Moradabad Cow Slaughter Beaten By Mob : मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या करणार्‍याला जमावाकडून मारहाण

उपचार चालू असतांना मृत्यू

रुग्णालयात भरती करण्यात आलेला शाहिदीन

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथे गोहत्या करणार्‍या एका तरुणाला जमावाने पकडून केलेल्या मारहाणीत त्याचा उपाराच्या वेळी मृत्यू झाला. ही घटना ३० डिसेंबरला पहाटे  माढोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडी समितीत घडली. शाहिदीन असे मृताचे नाव आहे. तो असलतपुरा येथील रहिवासी होता. संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. घटनेच्या व्हिडिओच्या आधारे लोकांची ओळख पटवली जात आहे.

१. मंडी समितीच्या आवारात काही लोक गायींची कत्तल करत असल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना मिळाली. त्यामुळे परिसरातील नागरिकांची तेथे गर्दी झाली. गोहत्या करणार्‍या ४ जणांपैकी ३ जण पळून गेले, तर शाहिदीन जमावाच्या कह्यात सापडला. त्याला जमावाने चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोचले आणि शाहिदीन याला जमावाच्या तावडीतून सोडवून रुग्णालयात भरती केले. तेथे उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाला.

२. स्थानिक लोक म्हणाले की, मंडी समितीच्या आवारात यापूर्वीही गोहत्येच्या घटना घडल्या आहेत. गोहत्या होत असल्याचे पाहून जमाव नियंत्रणाबाहेर गेला.

संपादकीय भूमिका

गोहत्येविषयी जनतेमध्ये किती संताप आहे, हे यातून लक्षात येते. या प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांनी अधिक सतर्क होऊन गोहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !