमित्तानेही मोठ्या संख्येने लोक मंदिरात जातात आणि देवाचा आशीर्वाद घेतात. या वेळी अनेक लोक श्रीराममंदिराच्या दर्शनासाठी येणार आहेत.

३. विशेषत: ३० डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत मंदिर न्यासाने विशेष व्यवस्था केली आहे.

४. अयोध्या पोलिसांनी मंदिर आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे.

श्रीराममंदिरामुळे उत्तरप्रदेशात ऐतिहासिक गर्दी !


वर्ष २०२२ मध्ये अनुमाने ३२ कोटी लोक उत्तरप्रदेशात आले होते. वर्ष २०२४ मध्ये मात्र अवघ्या ६ महिन्यांत ३२ कोटींहून अधिक लोक येथे आले आहेत. एकट्या जानेवारी २०२४ मध्ये तब्बल ७ कोटी लोकांनी उत्तरप्रदेशाला भेट दिली होती. राज्य सरकारचे म्हणणे आहे की, अयोध्या आणि वाराणसी येथे पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील पर्यटन पुष्कळ वेगाने वाढत आहे.